त्या बोलल्या अन्‌ रॅम्पवॉकवरही रमल्या... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

पुण्यातील महिला नेत्यांच्या उपस्थितीत "तनिष्का' दिवाळी अंकाचे प्रकाशन 

पुण्यातील महिला नेत्यांच्या उपस्थितीत "तनिष्का' दिवाळी अंकाचे प्रकाशन 

पुणे - राजकारणात येताना मिळालेली कुटुंबीयांची साथ, त्यांच्या बळावर केलेली दमदार राजकीय वाटचाल, राजकीय प्रवासातील अनुभव, सभागृहातील पक्षीय भूमिका इथपासून राजकारणापलीकडची मैत्रीची नाती उलगडली... अशा वेगवेगळ्या मुद्यांवर पुण्यातील सर्वपक्षीय नगरसेविका समरसून बोलल्या. रोजच्या धावपळीतून आपल्यासाठी रॅम्पवॉकवरही उतरल्या आणि कार्यक्रमाला दिमाखाचे कोंदण लाभले. निमित्त होते "सकाळ तनिष्का मासिका'च्या "तनिष्का दिवाळी अंकाच्या प्रकाशना'चे. या अंकाचे प्रकाशन महापौर मुक्ता टिळक, खासदार वंदना चव्हाण, अभिनेत्री अश्‍विनी कुलकर्णी आणि नूपुर दैठणकर यांच्या हस्ते झाले. 

काही नगरसेविकांनी आपले राजकारणातील अनुभव शेअर केले. या सर्वांमध्ये लक्षवेधी ठरला तो नगरसेविकांचा रॅम्पवॉक. प्रत्येकाच्या स्टाइलने उपस्थितांची दाद मिळवली. महापौर टिळक आणि खासदार चव्हाण या दोघींनी केलेल्या रॅम्पवॉकने उपस्थितांची मने जिंकली. मॉडेल व अभिनेते सचिन गवळी यांनी नगरसेविकांशी संवाद साधला. 

माजी आमदार दीप्ती चवधरी, नगरसेविका अश्‍विनी कदम, वैशाली बनकर, रूपाली चाकणकर, "सकाळ'च्या वतीने संचालक-संपादक श्रीराम पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, पुण्याचे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार आणि "तनिष्का मासिका'च्या सहसंपादक मंजिरी फडणीस उपस्थित होते. चिंतामणी ज्ञानपीठचे संस्थापक अप्पा रेणुसे आणि प्राईड पर्पल ग्रुपचे संचालक अरविंद जैन यांनी विशेष सहकार्य केले. पु. ना. गाडगीळ अँड सन्सकडून कार्यक्रमात आलेल्या नगरसेविकांना गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. 

राजकारण विसरून सर्व नगरसेविका एकत्र आल्याचा आनंद आहे. एकमेकांविषयी छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेण्यासह एक मैत्रीचा बंध जुळतो. 
- मुक्ता टिळक, महापौर 

मला दोन्ही मुली आहेत. त्या आज स्वतःच्या पायावर ठाम उभ्या आहेत. मुलगी नको, असा विचार करणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. 
- ऍड. वंदना चव्हाण, खासदार 

नगरसेविकांना एकत्र आल्याचे पाहून आनंद वाटला. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने "सकाळ'ने उचलले पाऊल वाखाणण्याजोगे आहे. 
- अश्‍विनी कुलकर्णी, अभिनेत्री 

महिलांनी एकत्र येऊन एका व्यासपीठावर विचार मांडणे हे सक्षमीकरणाच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे. या कार्यक्रमात तेच पाहायला मिळाले. 
- नूपुर दैठणकर, अभिनेत्री

संबंधित बातम्या