मजेत जगा 

शीतल जोशी
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

प्रतिमा जपायच्या अट्टाहासापायी आपण आपलं सहजसुंदर आयुष्य कठीण करून ठेवतो आहोत, हे आपल्या लक्षातही येत नाही. ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना...!’ एका ओळीत सगळं तत्त्वज्ञान मांडलंय आणखी काय सांगायला पाहिजे? आयुष्य सुंदर आहे ते तसंच सहजपणानं जगा. एखादा प्रोजेक्‍ट हाती घेतल्यासारखं गांभीर्यानं जगू नका. 

प्रतिमा जपायच्या अट्टाहासापायी आपण आपलं सहजसुंदर आयुष्य कठीण करून ठेवतो आहोत, हे आपल्या लक्षातही येत नाही. ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना...!’ एका ओळीत सगळं तत्त्वज्ञान मांडलंय आणखी काय सांगायला पाहिजे? आयुष्य सुंदर आहे ते तसंच सहजपणानं जगा. एखादा प्रोजेक्‍ट हाती घेतल्यासारखं गांभीर्यानं जगू नका. 

आपण चांगलं असावं, आदर्शवत वर्तन असावं, आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, असं वाटणं चूक आहे का? अजिबात नाही. मात्र, या अट्टाहासापायी स्वत:वरच अन्याय करणं मात्र साफ चूक. ‘मिस किंवा मिसेस गुड’च्या लेबलखाली प्रतिमा जपत असताना किती सहजपणानं आपण आपल्यातल्या आपल्यालाच संपवतो, हे लक्षातही येत नाही आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा बहुतेकदा उशीर झालेला असतो. ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी..!’ अशी एका सुप्रसिद्ध गीताची ओळ आहे. तसाच प्रकार अनेकींच्या आयुष्यात होतो. 

प्रतिमा जपण्याचा अट्टाहास हे स्त्रियांच्या तणावाचं एक महत्त्वाचं कारण आहे, असं सांगितलं तर अनेकींचा विश्वास बसणार नाही; पण आजूबाजूला एक नजर टाका, म्हणजे स्वप्रतिमेची दुसऱ्याशी तुलना करत तणावाला सामोरं जाणाऱ्या स्त्रिया तुम्हाला आढळतील. मुलीच्या जातीला...?असं म्हणत-म्हणत लहानपणापासूनच तिच्यावर वागण्यातली बंधनं येत जातात. ‘अमुक कर तमुक नको,’ असं वागलीस-बोललीस तर जग काय म्हणेल, तसं केलंस तर बरं दिसणार नाही, या आणि अशा अनेक बंधनांतून ती कर्तीसवरती बाई होते तेव्हा आपण सतत आदर्शवतच वागलं पाहिजे, हे तिच्या मनात पक्‍कं झालेलं असतं. ‘घरदार, मुलं, आलेलं गेलेलं सांभाळून मग नोकरी वगैरे जे करायचं ते कर’ हे तर इतकं बिंबवलेलं असतं की, जरा घराकडे दुर्लक्ष झालं तर एक प्रकारचा गिल्ट अनेकींच्या मनात येतो. वरवर पाहता त्यात कसला आलाय तणाव, असं वाटत असलं तरीही याचे परिणाम दिसतात तेव्हा ते खूप गंभीर असतात. इतके की अनेकजणी स्वत:चं अस्तित्व विसरून इतरांसाठी झिजताना दिसतात. गंभीर बाब ही आहे की, स्त्रीनं कुटुंबासाठी झिजणं आपल्या संस्कृतीत इतकं महान करून ठेवलंय की तेच योग्य असं चित्र निर्माण झालं आहे. नेमकं काय चुकतं?...

कामाला अवास्तव महत्त्व देणं. इतकं की त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येईल.

स्वत:कडे म्हणजेच स्वत:च्या गरजा, इच्छा, आकांक्षा यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून इतरांकडे लक्ष देणं. आपलं आयुष्य त्यांना समर्पित करणं

वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करू शकतील असे प्रसंग, घटना मन मारून सहन करणं. परिस्थिती बदलण्यासाठी काहीही प्रयत्न करणं

या सगळ्या गोष्टींकडे लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्हीच तुमच्या मानसिक आरोग्याचे कसे शत्रू बनता आहात. हळूहळू आरोग्यावर या सगळ्याचे नकारात्मक परिणाम दिसू लागतात. 

प्रतिमांचं ओझं
अनेक प्रकारच्या प्रतिमांचे ओझे घेऊन अनेकजणी आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात. कोणाला आदर्श सून असण्याची प्रतिमा जपायची असते, कोणाला उत्तम आई असल्याची प्रतिमा, कोणाला समजूतदार बायको असण्याची, कोणाला हुशार मुलगी असण्याची तर कोणाला कामाच्या ठिकाणी कार्यकुशल असण्याची प्रतिमा जपायची असते. कोणाला सुंदर दिसतेस ही प्रतिमा जपायची असते तर कोणाला जाड असण्याची प्रतिमा खोडून टाकायची असते. नाटक, टीव्ही, सिनेमांत काम करणाऱ्यांना त्यांच्या प्रतिमेची प्रतिमा जपायचं टेन्शन असतं. थोडक्‍यात, जिकडे पाहावं तिकडं हे प्रतिमा जपणं जीवापाड चाललेलं दिसेल. या प्रतिमा जपण्याचा अट्टाहास आपल्याला कोणत्या तणावाकडे घेऊन चालला आहे, याकडे आपण कधी लक्ष देणार आहोत?

आजकाल कामाला अवास्तव महत्त्व देण्याची वाईट पद्धत रूढ झालेली आहे. अनेकदा स्पर्धेतून हे घडत राहतं. ‘मी’ला सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या कामांची ओझी वाहिली जातात. काम, काम आणि सतत काम...  इतकं की खासगी आयुष्य या कामापासून वेगळं राहिलंच नाहीय. आजच्या प्रगत तंत्रज्ञानानं तर अधिकच गोची करून ठेवलेली आहे. सतत आणि कुठेही संपर्कात राहता येण्याच्या सोयीमुळे, हातातल्या स्मार्टफोनमुळे ऑफिस संपलं तरीही काम संपत नाही, अशी परिस्थिती आहे. ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्तचा वेळ कामासाठी द्यायचा टाळलात तर तुमच्यावर ताबडतोब कामचुकारपणाचा शिक्का बसतो. असा शिक्‍का बसू नये, यासाठी स्वत:चा खासगी वेळही ऑफिसच्या कामासाठी दिला जातो. वरवर बघितलं तर छोटी गोष्ट आहे; मात्र लक्षपूर्वक पाहिलं तर या अशा सततच्या हातात ऑफिस घेऊन फिरण्याच्या सवयीनं तुम्ही तणावाला आमंत्रण देत आहात, हे लक्षात येईल. 

कधीकधी सततच्या कंटाळवाण्या रूटीन कामापासून खरंच एक ब्रेक हवा असतो; मात्र ते टाळून तुम्ही आनंदाचे क्षण नाकारता आणि कामाच्या रूपानं तणावाला आमंत्रण देता. अगदी लग्नसमारंभ असोत, उन्हाळी सुट्टीसाठी फिरायला जाणं असो की मुलांचे गॅदरिंगसारखे क्षण. अनेकजण कामाचे फोन घेताना दिसतात. घरातून बाहेर पडलं की, घर मागे राहतं आणि ऑफिस सुरू होतं. कामाला शंभर टक्के देताना तोच न्याय खाजगी आयुष्याला मात्र राहत नाही? जे क्षण तुम्ही कुटुंबीयांसोबत घालवणं अपेक्षित असतं, त्यात काम का करायचं? स्टेटस जपण्यासाठी अपडेटेड राहणं आवश्‍यक असतं, हे मान्य केलं तरी त्यामुळं आपल्या भावनिक कोंडमाऱ्याचे अपडेटस्‌ आपल्याला जाणवू नयेत इतकं वाहून जावं का? याबाबत सीमारेषा प्रत्येकीला आखता आली पाहिजे, कारण यामुळे तुम्ही तुमचं खाजगी आयुष्यच नाकारता आणि पर्यायानं त्यातून मिळणारा आनंदही..!

बऱ्याचदा काय होतं की, तुम्ही तुम्हाला काय हवं आहे, याचा विचार न करता इतरांना काय वाटेल? हा विचार डोकावतो. इतरांसाठी आपल्याला काय करता येईल किंवा काय केलं पाहिजे याचा इतका अवास्तव विचार केला जातो की, तुम्ही या सगळ्यात मागेच राहता. अगदी छोटं उदाहरण म्हणजे हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर बऱ्याचजणी मुलांच्या, नवऱ्याच्या आवडीच्या पदार्थाची ऑर्डर करतात. आपल्याला आवडणारं इतरांनी एखादा दिवस खाल्लं तर आभाळ कोसळणार नसतं; पण हे इतक्‍या अजाणतेपणानं होत असतं की, लक्षातही येत नाही. इतर कोणाहीपेक्षा स्वत:चा आनंद महत्त्वाचं मानणं हा स्वार्थीपणा आजिबात नाही. तुम्हाला स्वत:ला आनंद देण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसंच कधीकधी स्वत:साठी इतरांना नकार देण्यात काहीच चूक नाही. उलट नकार देता आलाच पाहिजे. इतरांसाठी काही करताना स्वत:चं सुख मागे टाकण्याची, त्यागमूर्ती बनण्याची कल्पना कितीही रम्य असली तरीही प्रत्यक्षात त्यानं तणाव निर्माण होऊन नकारात्मक भावनाच वाढीला लागतात.

तुमच्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्यावर कोणत्याही प्रकारचा नकारात्मक प्रभाव टाकू पाहणारी परिस्थिती टाळण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जिथे-जिथे शक्‍य आहे तिथे बोलून, समजावून सांगून परिस्थितीवर मात करता आली पाहिजे आणि ते अजिबातच शक्‍य नसेल तर अशी परिस्थिती टाळताही आली पाहिजे. अशा प्रकारचे प्रसंग हा एक सापळा असतो आणि आपण त्यात अलगद सापडतो, त्यामुळे अशा प्रसंगांकडे तटस्थवृत्तीनं बघता आलं पाहिजे. घरगुती कुरबुरी असं ज्याला लेबल चिकटवून सर्रास दुर्लक्ष केलं जातं, तो सासू-सून वाद, कुरबुरी या तर अनेकदा गंभीर स्वरूपाच्या नैराश्‍याकडं नेणाऱ्या असतात. वरवर सगळं छान चित्र असताना आतमध्ये अनेकदा सासू-सून यांचे वाद हे नैराश्‍याचं आणि बऱ्याचदा पती-पत्नी विसंवादाचं प्रसंगी घटस्फोटाचंही कारणं असल्याचं समुपदेशनादरम्यान आढळतं. याचं कारण म्हणजे सुनेकडून आजही असणाऱ्या पारंपरिक अपेक्षा. तिनं कसं वागलं पाहिजे आणि कसं नाही याची नियमावली अजूनतरी बदललेली नाही. काही केसेसमधे उलटही चित्र असतं मात्र ते अपवाद म्हणून. आजही पारंपरिक चित्र तसंच कायम आहे म्हणूनच अशी नकारात्मक परिणाम करणाऱ्या व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणत्या स्थानावर ठेवायच्या, हे आपलं आपल्यालाच समजलं पाहिजे. उगाचच स्वप्रतिमा जपण्याच्या हट्टापायी काहीही सोसत राहिल्यानं येणाऱ्या दडपणातून काही भयंकर घडू शकतं आणि त्यातून प्रतिमेला गेलेला तडा कधीच भरून निघत नाही. याबाबत ‘फॅशन’ या चित्रपटातील प्रियांका चोप्रा आणि कंगना राणावत या दोघींच्या व्यक्‍तिरेखा डोळ्यांसमोर ठेवता येतील.

दोघीही सुप्रसिद्ध मॉडेल बनतात. एका प्रख्यात ब्रॅंडच्या ॲम्बेसिडर बनतात, त्यामुळं सतत कॅमेऱ्यांचा झगमगाट, लखलखाट आणि रंगीन आयुष्य. मात्र, ते स्टेटस जपण्यासाठी स्वत्वही बहाल करून बसतात. नंतरच्या काळात याचं भान येतं; पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. मग ते वास्तव पचवणं जड होऊन जातं. त्यातूनच मग नैराश्‍य, डिप्रेशन वाढत जातं. व्यसनाधीनता वाढते आणि अखेर एका क्षणी प्रतिमेला तडा जातो. रूपेरी पडद्यावर दिसणारं हे वास्तव केवळ फॅशन इंडस्ट्रीपुरतं मर्यादित नाही. आजच्या आयटीविश्‍वात, कॉर्पोरेट जगतात अशी उदाहरणं अनेक आढळतील. 

स्टेटस अथवा प्रतिमा ही केवळ पदाशी निगडित नसते. अनेकींना सौंदर्याचं स्टेटस जपायचं असतं. आजच्या काळात तर शारीरिक सौंदर्य हा गंभीर स्वरूप धारण केलेला तणाव प्रकार बनला आहे. बारीक, सडसडीत असणं आणि गोरंपान असणं हे दोनच सौंदर्याचे मापदंड झालेले आहेत. जीममध्ये किंवा योगासन, झुंबा क्‍लासेसमधली स्रियांची संख्या बघितली तर हे लक्षात यायला वेळ लागणार नाही. प्रत्येकीनं बारीक असलंच पाहिजे आणि एखादी असेलच जाड तर जणू काही ती जगायलाच नालायक, असा सूर बघितला की कीव करावी की काळजी, हेच समजत नाही. प्रत्येकजण काठीसारखी सडसडीत किंवा तांदळाच्या पिठासारखी गोरी कशी असेल? पण याचा विचार करायची कुवतच आपण हरवून बसलोत की काय, अशी धास्ती वाटावी अशी परिस्थिती आहे. खोटं वाटत असेल तर सुंदर बनविणाऱ्या उत्पादनांची वाढती बाजारपेठ बघा. सडसडीत करून देणाऱ्या तेल, औषधं, डाएट, व्यायामप्रकार, उपकरणं यांची वाढती बाजारपेठ बघा. आपण जसे आहोत तसेच आपण स्वत:लाच नको आहोत मग इतरांविषयी तक्रार करून काय फायदा? तुम्ही म्हणाल, व्यायाम करणं चूक आहे का मग? अजिबात नाही. व्यायाम केलाच पाहिजे; अगदी स्त्रीपुरुष दोघांनी आणि लठ्ठबारीक याही दोघांनी. मात्र, व्यायाम हा बारीक होण्याच्या अट्टाहासापायी नसावा तर तंदुरुस्तीसाठी असावा. कारण वजनाच्या काट्यावर उभं राहायची तुम्हाला धास्तीच वाटू लागली किंवा दोन-तीनशे ग्रॅम वाढलेलं वजन नैराश्‍य आणत असेल तर हे काही चांगलं लक्षण नाही.

अशा प्रकारचा तणाव सतत घेत राहिलं तर कालांतरानं अतिशय घातक असे परिणाम दिसू लागतात आणि याची परिणती आयुष्यात स्वारस्य नसण्यात होते.

धोकादायक लक्षणं -
  विनाकारण आणि खूपच थकवा जाणवू लागणं
  आत्मविश्वास हरवत जाणं
  स्वत्व हरवत जाणं
  नैराश्‍यग्रस्त होणं
  कामजीवनात स्वारस्य न उरणं
  महत्त्वाकांक्षा न राहणं
  निद्रानाश
  कोणताही निर्णय घेता न येणं
  असहाय्य वाटणं

ही लक्षणं तुम्हाला जाणवू लागली तर काय कराल?
सर्वप्रथम तुम्हाला काय हवं आहे? तुमची काय इच्छा आहे? याचा विचार सुरू करा. कोणाला काय वाटेल आणि कोण काय म्हणेल, आपल्या स्टेटसचं काय, याचा विचार सोडून द्या. प्राधान्यक्रमावर फक्त स्वतःला ठेवा. असं समजा की, तुमच्याजवळ केवळ एका आठवड्याचं आयुष्य बाकी आहे. तर तुम्ही कायकाय करू इच्छिता? तोच तुमचा प्राधान्यक्रम असतो. अमुक एखादी गोष्ट मला का करायची आहे? या अशा प्रकारचे प्रश्‍न स्वत:ला विचारत राहिल्यानं मनातला गुंता मोकळा व्हायला मदत होते. हळूहळू तुम्हाला नेमकं काय केल्यानं तुम्ही आनंदी होता, हे समजत जाईल आणि ही निरोगी मनाकडे जायची पहिली पायरी आहे.

नकार द्यायला शिका. सतत इतरांना खूष ठेवणाऱ्यांसाठी हे अत्यंत कठीण काम आहे; मात्र अशक्‍य अजिबातच नाही. तुम्ही नकार दिल्यानं तुमची प्रतिमा डागाळणार नाही. 

इतरांना तुमच्या त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा मोकळेपणानं सांगा तसंच तुम्ही त्यांच्यासाठी जे करू शकता, त्याच्या मर्यादाही सांगा आणि त्याउपर काही करू शकणार नाही, याचीही स्पष्ट कल्पना द्या.

जग उद्याच संपणार असल्यासारखी तुम्ही कामं उपसत राहत असाल तर स्वत:ला थोडी विश्रांती द्या. दोन-चार कामं नाही झाली म्हणून काहीच बिघडत नाही. आज, आत्ता, या क्षणाला सगळीच कामं उरकली पाहिजेत, हा अट्टाहास सोडून द्या.

एक छोटासा ब्रेक घेऊन तुम्हाला मनापासून जे करावसं वाटतंय ते करा.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आरशात जशा दिसता तशाच छान आहात, हे लक्षात घ्या. निरोगी असणं हे सडसडीत अंगकाठीहून महत्त्वाचं आहे. रोज सकाळी आरशात बघता तेव्हा स्वत:लाच ‘आय लव्ह यू’ म्हणून बघा. तुम्ही स्वत:वर प्रेम करायला लागलात की आपोआप इतरजण तुमच्यावर करतील.
शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आयुष्य सुंदर आहे ते तसंच सहजपणानं जगा. एखादा प्रोजेक्‍ट हाती घेतल्यासारखं गांभीर्यानं जगू नका.

संबंधित बातम्या