बदलाची प्रक्रिया... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

आई, कधी कधी राक्षस वाटते. लहान मुलांच्या परिसंवादात एक मुलगा मोकळेपणानं सांगत होता. घर आणि कुटुंब यांच्याबद्दल मुलांच्या भावना समजून घेणारा तो परिसंवाद होता. ‘आई कधी चांगलीही वागते आणि मग मला ती आवडते,’ असं सांगायलाही तो विसरला नाही. मुलांची मते ऐकता ऐकता वाटत होतं, वीस वर्षांमागील पिढी बघितली तरी तेव्हाचा आठ-दहा वर्षांचा मुलगा हे बोलू शकत होता का?

आई, कधी कधी राक्षस वाटते. लहान मुलांच्या परिसंवादात एक मुलगा मोकळेपणानं सांगत होता. घर आणि कुटुंब यांच्याबद्दल मुलांच्या भावना समजून घेणारा तो परिसंवाद होता. ‘आई कधी चांगलीही वागते आणि मग मला ती आवडते,’ असं सांगायलाही तो विसरला नाही. मुलांची मते ऐकता ऐकता वाटत होतं, वीस वर्षांमागील पिढी बघितली तरी तेव्हाचा आठ-दहा वर्षांचा मुलगा हे बोलू शकत होता का?

आईपण बदलतंय की आजूबाजूची परिस्थिती?
आता मुलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याच परिसंवादात आईचाही सहभाग होता. एका आईनं सांगितलं, ‘‘माझा मुलगा म्हणाला, तू सारखी वेस्टर्न कपडे का घालतेस?’’ काही मुलांना आई साधी वागायला हवी होती, तर काही मुलांना मॉडर्न आई हवी होती. 

आईबद्दल इतक्‍या मोकळंपणानं विचार व्यक्त करता येणं हाच खरंतर एक मोठा बदल म्हणायला हवा. 

बदल हा आवश्‍यकच असतो, अगदी प्रत्येक गोष्टीसाठी़; मात्र तो त्या-त्या वेळेसाठी किती पोषक आहे, हेदेखील वेळोवेळी तपासून घ्यायला हवं. बदल झाला नाही, तर प्रगतीच्या दिशा खुंटतील. सध्याच्या काळाचा विचार केला तर पिढीतलं अंतर कमी होत आहे. दोन पिढ्या मग त्या कितीही कमी अंतराच्या असल्या तरी त्यात विचारांची तफावत राहतेच. बदलत असणाऱ्या समाजाचा आणि सभोवताली दिसणाऱ्या वातावरणाचा तो फरक असू शकेल. 

काही गोष्टींत मात्र परंपरेचं नाव देत बदल करणं टाळलं जातं. बायकांच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर रुढी-पंरपरा. ‘आपल्याकडची परंपरा आहे ती...’ अशा गोंडस वाक्‍याखाली बाईला अनेकदा जाचक रुढींमध्ये अडकवलं जातं. इतरांचं मन सांभाळणं किंवा घरावरचं प्रेम या भावनांच्या नादात तीही या परंपरा सांभाळण्यासाठी राबत राहते. याला विरोध करणं म्हणजे आपणच काहीतरी चूक करतो असा ती स्वतःचा समज करून घेते. नाशिकमधला एक ग्रुप ट्रेकिंगसाठी जाणार होता. सुरवातीला सात-आठ मैत्रिणींनी त्या ग्रुपबरोबर जायचं नक्की केलं. चार दिवसांनी एक जण गळाली. मग दर दोन-चार दिवसांनी एक या प्रमाणात शेवटी त्यातली एक जणच ट्रेकला जाऊ शकली. उरलेल्या सातही जणींचं घरची जबाबदारी हे कारण होतं. कुणाचे सासू-सासरे आजारी होते. कुणाला नवऱ्यानं नको सांगितलं. कोणाच्या मुलाला सांभाळण्या प्रश्‍न होता. मुलं जसं माझं आहे, तसंच नवऱ्याचंही आहे.

त्यानं आठ दिवस त्याला सांभाळण्याची व्यवस्था करावी, हे सांगण्याचं धाडस आठमधल्या एकीकडचं असावं हे धक्कादायक आणि अन्यायाचंही आहे. तरीही याची जाणीव न होता, मी नवऱ्याबरोबर जाईन किंवा नंतर कधीतरी जाऊ, अशीच जगाची आणि स्वतःच्या मनाचीही समजूत करून दिली जाते. एकूणच बाई बदलते आहे. बाईमधली आई बदलते आहे. उरतो तो स्वतःमधल्या बदलाचा प्रश्‍न. याच्यावर कधीतरी प्रत्येक बाईनं स्वतःचं विचार करायला हवा. आपल्याला खरं स्वातंत्र्य आहे का? आपण त्या स्वातंत्र्याची जबाबदारी घेतो आहोत का? करिअरचे निरनिराळे पर्याय समोर येत आहेत, ते आपण स्वीकारतो का? ते स्वीकारण्यासाठी पाठबळ हवं आहे का? ते दिलं जातं का? की नुसतीच तू मोकळी आहेस, असं सांगून परंपरेची बंधनं लादली जातात?...

प्रश्‍न न संपणारे आहेत. उत्तरं तर शोधावी लागतीलच. बदल हवाच आहे, तो होत राहणार आहे. आपल्यालाही तो करायचा आहे. 

संबंधित बातम्या