Me too... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

नाक्‍यावर, बसमध्ये ऑफिसमध्ये पुरुष उभे, कंबर वाकडी करीत, 
डोळा मारीत, तरी त्यांना कोणी वेश्‍या म्हणत नाहीत.
- मल्लिका अमरशेख 

नाक्‍यावर, बसमध्ये ऑफिसमध्ये पुरुष उभे, कंबर वाकडी करीत, 
डोळा मारीत, तरी त्यांना कोणी वेश्‍या म्हणत नाहीत.
- मल्लिका अमरशेख 

समाजात हेच दिसतं. कवितेतून उमटतं. समाज स्त्री-पुरुष संबंधांबाबत पक्षपाती भूमिका घेतो किंवा स्त्रियांच्या जीवनाला समाजानं बंधनांची जोखड कशी मारून ठेवली आहे हे जाणवू लागतं. तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याचा काहीसा प्रयत्न होतो. एरवी ती सोसतच असते. बसमधून जाताना तिला नको तिथं धक्के बसतातच. विकृत नजरेचा सामना करणं हे रोज कुठेना कुठे तिच्या वाट्याला येतंच. कधी ती साधी तरी धाडसी असते आणि सरळ पायातली चप्पल काढून त्या विकृत नजरेला उत्तर देते. कधी ती समाजाच्या ‘सो कॉल्ड टॅब्यू’ मध्ये अडकते. स्त्री-पुरुषाच्या नातातल्या मोकळेपणाचं नाव घेत ही विकृती तिला मुकाटपणे सहन करावी लागते. 

खरं तर हा प्रश्न समाजातील सर्व जाणत्या लोकांना छळणारा आहे; पण तरीही सभ्य समजल्या जाणाऱ्या आपल्या संस्कृतीत, पुरुषांचं असं विकृत वागणं सहन केलं जातं. सोयीस्करपणे त्याकडे कानाडोळा केला जातो. त्यांना धडा शिकवण्याऐवजी मुळातच संकुचित असलेलं स्त्रियांचं जगणं आणखीनच सीमित केलं जातं आणि कालांतराने स्त्रियांनाही ते अंगवळणी पडतं. प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या समाजात अनेकदा तिला असे अनुभव येतात. सभ्यपणाचा बुरखा पांघरलेला माणूस आपल्यासमोर अश्‍लील चाळे करतो हे तिला दिसतं. मनात त्या व्यक्तीविषयी असलेल्या प्रतिमेचा चुराडा होतो, पण याची वाच्यता करणं तिला अवघड जातं. त्याची प्रतिष्ठा पाहता त्या व्यक्तीची वर्तणूक विकृत आहे, या आपल्या सांगण्यावर कोणी विश्‍वास ठेवेल का, हेच तिला समजत नाही. स्वतः अशा अनुभवांचा सामना करताकरताच तिची मुलगी वयात येते. तिला बाहेर पाठवणं धोक्‍याचं आहे, हे हिला समजत असतं. मात्र अडवणार तरी कुठपर्यंत?...घरापासून गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत जाईपर्यंतही विकृत नजर, अश्‍लील बोलणं, धक्के याचा सामना तिला पदोपदी करावा लागतो. मुलीच्या काळजीनं हिचं मन ग्रासतं. वयात येऊ घातलेली मुलगी समाजाच्या नव्या रूपात गोंधळलेली असते. यातली एखादी बळ एकवटते, अन्याय झाल्याचं बेधडक सांगते आणि मग सगळ्यांकडेच ते बळ येतं. समोरचीही म्हणते...‘मी टू...’

हॉलिवूड अभिनेत्री अलिसा मिलानो हिनं लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवण्याचं आवाहन बायकांना केलं. जर कधी लैंगिक छळवणुकीचा सामना केला असेल तर ‘मी टू’ हे दोनच शब्द लिहा असं तिनं ट्‌वीट केलं. तिच्या आवाहनाला प्रतिसाद देत बायका केवळ स्टेटस शेअर करून थांबल्या नाहीत तर त्यांनी त्यांचे अनुभवही लिहायला सुरुवात केली. याचा ट्रेंड बनला इतका हा प्रतिसाद होता. अनेक पुरुषांनाही जाणवलं, की कधी न बोलणारी आपली मैत्रीणही ‘मी टू’ म्हणून बोलते आहे.

भारतीय स्त्रीचा विचार केला तर इथंही ती संकोचलेली दिसली. इंटरनेटचा वापर करण्यात भारतात पुरुषांचं प्रमाण सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सोशल मिडियातून पसरलेला हा ट्रेंड अनेकांपर्यंत पोहोचलाही नाही. जिथं पोहोचला त्यातल्या काहींच्या दृष्टीनं पुरुषांची संख्या अधिक असणाऱ्या सोशल मिडियावर बोलण्याचं धाडस नव्हतं.

अर्थात बदलत्या चळवळीचं एक रूप म्हणून याकडे बघायला हवं. तिथं पहिल्याच वेळी शंभर टक्के प्रतिसाद अपेक्षित नाही. बाई अशी चळवळ करू शकते आणि बाई म्हणून होणाऱ्या शारीरिक अत्याचारावर आवाज उठवू शकते हा ‘मेसेज’ ही मिळणं ही देखील चांगल्या बदलाची एक सुरुवात आहे. ज्या विषयावर बोलण्याचाही संकोच वाटायचा त्या विषयावर बोलायला सुरुवात झाली आहे. तो आवाज वाढवायचा आहे. तो आवाज उठण्यासाठीचा आत्मविश्‍वास जागवायचा आहे!

संबंधित बातम्या