कोवळी कळी माझी 

श्रुती पानसे
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

आईपण अनुभवणं, हा एक वेगळाच अनुभव असतो. छोट्याशा बाळाला सांभाळायला जमेल का, याचा आत्मविश्‍वास अनेकदा नसतो. तान्हुल्याची माया खूप काही शिकवते. आईचं जगच बदलून जातं. आईपणाचा हा अनुभव... 

पहिल्यापासूनच डायरी लिहिते; म्हणजे अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून. मी रोज रात्री झोपताना हे एक काम करतेच. दिवसभरात काय घडलं त्याची उजळणी होते. कधी छान अनुभव असतात, तर कधी छळणारे अनुभव; पण मी लिहितेच. गेल्या दोन महिन्यांपासून मात्र फिरकलेच नाही डायरीकडे.

आईपण अनुभवणं, हा एक वेगळाच अनुभव असतो. छोट्याशा बाळाला सांभाळायला जमेल का, याचा आत्मविश्‍वास अनेकदा नसतो. तान्हुल्याची माया खूप काही शिकवते. आईचं जगच बदलून जातं. आईपणाचा हा अनुभव... 

पहिल्यापासूनच डायरी लिहिते; म्हणजे अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून. मी रोज रात्री झोपताना हे एक काम करतेच. दिवसभरात काय घडलं त्याची उजळणी होते. कधी छान अनुभव असतात, तर कधी छळणारे अनुभव; पण मी लिहितेच. गेल्या दोन महिन्यांपासून मात्र फिरकलेच नाही डायरीकडे.

बाळ झाल्यानंतर सगळे दिवसच बदललेत. जे काही ठरवलेलं असतं ते काही करताच येत नाही. या आधी माझ्या डायरीने माझं करिअर, माझी स्वप्नं, माझा अभ्यास याबद्दल खूप काही ऐकलंय. दोन महिने मात्र थंड गेलेत. ती म्हणत असेल, नेहा काय करतेय सध्या? पहिले काही दिवस-महिने काहीच कळत नव्हतं. भंजाळल्यासारखं झालं होतं अक्षरश: पण आता दोन महिन्यांत मात्र बाळाला कसं सांभाळायचंय, हे मला किंचितसं कळू लागलंय, त्यामुळे पाच-सात मिनिटं का होईना, मी रोज हिच्याकडे वळणार आहे. माझं एका अगदी नव्या क्षेत्रात पदार्पण झालं आहे. वाटलं होतं त्यापेक्षा हा जॉब फारच वेगळा आहे. डे शिफ्ट-नाईट शिफ्ट दोन्ही सुरू आहे. हेच सगळं मी डायरीला सांगत राहणार आहे. रोज नाही; पण कधीतरी..!

२ फेब्रुवारी
दिवस कसा जातो आणि रात्र कशी संपते, हेच कळत नाही. बरं झालं, मी आईकडे आहे, इथे आजी, आजोबा, बाबा आहेत. सगळे मिळून बाळाची काळजी घेतो. नवरा रोज संध्याकाळी इथेच असतो. बाळाशी बोलायला आणि तिला सांभाळायला शिकतोय तो. तशी मीही या क्षेत्रात नवीनच आहे. दोनच तर महिने होताहेत बाळ होऊन; पण मला त्याच्यापेक्षा जास्त समजतं, असं मला उगीच वाटतं. 

५ फेब्रुवारी
खूप थंडी आहे. सारखे कपडे ओले. कितीही बदलले तरी.  किती त्रास होत असेल तिला थंडीचा. बाकी वेखंडाचा वास मस्त येतोय बाहेरच्या खोलीतून.  या गुलाबी थंडीतली छानदार झोप..! जाऊ दे, आवरा स्वत:ला..!

६ फेब्रुवारी 
आज मैत्रिणीने मला फोन केला आणि म्हणाली, ‘सध्या व्हॉट्‌स ॲप बघत नाहीयेस का तू?’ मी म्हटलं तिला, ‘त्याच्यापेक्षा खूप काही वेगळं आणि मस्त चाललंय माझ्या आयुष्यात.’  खरंच, नवा सिनेमा कळत नाहीये, नवी गाणी मी गुणगुणत नाहीय. फक्त माझी बाळी. नेट बघितलं तरी गुगलवर ‘टू मंथ्‌स बेबी’ असं टाकून काहीतरी बघत असते. बाळांची डेव्हलपमेंट, घ्यायची काळजी, त्यांच्यासाठीच्या वस्तू. माझा विषय केमिस्ट्री असल्यामुळे डेव्हलपमेंट आणि त्यासाठीची केमिकल्स याचा संदर्भ नव्यानेच लागतो आहे. माझ्या विषयाच्या नवीन शाखेचा अभ्यास करायला मस्त वाटतंय. 

८ फेब्रुवारी
आजचा दिवस मस्त गेला. नेटवर शोधून आम्ही बाळीचं नाव ठरवलं. साकुरा. हे नाव जपानी आहे. तिथल्या फुलांच्या तूला ‘साकुरा’ म्हणतात. आम्हाला दोघांना एकदमच आवडलं. सगळ्यांना आवडलं. लगेच म्हणायला सुरुवातही केली.

९ फेब्रुवारी
‘साकुरा’ नावानं वेड लावलंय. याड लागलंय म्हटलं तरी चालेल! इतकं वेगवेगळ्या पद्धतीने म्हणून बघतोय आम्ही हे नाव. गंमत वाटते. साकुरा नावाची एक नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यासारखं वाटतंय. डिअर साकुरा, कायकाय करायचंय आपल्याला छानछान. पोहायला जायचंय, गडावर जायचंय. मी इतकं कायकाय सांगते. आजीही भरपूर बोलते तिच्याशी. मी आजच वाचलंय की, आपण बाळांशी जे बोलतो, त्याची मदत त्यांना भाषा शिकायला होते. इतक्‍या लहानपणी भाषाशिक्षण; पण खरंय ते. म्हणून आम्ही ठरवलंय, छान गप्पा मारायच्या तिच्याशी. मोबाईलचे, टीव्हीचे आवाज मात्र लांबच ठेवलेत तिच्यापासून.  

११ फेब्रुवारी
आज डॉक्‍टरांकडे गेलो होतो. तिथे एक सव्वा महिन्याचं छोटं बाळ आलं होतं आई-आजीबरोबर. त्याचे कान टोचून घेतले होते आणि ते कानातलं टोपड्यात अडकलं म्हणून त्याच्या इवल्याश्‍या कानाला जखम झाली होती. खूपच वाईट वाटलं. नंतर या बाबतीत डॉक्‍टरांना विचारलं, तर त्यांनी वेदनारहित गनची माहिती सांगितली. बरं वाटलं ऐकून. बाळाचं टोपडं सुटलं की बघू नंतर वर्षभरानं! 

१२ फेब्रुवारी
आज माझं बाळ २ महिन्यांचं झालं. बरोब्बर १२ डिसेंबरला सकाळी ६ वाजून १५ मिनिटांचा तिचा जन्म आहे. मला बरोबर त्याच वेळेला तिचा हात हातात घेऊन तिला ‘विश’ करायचं होतं. एकदम फिल्मी स्टाईल..! मेरी बेटी, मेरी साकुरा, मेरी सिमरन, तू तो अपनीही जिंदगी जियेगी...! वगैरे वगैरे... पण नेमकी पहाटे चार वाजता ती उठली. ती उठली म्हणून मग काय मीही उठले.

तिचे सगळे कपडे ओले झाले होते. ते बदलले. मला तो सिनेमा बघतानाही काजोलएवढीच तिची आई फरिदाही आवडलेली. व्व्वा! आई असावी तर अशीच. पण ही माझी सिमरन मला फारफार जागवते. खरं तर असं म्हणावं लागेल की, हल्ली माझी काही झोपण्याची उठण्याची वेळच राहिलेली नाही.

मी कधीही झोपते आणि कधीही उठते. एरवी मी कधी कोणासाठी पहाटे चारला वगैरे उठण्याची काही शक्‍यताच नव्हती. नाहीच! एक वेळ मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी जागलेली आहे; पण ते जागरण वेगळं आणि पहाटेबिहाटे उठणं वेगळं. एकदा झोपले की झोपलेच. सूर्य उगवल्यावर खूप वेळाने मी उठणार. हीच माझी वर्षानुवर्षाची सवय. आता सगळंच बदललं आहे. 

ही रात्री बारासाडेबाराला झोपली. मग मी झोपले. ही दोन वाजता उठली. अर्थातच मीही. बरं झालं ही १५ मिनिटांतच पुन्हा झोपली. मलाही लगेच झोप लागली. आता मला वाटलं, ही निदान सहापर्यंत झोपेल पण नाही! चारलाच उठली. मी पण... ही काय झोप म्हणायची? सहा वाजता हिच्यासाठी उठून ‘हॅपी बर्थ डे टू यू’ म्हणायचं होतं; पण साडेचारला झोपली ते थेट सातला उठली. आणि मला...मला सव्वासहाला जाग आलीच नाही. हिच्या आवाजानेच जाग आली. तेव्हा सात वाजले होते. ती भुकेनेही रडत होती आणि कपडे ओले झाले म्हणूनही! नुसतं जोरजोरात भोकाड! काही सुचू देईना! सगळं झाल्यावर मिनिटाभरात पुन्हा डाराडूर! कसलं हॅपी बर्थ डे आणि कसलं काय! पण एक आहे.. ती झोपताना, झोपल्यावर, रडताना, ओरडताना सर्व वेळ फारच गोड दिसते. टकलंच आहे अजून; पण किती गोड दिसावं माणसानं; नव्हे पिल्लानं; नव्हे एका मुलीनं..! माझी ती ठकी..! माझी बार्बी..! माझी रपुन्झेल.. ! कसं वाटेल ना... केसांचा पत्ता नसलेली सुंदर रपुन्झेल..! त्या रपुन्झेलची तर किती लांब वेणी आणि आमची ही अशी! झबलं- टोपडं-दुपट्यात गुंडाळलेली आणि सदानकदा झोपलेली बाळी! गुळाचा खडा... नाही गुळाची खडी.. ई.. खडी काय? जाऊ दे! मलाही पुन्हा झोप येते आहे!

१४ फेब्रुवारी
कोण कुठला सेंट व्हॅलेंटाईन; पण त्याच्या नावाने मनात कोणाकोणाविषयी प्रेम जागतं, हे मात्र खरं. कॉलेजमध्ये असताना मित्रमैत्रिणींबरोबर साजरा केलेला दिवस. गेली काही वर्षं फक्त नवऱ्याबरोबर आणि या वर्षी साकुराबरोबर साजरा केला आजचा दिवस..! लव्ह यू साकुरा..!

२२ फेब्रुवारी
सगळे जण माझ्या चिमण्या साकुरावर आपापला अजेंडा राबवताहेत. आतापासूनच. त्यात मीही आलेच. मी तिला म्हटलं, ‘साकुरा, तू मोठी झाल्यावर माझ्यासारखीच केमिस्ट्रीची प्राध्यापक होणार ना!’ तर ती म्हणाली, ‘नाही, ती स्पोर्टस्‌मध्ये जाणार.’ बाबा म्हणाले, ‘काहीही झाले तरी खूप हुशार होणाराय.’ आई म्हणाली, ‘मी तर तिला गणित शिकवून गणितज्ज्ञ बनवणार आहे.’ आजी कोपऱ्यात बसून नुसतीच खुसुखुसु हसत होती. जणू तिला म्हणायचं होतं, तुम्ही काहीही म्हणा, कल्पनांचे कितीही इमले बांधा, तिला जे हवं तेच ती करणार. तिच्या आवडीचं क्षेत्र कोणतं, हे कुठे माहितीये तुम्हाला? आजी बोलली मात्र काहीच नाही. 

२५ फेब्रुवारी
गेले दोन दिवस रात्रीची पूर्णच जागरणं. रखवालदार काकांचं काम काय असतं कळलं मला. कोणी चोर येत नाही ना, हे बघत जागत राहायचं. स्वत:लाच ‘जागते रहो’ म्हणायचं. जोरजोरात. तिला झोप येते का, हे बघत रात्रभर जागते. ही टक्क जागी. बरं झालं! रडारड नाही म्हणून. नुसतंच जागं. इकडेतिकडे टुकुटुकु बघत. रात्री बारा ते चार. छान ड्युटी. कॅमेरा असता तर बरं झालं असतं. मोठी झाल्यावर हिला दाखवलं असतं, बघ! किती जागरणं केली मी तुझ्यासाठी. किती गाणी म्हटली. अंगाईगीतं म्हटली, रात्रीची गाणी झाली, चंद्रावरची गाणीही म्हणून झाली. मैत्रिणी आणि बहिणींबरोबर खेळलेल्या गाण्याच्या भेंड्या कामी आल्या. किती सहली आठवल्या; पण मॅडमचं झोपायचं नाव नाही. 

आम्ही दोघी जाग्या. बाकी घर झोपलेलं. आई आली होती विचारायला; पण तिला म्हटलं, ‘झोप तू. मी काय, ही झोपली की झोपेनच.’ ती जायला निघाली तशी मी अर्धं राहिलेलं गाणं पुन्हा गायला सुरुवात केली. माझ्या त्या एकमेव श्रोत्यासमोर. माझ्या श्रोत्याला माझा आवाज खूप आवडतो. मन लावून ती गाणं ऐकत होती. जाताना आई माझ्याकडे बघून अश्‍शी काही हसलीये. कायकाय होतं तिच्या हसण्यात, सांगू? आत्ता कशी जागतेय, एरवी उठायचं नाव नसायचं आणि आता... हा एक भाव होता. कित्ती छान, झोप मोडली म्हणून चिडचिड न करता बाळाला कशी रिझवतीय हा दुसरा भाव होता. माझं बाळ खरंच मोठं झालंय, आता ते आई झालंय, असाही भाव होता. मी हे सगळं स्पष्टपणे तिच्या डोळ्यांत वाचलं. अगदी एका क्षणात वाचलं. तीही माझी गुणाची आई आहे आणि ही बाळीही गुणाचीच आहे. मला मज्जा वाटतेय, रात्री जागायला, झोप मोडून घ्यायला, वेळी-अवेळी उलट्यांचे आणि शू-शीचे कपडे बदलायला. यात मज्जा वाटण्यासारखं काय आहे, असं मनात येईल कुणाकुणाच्या; पण माझी आज्जी म्हणालीये की, हे दिवस असेच्या असे पुन्हा येणार नाहीत तुझ्या आयुष्यात. पुढे मोठी झाली आणि तू म्हणालीस की, ये गं माझ्याजवळ. तरी ती नाक फेंदारून म्हणेल, बाळ आहे का मी आईच्या कुशीतलं? मोठ्ठी झालेय आता. त्यापेक्षा आत्ता छोटुशी आहे तोपर्यंत भरपूर माया करून घे. सही आहे आज्जी. मी काही वर्षांपूर्वी म्हणजे कॉलेजमध्ये असताना असंच वागायचे आईशी. म्हणून मी ठरवलंय, मज्जा करायची. त्रास करून घ्यायचं काही कारणच नाहीये. मोठी झाल्यावर जागवणार आहे का मला ही? नाही ना! मग आत्ताच आहे ही मजा. घ्या करून.

२८ फेब्रुवारी
आज इंजेक्‍शनचा दिवस होता. इवल्याशा बाळाला इंजेक्‍शन देताना डॉक्‍टरांनाही मनातून वाईटच वाटत असतं, हे आज समजलं. कारण इंजेक्‍शन देताना ते तिला म्हणाले, ‘सॉरी साकुरा; पण हे तुझ्या चांगल्यासाठी आहे!’

माझ्या मनात आज खूप काही वेगळं येतंय. ते मला लिहून ठेवायचंय. आपल्या छोट्याशा बाळाला सांभाळायला किती जण आहेत, वैद्यकीय सेवा आहेत. प्रेमाची माणसं आहेत. त्याच्याशी बोलायला कोणीतरी घरात आहे. नाव ठरल्यावर लगेच तिच्यासाठी पॅनकार्ड काढणारा बाबा आहे; पण अशी किती मुलंमुली असतील, माझ्या साकुराच्याच वयाची... ज्यांचं आज कदाचित जगात कोणीच उरलं नसेल! त्यांना किती गरज असेल माणसांची, त्यांच्या प्रेमाची..! माझ्या परीनं, मला जे जमेल ते करणारच. अगदी उद्यापासूनच..!

संबंधित बातम्या