घराचं घरपण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

घर या विषयावर एक चर्चा सुरू होती. चर्चेला होते मुलांचा ग्रुप विरुद्ध मुलींचा ग्रुप. मुलगा म्हणून घराकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि मुलगी म्हणून असणारा दृष्टिकोन अगदीच भिन्न होते. परस्परविरोधी असं इथं म्हणता येणार नाही. कारण, मुलांना घरात निवांतपणा हवा होता, तर मुलींना शांतता. या निवांतपणामागं आरामाची भावना होती, तर शांततेमागं एकत्रित कुटुंबाचं सुरळीत चालणं होतं. घराचा केंद्रबिंदू म्हणून स्वयंपाकघराची निवड असा विषय आला तेव्हा तर हा फरक तीव्रतेनं जाणवला. नीटनेटकेपणाच्या गोष्टी मुलांच्या मनातही येत नव्हत्या. अनेकदा मुलांमध्ये स्वयंपाकाची आवड असते.

घर या विषयावर एक चर्चा सुरू होती. चर्चेला होते मुलांचा ग्रुप विरुद्ध मुलींचा ग्रुप. मुलगा म्हणून घराकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि मुलगी म्हणून असणारा दृष्टिकोन अगदीच भिन्न होते. परस्परविरोधी असं इथं म्हणता येणार नाही. कारण, मुलांना घरात निवांतपणा हवा होता, तर मुलींना शांतता. या निवांतपणामागं आरामाची भावना होती, तर शांततेमागं एकत्रित कुटुंबाचं सुरळीत चालणं होतं. घराचा केंद्रबिंदू म्हणून स्वयंपाकघराची निवड असा विषय आला तेव्हा तर हा फरक तीव्रतेनं जाणवला. नीटनेटकेपणाच्या गोष्टी मुलांच्या मनातही येत नव्हत्या. अनेकदा मुलांमध्ये स्वयंपाकाची आवड असते. ती मुलं स्वयंपाकघरात रमतातही; पण कायमच एखादी गोष्ट करण्यातला ‘पेशन्स’ त्यांच्यात नसतो, असं मुलांच्या मुद्द्यातून स्पष्ट होत होतं. मुली मात्र घरातल्या नीटनेटकेपणाचे मुद्दे मांडत होत्या. 

घर या एका शब्दापाठोपाठ कित्येक गोष्टी येतात. समाधान, एकत्र राहणं, नाती, विश्‍वास, बांधिलकी...मुलगा किंवा मुलगी म्हणून घराचा स्वतंत्र विचार होतही असेल; पण इथे समानतेचा प्रश्‍न कमी महत्त्वाचा राहतो. निसर्गतः असे असमान मुद्दे येऊ शकतात; पण दोन्हीही बाजू त्यांच्या त्यांच्या परीनं बरोबर असतात. घर हे प्रत्येकासाठी समाधानाचा स्रोत आहे.

बाहेर आलिशान ठिकाणी राहिल्यानंतरही घराची ओढ असते. घराशी जोडलेल्या भावनेमुळेच अनेक जण घराचं जुन रूप तसंच ठेवतात. काही जणं घरातल्या जुन्या वस्तू नव्या रूपात आणून वापरतात. घरात एक वास्तू पुरुष फिरत असतो आणि घरी असताना मनात जे येईल, त्याला तो तथास्तु म्हणतो, असं म्हटलं जातं. अध्यात्म किंवा अंधश्रद्धा यांच्याशी त्याची संगत न जोडता त्यातला अर्थ जाणून घेतला तर घरी आनंदात राहावं आणि पॉझिटिव्ह जगावं असाच निघतो. मनात चांगल्या इच्छा धरल्या, की तो त्यालाही तथास्तु म्हणतो आणि चांगलं घडतं, याचाच अर्थ चांगला विचार करा. मनातला वाईट विचारही हातून वाईट कृती घडवतो. त्यासाठी मूळ विचार करण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्थात, इथं अध्यात्मातले विचार मांडणं हा मुद्दा नाही; पण घरी आलं की मनाला शांतता लाभत असते आणि शांतता कुणाला नको असते? म्हणून घर असो, नोकरीचं ठिकाणं किंवा अगदी जगणं...शांतता आणि समतोल साधायला यायलाच हवा. स्टाइल, ट्रेंड, पद्धती किंवा अगदी फॅशनही त्याच्या मागून योग्य पद्धतीनं येत राहतील. 

नवं आर्थिक वर्ष...  
घरातल्या प्रत्येकाची धडपड ही घरासाठीच सुरू असते. करिअर करताना घराचा विचार होतो. घरासाठी आणि घरातल्यांसाठी पैसा मिळवावा लागतो. नव्या आर्थिक वर्षाला आता सुरवात झाली आहे. त्यामुळं घरासाठी किती पैसा मिळवायचा आहे, त्यासाठी बचतीचे मार्ग आणि कामातील बदल यांचा वेळीच विचार करायला हवा. याच अंकात आर्थिक वर्षातील नियोजनासाठी मार्गदर्शक ठरेल असा लेख घेतला आहे. त्यातून तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकता. योग्य नियोजनानं अनेक गोष्टी साध्य होतात. तुमचं अपेक्षित बजेट साध्य करा, तसं स्वतःसाठीची गंगाजळीही ठेवा. ती पैशाची असेल किंवा वेळेची. 

स्वतःसाठी थोडा वेळ काढताना प्रत्येकीलाच कठीण वाटत असतं. अशा काही जणींचे अनुभवही या अंकात आहेत. नोकरी, घर सांभाळणं हे प्रत्येकीलाच आहे; मात्र काही गोष्टींना वेळेत ‘नाही’ म्हणता आलं, तर स्वतःसाठी वेळ काढणं नक्की जमेल आणि त्याचा फायदा नक्कीच होतो, हेच या अनुभवांवरून लक्षात येतं.

कुटुंबव्यवस्थेचा स्वीकार करून स्वतःची स्वतंत्र जागा तयार करणं आणि त्यासाठीचं बळं मिळवणं, हे तर प्रत्येकीला करायलाच हवंय. तनिष्काचा यालाच पाठिंबा आहे.

संबंधित बातम्या