मोरक्कन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पाश्‍चात्त्यांचं आक्रमण अशा नावाखाली सध्या तरुण पिढीला अनेकदा धारेवर धरलं जातं. प्रत्यक्षात परदेशातली संस्कृती भारतासारखी आहे का? तिथं एकत्र कुटुंबपद्धती आहे की विभक्त? अशा अनेक प्रश्‍नांसह वेगवेगळ्या देशांतील कुटुंबपद्धती, परंपरा आणि संस्कृती याबद्दल सांगणारं हे सदर... 

मोरोक्को देशाची ओळख किंगमडम ऑफ मोरोक्को अशी सांगितली जाते. मोरोक्को हा पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश; पण तरीही आता विमानतळावर काम करणाऱ्या मोरक्कन स्त्रिया व त्यांच्यापैकी बऱ्याच जणींनी घातलेले पाश्‍चात्त्य पोशाख बघून तिथल्या स्त्रियांच्या स्वतंत्रपणाची जाणीव होते.  

पाश्‍चात्त्यांचं आक्रमण अशा नावाखाली सध्या तरुण पिढीला अनेकदा धारेवर धरलं जातं. प्रत्यक्षात परदेशातली संस्कृती भारतासारखी आहे का? तिथं एकत्र कुटुंबपद्धती आहे की विभक्त? अशा अनेक प्रश्‍नांसह वेगवेगळ्या देशांतील कुटुंबपद्धती, परंपरा आणि संस्कृती याबद्दल सांगणारं हे सदर... 

मोरोक्को देशाची ओळख किंगमडम ऑफ मोरोक्को अशी सांगितली जाते. मोरोक्को हा पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश; पण तरीही आता विमानतळावर काम करणाऱ्या मोरक्कन स्त्रिया व त्यांच्यापैकी बऱ्याच जणींनी घातलेले पाश्‍चात्त्य पोशाख बघून तिथल्या स्त्रियांच्या स्वतंत्रपणाची जाणीव होते.  

आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असणारा हा देश १९५६ मध्ये स्वतंत्र झाला. त्या आधी तिथे फ्रेंच राजवट होती. देशातील बहुतांशी लोक बर्बर किंवा अरब, थोडेफार आफ्रिकन व बरेचसे फ्रेंच आहेत. आज मोरोक्कोमध्ये बर्बर, अरब, आफ्रिकन व फ्रेंच या चारही संस्कृतीचे सुरेख मिश्रण बघायला मिळते. 

या देशात बहुतेक ठिकाणी विशेषत: लहान गावात एकत्र कुटुंबपद्धती दिसून येते. आपले कुटुंब म्हणजे या लोकांचे सर्वस्व आहे. घरातील मुले ही त्यांच्या दृष्टीने शुभशकुन असतात. मूल झाले म्हणजे स्त्रीजन्माचे सार्थक झाले, असे मानणाऱ्या मोरक्कन स्त्रिया म्हणतात, की मुलांमुळेच आमच्या जीवनाला अर्थ मिळतो, कुटुंबात मान मिळतो व आमचे अस्तित्व टिकून राहते, त्यामुळेच जरा ओळख झाल्यावर तुम्हांला मुले किती? हा त्यांचा प्रश्‍न ठरलेलाच असतो.

मोरोक्कोमध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्‍तींना अतिशय मानाने वागवले जाते. एकत्र कुटुंबपद्धतीत त्यांच्या सल्ल्याने व सूचनेनुसार घर चालवले जाते. घरातील आजी-आजोबा मुलांची काळजी घेतात. त्यामुळे त्यांच्या आयांना स्वयंपाक, बाजारहाट, भाजीपाला, मुलांच्या शाळा या गोष्टींकडे लक्ष देता येते. मोरक्कन स्वयंपाक हा खूप वेळखाऊ आणि किचकट असतो. तो शक्‍यतो घरची बाईच करते. सर्वसाधारणपणे एका जोडप्याला तीन ते चार मुले असतात. सधन कुटुंबात प्रत्येक मुलाला सांभाळायला एक नानी ठेवलेली असते. नानीचे काम तसेच घरकाम करण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातल्या मुली शहरात येतात. अतिशय गरिबी व शिक्षणाचा अभाव यामुळे शहरात जाऊन अशी कामे करण्यावाचून त्यांना पर्याय नसतो.

घरातील पैशाअडक्‍याचे व्यवहार पुरुषांच्या हातात असतात. पुरुषांनी कोणत्याही घरकामात मदत करण्याची तिथे पद्धत नाही. त्यामुळे आपले काम संपले, की ते आपापल्या मित्रमंडळींबरोबर क्‍लबमध्ये वा कॅफेमध्ये जाणे पसंत करतात. आजही तिथे काही ठिकाणी व कॅफेजमध्ये स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. 

इथल्या कायद्यांमध्ये आता स्त्रियांच्या बाजूने खूप चांगले बदल झाले आहेत. कायद्याने मुलीच्या लग्नाचे वय अठरा वर्षे केले आहे. लग्नानंतर तिला कुटुंबात मुले व इतर काही बाबतीत पुरुषांच्या बरोबरीने हक्क देण्यात आले आहेत. मोरक्कन पुरुषांना दुसरे लग्न करता येते; पण त्यासाठी पहिल्या बायकोची संमती घ्यावी लागते. आमच्या तिथल्या वास्तव्यात अनेक पुरुषांनी फ्रेंच स्त्रियांशी दुसरे लग्न केल्याचे पाहण्यात आले. अर्थात ती दुसरी बायको एकत्र कुटुंबात न राहता तिच्यासाठी वेगळे घर करून दिले जाते. 

मोरक्कन संस्कृतीवर व इतर गोष्टींवर फ्रेंच संस्कृतीचा पगडा जास्त दिसून येतो. तरुण पिढीतील बरेच जण लग्न झाल्यावर मुख्य घरातून बाहेर पडून दुसरीकडे राहणे पसंत करतात. बायको शिकलेली, नोकरी करणारी असते. त्यामुळे त्यांचे विचारही बदललेले असतात. वेगळे राहण्याच्या त्यांच्या निर्णयाचा व त्यांच्या मताचा मुख्य घरी आदर केला जातो.

बहुतेक सर्व स्त्रियांचा दर आठवड्याला हमाममध्ये जाण्याचा कार्यक्रम असतो. हमाम म्हणजे बाथ हाउसेस. स्टीम, बॉडी स्क्रब, केसांची व पावलांची निगा, मसाज आणि शॉवर असा सगळा प्रकार असलेल्या हमाममध्ये आपले सौंदर्य जपण्यासाठी त्या खूप वेळ घालवतात. मोरक्कन स्त्रिया आपल्या पावलांची विशेष काळजी घेतात. हमाममध्ये त्यांना मैत्रिणी भेटतात, त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची संधी मिळते. घराबाहेर पडण्यासाठी या स्त्रियांना अशी कारणे शोधावी लागत होती. महिलांचे ‘किटी ग्रुप’, ‘भिशी’ अशी नावेही आधीच्या पिढीतल्या स्त्रियांना माहीत नाहीत.

त्यामानाने शहरातील स्त्रियांचे व मुलींचे विचार बदलत आहेत. शिक्षणामुळे त्यांच्यात एक प्रकारचा आत्मविश्‍वास दिसून येतो. त्या आज अनेक क्षेत्रांत स्वतंत्रपणे काम करताना दिसतात. मला भेटलेल्या काहीजणी फारशा शिकलेल्या नसल्या, तरी विचाराने पुढारलेल्या होत्या. त्या सांगत होत्या, की हल्लीच्या मुलींसारखे स्वातंत्र्य त्यांना कधीच मिळाले नाही. आम्हांला शाळा सोडून कुठे बाहेरही जाता आले नाही, की शिक्षणही पूर्ण करता आले नाही. मात्र, हल्ली आम्हाला आमचे स्वातंत्र्य व आमच्यातल्या गुणांची ओळख होऊ लागली आहे. आम्ही मुलींसोबत जातो, त्यामुळे आम्हांला बाहेरचे जग बघता व अनुभवता येते.

टेनिस क्‍लबवर टेलिफोन ऑपरेटरचे काम करणाऱ्या हिनाशी माझी ओळख झाली. तिचे विचार मला खूप प्रगत वाटले. तिला लग्नाच्या बंधनात न अडकता स्वत:च्या हिमतीवर जगायचे होते. तिच्या या निर्णयाला घरातून संमती होती. या विचारांसह ती एकत्र कुटुंबात राहत होती, घरून येताना मोरक्कन पोशाख घालत होती. या गोष्टी मला तिच्या विचारांशी फार विसंगत वाटल्या.

‘आदरातिथ्य’ हा या संस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग आहे. आपले घर, विशेषत: स्वयंपाकघराचा मोरक्कन गृहिणींना अतिशय अभिमान असतो. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांना घर व स्वयंपाकघर दाखवणे हा तिथला एक कार्यक्रम असतो. पाहुण्यांबरोबर जेवायला बसण्याचा मान घरातील मोठ्या स्त्रीचा असतो. सर्व जण स्थानापन्न झाल्यावर त्या टाळी वाजवतात, नंतरच भोजनास प्रारंभ केला जातो. घरातील पुरुष मात्र त्या कार्यक्रमात अजिबात सहभागी होत नाहीत. 

पारंपरिक मोरक्कन घरे ही आपल्याकडील वाड्याच्या धर्तीवर बांधलेली असतात. मध्यभागी मोकळी जागा. त्या जागेत एक कारंजे किंवा पाँड असतो. त्याभोवती खोल्या बांधलेल्या असतात. घरे उंची पडदे, गालिचे, दिवे, सुरया अशा अनेक गोष्टींनी सजवलेली असतात. ठिकठिकाणी अप्रतिम कवडीकाम हे इथल्या घरांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. बहुतेक वेळा जेवणानंतरचा चहापानाचा कार्यक्रम कारंज्याशेजारी होतो.

तिथल्या वास्तव्यात एका मोरक्कन लग्नसमारंभास जाण्याचा योग आला. 
इथली लग्नाची परंपरा काहीशी आपल्या देशासारखी आहे, तर काही गोष्टीत वेगळेपण आढळते. आपल्यासारखाच त्यांचा नातेवाइकांचा गोतावळा खूप मोठा असतो. अशा प्रसंगी ते सर्व जण आवर्जून हजेरी लावतात. इथे पूर्वापार सून पसंत करण्याचे काम हे मुलाच्या आई-वडिलांचे असते; पण हल्ली यात बदल झाला असून नवीन पिढीतील मुले आपला जोडीदार स्वत:च निवडतात.
मोरक्कन लग्न चांगले सात-आठ दिवस चालते. त्यात नवऱ्या मुलाकडून हुंडा (डावरी) मिळण्याचा कार्यक्रम, मेंदी, संगीत, दुधाची अंघोळ अशासारखे सात समारंभ असतात. त्या सातांपैकी काही समारंभ फक्‍त स्त्रिया, तर काही फक्‍त पुरुषांचे असतात.

लग्न ठरल्यावर मुलगा आपल्या भावी पत्नीला अंगठी तर आणतोच; शिवाय तिला सोन्याचे दागिने, उंची कपडे, अत्तरे, पर्सेस, सौंदर्यप्रसाधने, कप्तान अशा वेगवेगळ्या भेटवस्तू, डावरी, देण्याची पद्धत आहे. डावरीमध्ये सुगंधी पाणी, केशरी फूल, मेंदी, खजूर, साखर आणि दूध अशा प्रतीकात्मक भेटवस्तू असतात. साखर ही सुखी संसाराचे तर दूध हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते.

लग्नाच्या आधी दोन दिवस नवरी मुलगी आपल्या मैत्रिणी आणि नातेवाइकांबरोबर हमाममध्ये जाते. काही वेळा हमाममध्येच पारंपरिक संगीताच्या साथीत दुधाच्या अंघोळीचा समारंभ साजरा केला जातो. मुलीला लग्नाच्या आधी दुधाने अंघोळ घालून शुद्ध करण्याची पद्धत असून तिला या कामी घरातील ज्येष्ठ महिला मदत करतात.

मेंदीचा कार्यक्रम काहीसा आपल्यासारखाच असतो. त्या वेळी घरातील सर्व महिला आपल्या हातावर व पावलांवर मेंदी काढून घेतात. नाच व गाणी हा मेंदीच्या वेळचा अविभाज्य भाग असतो. लहान मुलींपासून घरातील ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्व जण त्यात उत्साहाने भाग घेतात.  या कार्यक्रमाच्या वेळी नवरी मुलगी शक्‍यतो हिरवा पोशाख घालते. तिचे भावी आयुष्य सुखी जावे यासाठी तिच्या हातावर मेंदीने काही प्रतिकात्मक चित्रे काढली जातात. 

मुख्य लग्नसमारंभाला येताना मुलीला ‘अमरिया’मध्ये बसवून व मुलाला मित्रांच्या खांद्यावरून आणले जाते. ‘अमरिया’ म्हणजे ‘सजवलेला मेणा’ म्हटले तरी चालेल. त्या वेळी नवरी मुलगी खूप जरीकाम केलेला शक्‍यतो पांढऱ्या रंगाचा जलेबा, पायघोळ कप्तान परिधान करते. मोरक्कन स्त्रियांना दागिन्यांचा भारी सोस असतो. लग्नात सर्वच स्त्रिया चांगल्या घसघशीत दागिन्यांनी मढलेल्या असतात. लग्न समारंभाच्या वेळी त्या सिल्क सॅटिन शिफॉन अशा उंची कापडापासून बनवलेले व जरीकाम केलेले कप्तान परिधान करतात.

या सगळ्या समारंभांच्या वेळचे जेवण म्हणजे तर काही विचारायलाच नको. चिकन पाय, टॅजिनमधले विविध पदार्थ व माश्‍वी हा मटणाचा पदार्थ लग्नाच्या जेवणात हमखास असतोच. त्याशिवाय अनेक शाकाहारी व गोड पदार्थ केले जातात. नाचगाणी आणि उत्तमोत्तम मोरक्कन पदार्थ यांच्या संगतीत संध्याकाळी सुरू झालेले लग्न कित्येक वेळा पहाटेपर्यंत चालू असते. पारंपरिक पद्धतीप्रमाणे नवरा-नवरीची वाजतगाजत वरात काढली जाते.

आपल्या नव्या घरी आल्यावर नवरी मुलगी त्या घराला तीन वेळा प्रदक्षिणा घालते. दूध व खजूर हे स्वागत व ममता यांचे प्रतीक असल्यामुळे मुलाची आई दूध आणि खजूर देऊन सुनेचे स्वागत करते व तिला घरात घेऊन जाते.

आज तिथल्या लोकांची विचारसरणी खूप बदलली आहे. कुटुंब, समाज व पुरुषसत्ताक संस्कृती यात अनुकूल बदल होत आहेत. अर्थार्जनामुळे स्त्रियांचा आत्मविश्‍वास वाढतो आहे. त्यांना आपल्या हक्कांची जाणीव होऊ लागली आहे. तरीही बरीच मोरक्कन कुटुंबे रूढी-परंपरेला धरून वागताना दिसतात. त्यांची मानसिकता म्हणावी तितकी बदललेली नाही. सामाजिक आणि धार्मिक बंधने झुगारून काही करण्याचे धैर्य त्यांच्यात नसते. असे असले तरी मोरक्कन कुटुंबे व कुटुंबपद्धती ही प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत आहे, ही गोष्ट नाकारून चालणार नाही.

संबंधित बातम्या