कळी उमलताना...

अमृता देसर्डा
गुरुवार, 31 मे 2018

मुली होतात म्हणून जिच्या पोटात गर्भ वाढतो, त्या मातेलाच दोषी धरलं जातं. मुली नकोत म्हणून तिच्या पोटच्या गोळ्याची हत्या केली जाते. गर्भलिंग निदान चाचणी हा गुन्हा आहे. प्रत्येक बाई गर्भलिंग निदानास विरोध करू शकते. तिने करायला हवा. पोटातच आपली कळी खुडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मे महिन्यातील मदर्स डे निमित्ताने मातृत्वाची ही कथा...

मुली होतात म्हणून जिच्या पोटात गर्भ वाढतो, त्या मातेलाच दोषी धरलं जातं. मुली नकोत म्हणून तिच्या पोटच्या गोळ्याची हत्या केली जाते. गर्भलिंग निदान चाचणी हा गुन्हा आहे. प्रत्येक बाई गर्भलिंग निदानास विरोध करू शकते. तिने करायला हवा. पोटातच आपली कळी खुडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मे महिन्यातील मदर्स डे निमित्ताने मातृत्वाची ही कथा...

सुनीताला काय करावं सुचत नव्हतं, तिच्या वर खूप दडपण आलं होतं. घरात ही गोष्ट सांगितली तर काय होईल? आनंद होईल ह्यां ना? सासूबाई काय बोलतील? आणि सासरे? सुनीता विचार करून थकली होती. कारण तिला तिसऱ्यांदा दिवस गेले होते. याही वेळेस जर परत मुलगी झाली तर तिची काही खैर नाही, असंच तिला वाटत होतं. तिनं मेडिकलमधून प्रेग्नंसी कीट घेऊन स्वतःची तपासणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्या वेळेला घरात कोणीच नव्हते. तिची थोरली मुलगी कोमल ही शाळेत गेली होती, ती नुकतीच पहिलीत गेली होती आणि धाकटी सुमन गाढ निजली होती. सुनीताचे पती विश्वास हे सरकारी कर्म चारी आहेत. सासूबाई घरातच असतात. मागच्याच महिन्यात सुमन एक वर्षांची झाली होती. ती झाली तशी सासूबाई सुनीतावर नाराज राहायच्या, कधी विश्वासला दिवा मिळणार कुणास ठाऊक? असं काहीबाही सुनीताला बोलायच्या. सुनीता दहावी शिकलेली; पण एक उत्तम गृहिणी. शिवण, टिपण, स्वयंपाक अगदी उत्तम करणारी विश्वासची पत्नी. विश्वा सबरोबर लग्न झालं आणि गावातून या निमशहरी भागात राहायला आली. लग्न झालं आणि थोड्याच दिवसांत ती आई झाली. पहिली मुलगी म्हणून कोमलचे लाड झाले. मुलगी म्हणून तिला कुणी हिणवलं नाही; पण दुसऱ्यांदा देखील मुलगीच झाली. दुसरीचं स्वागत नाराजीनं झालं. सासरे तसे चांगले, ते दोघींवर तेवढीच माया करतात; पण सासूबाई आणि खुद्द सुनीताचे पती मात्र नाराज झाले. आता ही तिसरी बातमी देताना त्या दोघांना काय वाटेल, याचा विचार सुनीता करू लागली. संध्या काळी दिवेलागणीच्या वेळेला विश्वास घरी आला. सुनीताने त्या च्या समोर चहा आणि खायला चिवडा ठेवला आणि त्याच्या समोर उभी राहिली. घरात ते फक्त दोघे होते. सासूबाई देवळात गेल्या  होत्या. आणि सासरे कोमलला घेऊन मैदानावर गेले होते.

अहो, आज जरा बाहेर जाऊयात का? का? काय झालं? मोकळ्या हवेत गेलोच नाही ना, म्हणून. दोन पोरींकडे कोण पाहणार आणि मी काय टाइमपास करायला ऑफिसला जात नाही. अहो, तसं नाही, मला जरा बोलायचं आहे. बोल की, तुला कुणी अडवलं आहे

घरात बोलता येत नाही, म्हणून...
विश्‍वासने तिचं बोलणं अर्ध वट तोडलं. नाइलाजानं सुनीताला घरातच ती बातमी सांगावी लागली. विश्वासचा विश्वासच बसेना. त्याला खूप आनंद झाला. आता या खेपेला मुलगाच होणार, अशी त्याला खात्री होती. सुनीता काहीच बोलत नाही. ती देवाला दिवा लावून देवापाशी बसली.

दिवस भरभर सरत आहेत. आता सुनीताला दुसरा महिना लागला आहे, तिची तब्बेत थोडी नाजूक आहे. दवाखाना चालू आहे; पण घरातलं सगळं करून, शिवाय दोन पोरींना सांभाळून तिसरं बाळंतपण तिला अवघड जात आहे. सासूबाई रोज प्रार्थना करत आहेत. घराण्याला वंशाचा दिवा व्हावा म्हणून रोज देवपाण्यात ठेवत आहेत. विश्वासची अस्वस्थता वाढत आहे. त्याला कुणीतरी सांगितलं, की गर्भा चे लिंग तपासून घ्या. म्हणजे जर मुलगा असेल, तर कळेल आणि जर मुलगी झाली, तर काहीतरी कारणाने गर्भ मोकळा करून टाका. त्याच्या मनात या विचारांनी घर केलं. त्याने सुनीताला ही गोष्ट बोलून दाखवली; पण सुनीताला ते अजिबात पटले नाही. जे होईल ते होईल, आपण दोघे जबाबदार आहोत. तुम्ही असल्या भानगडीत पडू नका, असं तिचं म्हणणं होतं.

विश्वा सने तिचं ऐकलं नाही. त्याने माहिती काढली, तालुक्‍याच्या सुधारलेल्या ठिकाणी एका दवाखान्या त गर्भलिंग चाचणीची सोय आहे. एक दिवस तो आणि त्याची आई तालुक्‍याला सुनीता आणि तिच्या सासऱ्यांना न कळवता जाऊन चौकशी करून आले. तालुक्‍यात एका खासगी डॉक्‍टरांच्या दवाखान्या त छुप्याने प्रसूतीपूर्व गर्भनिदान करण्याची सोय होती. प्रत्यक्ष जागेवर मात्र तसं करणं हा कायद्याने गुन्हा आहे. जर तसं केलं तर कमीतकमी तीन वर्षे कारावास आणि ५०,००० दंड ठोठावण्यात येईल, अशा पाट्या जागोजागी लावल्या होत्या. विश्वास सुशिक्षित होता. त्यानं त्या पाटीकडं दुर्लक्ष केलं. त्यातली एकही ओळ वाचली नाही. त्याची आई तर अडाणी होती. दोघांनी डॉक्‍टरांची चौकशी केली, त्यांची वेळ घेतली आणि सुनीताला तिथं आणायचं ठरवलं. सुनीता, आपल्या कडं वेळ कमी आहे, तालुक्‍याला एक मोठे डॉक्‍टर आहेत, त्यांची वेळ
घेतली आहे, मी उद्या सुटी टाकतो, आपण उद्या तालुक्‍याला जाऊ. अहो, पण मला काय झालं आहे, मी चांगली आहे आणि इथले डॉक्‍टर काय ओस पडले आहेत का? हे बघ, मला तुझी काळजी वाटते. उद्या सकाळी आवरून ठेव. आपल्याला तालुक्‍याला जायचं आहे. सुनीताला काही कळेना. सासूबाई पण मुलाची बाजू घेत होत्या. तिला त्या दोघांच्या मनात काहीतरी सुरू आहे इतकं कळलं. काय करावं ते सुचेना. पडत्या फळाची आज्ञा घेऊन ते तिघेसासऱ्यावर घरची जबाबदारी टाकून तालुक्‍याला गेले.

सुनीताला प्रवास करायचा नाही, असं डॉक्‍टरांनी सांगितलं होतं. तिला इतका मोठा प्रवास जड जात होता. सारखं मळमळत होतं, झोपावं वाटत होतं; पण सासू आणि नवऱ्या पुढे काही चालत नव्हतं. अखेर ते त्या दवाखान्यात पोचले. तो दवाखाना खासगी होता, त्यामुळं तिथं गर्दी फारशी नव्हती. सुनीताला जरा शंका आली; पण सासूने खुणेने चूप म्हणून सांगतलं. तिथल्या सगळ्याच लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. अनेक माणसं इकडून तिकडून ये-जा करत होती. त्या दवाखान्याला खूप खोल्या होत्या आणि तिथल्या एका खोलीत अनेक गरोदर बायका बसल्या होत्या. काही जणी पाणी पीत होत्या, काही नुसत्याच बसल्या होत्या. सुनीताला त्या खोलीत नेलं गेलं. खोली पूर्ण बंद आणि वातानुकूलित होती. बसायला आरामशीर खुर्च्या होत्या. सुनीता आणि तिची सासू तिथं बराच वेळ झाला
तरी बसून होत्या.

‘तुमचा कितवा महिना आहे हो? खूपच थकलेल्या दिसता?’ सुनीताच्या शेजारी एक बाई बसल्या होत्या. त्यांनी तिला विचारलं. ‘दुसरा संपून नुकताच तिसरा लागला आहे.’ ‘तुम्ही मग इथं काय करायला आला आहात?’ ‘माझ्या सासूबाई आणि नवऱ्यानं मला इथं आणले आहे, कशासाठी माहीत नाही.’ सासूबाई सुनीताला ओरडल्या. कुणाशीही बोलू नको, असं खुणेनं हळूच त्यांनी सुचवलं. खूप वेळ झाला; पण तिचा नंबर काही लागला नाही. दवाखान्यातल्या हालचाली आता आणखीनच संशयास्पद झाल्या होत्या. कुणीतरी आरोळी ठोकली, पळा दवाखान्यात पोलिसांची धाड पडली, लवकर इथून जावा.

सगळीकडे एकच गोंधळ माजला. सुनीताने सासूबाईंना घट्ट पकडून ठेवलं. त्या दरवाजातून बाहेर पडायची धडपड करू लागल्या; पण बाहेर काही पडता आलं नाही. सुनीता ज्या बाईंशी बोलत होती, ती वेशधारी पोलिस होती. ते पाहून सुनीताला धक्का बसला. विश्वास बाहेर होता. आत त्या दोघी अडकल्या होत्या. संपूर्ण रात्र त्यांची अस्वस्थ गेली. इकडं सासरे आणि दोन मुली वाट पाहून थकून गेले. त्यांना काळजी लागून राहिली. त्या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान केलं जातं, आणि बेकायदा गर्भ पात केला जातो याची बातमी पोलिसांना लागली होती, म्हणून स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्या हॉस्पिटलचा मालक डॉक्‍टर त्याच्या बायकोसह परागंदा झाला होता. त्यामुळे तालुक्‍यातली पोलिस यंत्रणा त्यांना शोधत होती. दवाखान्यातील संपूर्ण वस्तूंची, त्या जागेची आणि तिथं उपस्थित असलेल्या पेशंटची कसून चौकशी करण्यात आली. संपूर्ण हॉस्पिटल पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यात विश्वास आणि सुनीता व तिची सासू यांचीदेखील चौकशी करण्यात आली.

तीन दिवस त्यांचे त्यात निघून गेले. पुन्हा असं करणार नाही, असे हमीपत्र पोलिसांनी घेतलं. त्यांच्या कडून लेखी माफी मागून घेतली. विश्वास खूप हादरून गेला. सुनीताची तब्बेत आणखीन खालावली. सासूबाई देवाचा धावा करू लागल्या. या कठीण प्रसंगातून तिघेही कसेबसे सुटले. विश्वासची नोकरी गेली नाही; पण त्या ने यातून खूप मोठा धडा घेतला. सुनीताला जे काही होईल, मुलगा किंवा मुलगी काहीही होवो, आपण त्याचा स्वीकार करायचा असे त्याने मनोमन ठरवले. त्या हॉस्पिटलचे सगळे काळे धंदे बाहेर आले. त्या डॉक्‍टर दांपत्यांचे डॉक्‍टरकीचे लायसन्स रद्द केले गेले. त्यांच्या हॉस्पि टलला टाळे ठोकण्यात आले. जागोजागी गर्भलिंग निदान, आणि स्त्रीभ्रूणहत्या हा कायद्याने गुन्हा आहे अशा लोकजागृतीच्या पाट्याही लावण्यात आल्या. पोलिस वेळोवेळी चौकशी करू लागले, त्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा बसवली. कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यक्रम राबविण्याचा निश्चय केला.

सुनीता आता तिच्या तिन्ही मुलींना मोठ्या प्रेमाने वाढवते आहे. तिच्या सासूबाईदेखील मुलींकडे लक्ष देत आहेत. विश्वास घरातल्या पाचही स्त्रियांना मोठ्या मायेने वागवतो. सुनीताने आता पुन्हा मूल नको म्हणून निर्णय घेतला आहे आणि तिसऱ्या
मुलीचे नाव अभया, असे ठेवले आहे.

संबंधित बातम्या