डिझायनर ब्रॅंड आणि वॉर्डरोब स्टायलिंग

निवेदिता साबू
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

डिझायनर ब्रॅंडचा बोलबाला आता सगळीकडेच झाला आहे. ऑनलाइन शॉपिंगचीही क्रेझ आहे. सध्याचे ब्रॅंड, ऑनलाइन शॉपिंग, प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व खुलवणाऱ्या फॅशन याबद्दल डिझायनरची सध्याच्या काळात काय भूमिका आहे, हे समजावून घेऊ आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांच्याकडून... 

डिझायनर ब्रॅंडचा बोलबाला आता सगळीकडेच झाला आहे. ऑनलाइन शॉपिंगचीही क्रेझ आहे. सध्याचे ब्रॅंड, ऑनलाइन शॉपिंग, प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व खुलवणाऱ्या फॅशन याबद्दल डिझायनरची सध्याच्या काळात काय भूमिका आहे, हे समजावून घेऊ आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांच्याकडून... 

डिझायनर ब्रॅंड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचत आहेत का? याबद्दल एक डिझायनर म्हणून आपलं काय म्हणणं आहे?
- ऑल डिझायनर्स स्पेशली वेडिंग डिझायनर, जे भारतातले आणि भारताबाहेरचेही आहेत, त्यांचा रेडी टू वेअर कलेक्‍शन्स अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. खूप ब्रॅंड कोलॅब्रेशन होत आहेत. डिझायनर आणि मोठे ब्रॅंड एकत्रित येण्यामुळे कलात्मक ड्रेसबाबत सामान्यांमधली आवड वाढली आहे. जास्तीत जास्त लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडणं याचा विचारही आता ब्रॅंडमध्ये केला जातो. डिझायनरही तसा विचार करतात. माझा व्यक्तिगतही तसाच प्रयत्न आहे. अगदी लग्नासारख्या समारंभातच नव्हे, तर रोजचे कार्यक्रम, मिटिंग्ज, पार्टी यासाठीही घालता यावेत, असे कपडे तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

स्टायलिंगचं महत्त्व वाढत आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
- आय फील स्टायलिंग किंवा वॉर्डरोब प्लानिंग याचं महत्त्व अलीकडे खूप वाढत आहे. जरी तुम्ही खूप कपडे घेतले तरी ते घालायचे कसे, त्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं? त्याच्याबरोबर ॲक्‍सेसरिज कोणत्या घालायच्या? किंवा त्याबरोबर कोणती रंगसंगती चांगली दिसेल, आपल्यासाठी काय योग्य आहे, हे सगळं ठरवायला एका डिझायनरची गरज असते. मी अशा स्टायलिंगची कन्सल्टन्सी करते.

अगदी हाउसवाइफ असण्यापासून ते एखाद्या कंपनीची सीईओ असण्यापर्यंत, मग प्रोफेसर असो, बिझनेस वूमन असो त्या प्रत्येकीने कशा पद्धतीचे कपडे घालावेत, त्यांच्या इमेजप्रमाणे, पर्सनॅलिटीप्रमाणे, त्यांच्या आजूबाजूला असणारे लोक, प्रोफेशन यानुसार त्यांचा लूक काय असावा, ज्या सर्कलमध्ये येणं-जाणं असेल त्या सर्कलचा विचार करून आपलं ड्रेसिंग कसं असावं? म्हणजे अगदी हॅंडबॅग कोणती असावी, वॉच किंवा हेअर ॲक्‍सेसरिज, इअर रिंग्ज, ज्वेलरी हे आपण कसं वापरावं याकडं लक्ष देण्याची गरज आहे. सध्याच्या काळात स्टायलिंगकडं लक्ष देणं महत्त्वाचं आहेच. त्यासाठी डिझायनर मदत करतात किंवा स्वतंत्रपणे स्टायलिशही असतात.

ऑनलाइन शॉपिंगचं प्रस्थ जास्तीत जास्त वाढत आहे. त्याचा फॅशनवर काय परिणाम होतो आहे?
- ऑनलाइन शॉपिंग हे अत्यंत सोयीचं आहे. आपली ‘झिरो क्वश्‍चन आस्क’ पॉलिसी फक्त या शॉपिंगमुळेच यशस्वी होत आहे. फक्त प्रश्‍न असतो, आउटफिट जसा दिसतो तसा त्याचा, त्याच्या कापडाचा दर्जा असेल का? बहुतेक सगळेच ब्रॅंड आता ऑनलाइन जाण्याचा, क्‍लॉलिटी प्रॉडक्‍ट देण्याचा आणि एकूणच ऑनलाइन आणि ऑफलाइनमधली गॅप भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. आताचं फॅशन जग ऑनलाइनकडंच वळतं आहे.
जास्तीत जास्त डिझायनरही ऑनलाइन जाण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याचा ग्राहकांसाठी फायदा आहे. अर्थात जिथं आपल्या ठेवणीनुसार कपडे हवे आहेत किंवा स्वतःचा लग्नासारखा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, तिथं डिझायनरशी कॉन्टॅक्‍ट करून मगच ड्रेस आणि त्याची डिझाइन ठरवावे लागते, अशावेळी व्यक्तिगत सल्लाच घ्यावा लागतो.

ऑनलाइनमुळं बाहेरचे ब्रॅंड आपल्याकडं जास्त येत आहेत. ग्लोबल मार्केट सेट होत आहे. निवडीसाठी पर्याय म्हणून नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रॅंड उपलब्ध आहेत. किमतींची तुलना लगेच करणं ऑनलाइनमुळे शक्‍य होतं आहे. कुठूनही कुठंही ड्रेस मागवणं, पाठवणं शक्‍य होतं आहे ब्रॅंड; पण ऑनलाइनमध्ये गरज नसतानाही अनेकदा शॉपिंग होतं. कारण, बसल्या-बसल्या ते उपलब्ध होतं. त्याकडं फक्त लक्ष द्यावं. ते वगळता ऑनलाइन शॉपिंग ग्रेट प्लॅटफॉर्म आहे.

ऑनलाइनमुळं पाश्‍चात्त्य स्टाइल कपडे वापरणं फार वाढलं आहे असं नाही. आधीपासूनच पाश्‍चात्त्य पद्धतीचे कपडे वापरण्याचं प्रमाण आपल्याकडे वाढलेलं आहे. त्यातून सोशल नेटवर्किंगद्वारे कोणत्या फॅशन शोमध्ये काय होतं? कोणत्या कलाकाराने कसे कपडे घातले या गोष्टी खूप लवकर समजतात. फॅशनमध्ये अभिरुची दाखवणारे लोक आहेत, ते या गोष्टींशी कनेक्‍ट असतात. फक्त ऑनलाइनचं प्रमाण वाढलं आहे असंच नाही तर एकूणच जागतिकीकरण झालेलं आहे, त्यामुळं फॅशन, स्टाइल याचा एकूणच प्रभाव वाढला आहे. फॅशन निघाल्यापासून सामान्य माणसांपर्यंत येण्याचा वेग हा शून्यावर आला आहे. म्हणजे, आज पॅरिसमध्ये एखादी डिझाइन लाँच झाली की लगेच ती सोशल मीडियामुळे जगभर पोचते. वेळ लागतो तो सामान्यांमध्ये स्थिरावायला. 

फॅशन घडताना किंवा स्वीकारली जाण्यासाठी कशाचा प्रभाव अधिक पडतो?
- मला वाटतं, बॉलिवूड आणि चित्रपटाशी संबंधित जे इव्हेंट असतात, बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या कलाकारांनी घातलेले कपडे असतील किंवा रेड कार्पेट कार्यक्रम असतील, ‘कान’सारखे फॅशनला मध्यवर्ती संकल्पना ठेवून ठरवलेले महोत्सव असतील, जिथे लूक, ड्रेस कोणी डिझाइन केला हे बघितलेलं असतं, अशा अनेक गोष्टींचा प्रभाव फॅशन स्वीकारण्यावर असतो. चित्रपटसृष्टी, बॉलिवूड यांचा प्रभाव फॅशन इंडस्ट्रीवर नेहमीच अधिक राहिला आहे.

फॅशन शोमधली फॅशन सामान्यांच्या कितपत उपयोगाची ठरते?
- वेगवेगळे आंतरराष्ट्रीय किंवा भारतीय फॅशन शो यांचा प्रभाव सामान्यांपर्यंत पोचतो. ती एक सादरीकरणाची स्टाइल आहे. म्हणजे, वेगवेगळ्या फॅशन डिझायनर्सनी नवीन कलेक्‍शन तयार केल्यानंतर ते कलेक्‍शन फॅशन शोद्वारे जगापुढे आणले जातात. ते कोणत्या व्यक्तीवर कसं शोभून दिसतं, हे या रॅम्पवर कळतं. डिझायनर्सनी केलेलं काम सामान्यांपर्यंत पोचविण्याचं ते एक साधन आहे, असं मी म्हणेन. जगाला फॅशन दाखवण्यासाठी फॅशन शो अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.

सध्याच्या फॅशन जगात फिटिंगमध्ये काय बदल झाले आहेत?
- फिटिंगबद्दल मी स्वतः पॅशनेटली काम करते. आता फॅब्रिकमध्ये खूप बदल होत आहेत. टेक्‍निकल बदलही होत आहेत. आपल्या शरीराची ठेवण, बांधा कोणत्या फॅब्रिकमध्ये जास्त चांगला दिसेल, फॅब्रिकचा फॉल कसा पडेल, हे सगळं सतत प्रयोग करून बघावं लागतं. जागतिक पातळीवर एकीकडं ढगळ पॅटर्नची फॅशन सुरू होती. दुसरीकडं खरंच ज्यांची फिगर सौंदर्याला साजेशी आहे, त्यांच्यासाठी कपड्यांच्या माध्यामातून ते अधिक सुंदर कसं दिसेल हे बघण्याचा प्रयत्न केला जातो.     

सध्या कोणत्या फॅब्रिकचा ट्रेंड आहे?
- मध्यंतरी क्‍युबाचा ट्रेंड होता. आता कृत्रिम फॅब्रिकमध्ये जॉर्जेट, लायक्रा यांची खूप चलती आहे. नैसर्गिक फॅब्रिकमध्ये पाहिलं तर लिनन, खादी हे अधिक चालतं. बनारस सिल्कही चालतं. कापडांबद्दलचा अवेअरनेस लोकांमध्ये वाढत आहे, तसा या इंडस्ट्रीचाही विकास होत आहे.

वयानुसार फॅशन बदलते का?
- वयानुसार आपली आवडं, आपण कशात चांगले दिसतो, आपलं व्यक्तिमत्त्व याबद्दलची व्यक्तीची समज वाढत जाते. त्यामुळे ड्रेसिंग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेसं होत जातं. आजकाल लोकं आरोग्याबद्दल खूपच जागरूक झाले आहेत. फिट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. कालची पन्नाशी म्हणजे आजची तिशी असा लूक बदलतो आहे. प्रत्येकाचा तरुण दिसण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वयानुसार असं न म्हणता काळानुसार बदलणाऱ्या वयानुसार फॅशन बदलत आहे, असं म्हणावं लागेल. 

सिझननुसार वॉर्डरोब प्लानिंग बदलावं लागतं का?
- एखाद्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करता तेव्हाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा जो प्रभाव पडतो, तुमच्या बोलण्याआधी तुमचं व्यक्तिमत्त्व समोरच्याच्या मनात तयार होऊ लागतं, तो प्रभाव महत्त्वाचा आहे. यासाठी वॉर्डरोब प्लानिंग महत्त्वाचं ठरतं. आपल्याकडे ऋतू बदलतानाही अगदी अत्युच्च टोकाचे बदल होत नाहीत. त्यामुळं सगळा वॉर्डरोब बदलावा लागत नाही. त्यात काही बदल केले तरी ते पुरेसं ठरतं. कपड्यांच्या प्रकारातले बदल म्हणजे थंडीत लोकरीचे कपडे वापरणं, उन्हाळ्यात लाइट वेट सिफॉनसारख्या कपड्यांचा उपयोग करणं, असे काही बदल पुरेसे ठरतात. यामुळे संपूर्ण वॉर्डरोब काढून टाकावा लागत नाही. इकोफ्रेंडली आणि इकॉनॉमिकली आपल्याला सूट होणारा वॉर्डरोब असणं हीच बेसिक गरज पाहिली पाहिजे. काही पॅटर्न आपण किती वेळा वापरतो, याचाही विचार केला पाहिजे. अनेकदा क्‍लासिक ड्रेस किंवा साडी असते. त्यामुळं ती लाइफलाँग असते, असं म्हटलं तरी चालेल. थोडक्‍यात ठराविक दिवसांनी वॉर्डरोब बदलायला हवा, असं काही नाही. कधीकधी आपण त्या त्या ट्रेंडनुसार, त्या काळातल्या फॅशननुसार ड्रेस, ब्लाउज शिवतो. तो बदल करणं अपेक्षित आहे. थोडक्‍यात वॉर्डरोबचं प्लानिंग स्मार्ट असायला हवं.  

ग्रीन फॅशन-इको फ्रेंडली फॅशन 
पर्यावरणपूरक कपडे घेणं हे आत्ताच्या काळात खूपच महत्त्वाचं ठरत आहे. प्रत्येकानं कपडे घेताना याचा विचार करायला हवा. कपड्यांबरोबर त्यासाठी वापरले जाणारे रंग, प्रोसेस यात नैसर्गिक प्रमाण किती आहे, हे आवर्जून बघावं. त्याच गोष्टींचा प्राधान्यानं विचार करावा. प्रदूषण वाढणार नाही अशा गोष्टींचा वापर करायला हवा.

नॅचरल फायबर्स, कॉटन, ज्यूट, लिनन अशाप्रकारची फॅब्रिक ही नैसर्गिक आहेत. अशा कपड्यांमुळं आपल्या शरीरालाही कमी त्रास होतो आणि पर्यावरणपूरक गोष्टी वापरल्याचं समाधानही मिळतं. ग्रीन फॅशनचा ट्रेंड आता सुरू झाला आहे आणि लोक अधिकाधिक जागरूक होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. 

अपकमिंग ट्रेंड 
पारंपरिक गोष्टींना आत्ताच्या ट्रेंडशी जुळवून घेणं असे बदल अलीकडे होत आहेत. एखादी जुन्या पद्धतीची एम्ब्रॉयडरी आत्ताच्या फॅशनला शोभते. अशा गोष्टींची ओळख ग्राहकांना करून देण्याचा अधिक प्रयत्न डिझायनर्स करत आहेत. भारतीय टेक्‍स्टाइल इंडस्ट्री आता जगभरात पसरते आहे. 
अपकमिंग पॅटर्न म्हणून प्रत्येकानं स्वतःच्या कम्फर्टचा विचार करावा, असं मला वाटतं. साडी नेसणं पूर्वापार चालत आलेलं आहे. या गोष्टी नेहमीसाठीच राहतील; मात्र स्वतःच्या, व्यक्तिमत्त्वानुसार स्वतःची स्टाइल ठरवायला हवी.
(मुलाखत - मंजिरी फडणीस)

संबंधित बातम्या