नव्या वर्षात... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

आणखी एकदा सूर्य मावळतीला जातो. रात्रीच्या अंधारात गुडूप होतो. काही तासांच्या अफाट शांततेत विसावून जातो. पहाटे-पहाटे अलगद पावलांनी नव्या किरणांचे पंख आभाळभर पसरतो आणि नव्या दिवसाची सुरुवात करतो. नव्या दिवसाची सुरुवात नव्या आशा-अपेक्षांचा प्रारंभ असतो.

आणखी एकदा सूर्य मावळतीला जातो. रात्रीच्या अंधारात गुडूप होतो. काही तासांच्या अफाट शांततेत विसावून जातो. पहाटे-पहाटे अलगद पावलांनी नव्या किरणांचे पंख आभाळभर पसरतो आणि नव्या दिवसाची सुरुवात करतो. नव्या दिवसाची सुरुवात नव्या आशा-अपेक्षांचा प्रारंभ असतो.

जिंकण्याची उमेद वाढविणारा क्षण असतो. या क्षणाचं आकर्षण, ओढ जन्मजन्मांतरीची. पशु-पक्ष्यांचं काय चालतं नेमकं माहिती नाही; माणसांमध्ये मात्र रोजचा नवा दिवस जगण्याचा आधार असतोच असतो. 
नवा दिवस कॅलेंडरची तारीख पलटण्याइतका मामुली नसतो. एक पाऊल पुढं गेलेल्या आयुष्याला सामोरे जाण्याचा प्रसंग असतो. कालच्या अंधारात बुडालेल्या प्रत्येक पावलाने काही ना काही शिकवलेलं. ते संचित नव्या प्रकाशाची समज वाढविणारं. रोजचा हा उत्सव. अनादी अनंतापासून चालत आलेला, तरीही त्यातला टवटवीतपणा कदाचित पहिल्या सूर्यप्रकाशाइतकाच तजेलदार. 

नव्या वर्षाचं, नव्या प्रकाशाचं स्वागत, हा म्हणूनच केवळ गणितीय अथवा खगोलशास्त्रीय रुक्ष बदल नसतो. उगवतं वर्ष येणाऱ्या अगणित संधींची, आव्हानांची आणि प्रगतीच्या नव्या वाटेची चाहूल असतं. कुठलीच वाट बंद झालेली नाही, कुठल्याच प्रतिकूलतेनं आपल्याला झुकवलेलं नाही, ताठ मान आणि ताठ कण्यानं नव्या संकटांना झेलण्यासाठी आपण सक्षम आहोत, हे सांगणारा हा बदल असतो.

रात्रीच्या अंधाराला मागे टाकण्याची जिद्द हा मानवी उत्क्रांतीचा मूलभूत पाया राहिला. नवनव्या संकल्पनांना जन्म देणारा रोजच्या सकाळचा सूर्य आणि अशा अनेक सूर्यांचं मिळून झालेलं वर्ष हे आवर्तन पृथ्वीच्या जन्मापासूनचं. अंधाराला मागे सारत कणाकणांतून पुढे सरकणारा प्रकाशाचा प्रत्येक किरण प्रत्येक सजीवाला ज्याच्या त्याच्या आवश्‍यकतेनुसार काही ना काही देत असतो. या देण्यामध्ये भेदाभेद नसतो, जात-पात नसते. धर्म-वंशाला थारा नसतो. सजीवसृष्टीचं आनंदाचं गाणं गाणारा हा प्रकाश असतो. निरपेक्षपणे केलेलं ते दान असतं. ते साऱ्यांना समान वाटणीला येतं. 

नव्या वर्षात प्रकाशाकडून काही शिकलं पाहिजे. निरपेक्षता, समानता या मूल्यांनी आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत रुजवलं पाहिजे. 
प्रख्यात अमेरिकी कृष्णवर्णीय कवयित्री माया अँजेलू यांना उगवत्या दिवसाचं भारी वेड. त्यांच्या कवितेत सूर्य आणि प्रकाश नेहमी आशेचं रूप घेऊन अवतरतात. ‘इन ॲन्ड आऊट ऑफ टाईम’ या कवितेत त्या म्हणतात-

‘सूर्य अवतरलाय धुकं हटलंय दूर अंतरावर राहिलेलं घर आता दिसतंय...!’
कॅलेंडरवर बदललेल्या वर्षाच्या खुणेकडं या नजरेनं पाहायला शिकूया. प्रकाशाच्या स्वच्छ डोळ्यांनी वर्तमानाकडं पाहायला लागूया. नव्या वर्षातल्या नव्या आव्हानांसाठी एकेकीच्या हाताला बळ देऊया...! 

संबंधित बातम्या