घड्याळाच्या काट्यावर...

शिल्पा कुलकर्णी 
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

‘टाइम मॅनेजमेंट’ अर्थात ‘वेळेचं नियोजन’ हा आजच्या जमान्यातला परवलीचा शब्द आहे. नोकरी-व्यवसाय सांभाळून कुटुंबाची देखभाल, मुलांचं संगोपन करताना स्त्रियांना वेगवेगळ्या ताणतणावांचा सामना करावा लागतो. वेळेचं नियोजन करून स्वतःला रिचार्ज करत राहण्यानं कामांचा ताण येण्याऐवजी त्यातील उत्साह वाढतो आणि कामं गतिमान होतात. 

‘टाइम मॅनेजमेंट’ अर्थात ‘वेळेचं नियोजन’ हा आजच्या जमान्यातला परवलीचा शब्द आहे. नोकरी-व्यवसाय सांभाळून कुटुंबाची देखभाल, मुलांचं संगोपन करताना स्त्रियांना वेगवेगळ्या ताणतणावांचा सामना करावा लागतो. वेळेचं नियोजन करून स्वतःला रिचार्ज करत राहण्यानं कामांचा ताण येण्याऐवजी त्यातील उत्साह वाढतो आणि कामं गतिमान होतात. 

घड्याळाच्या काट्यावर नाचावं लागतं, असं बायका अनेकदा म्हणतात. त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा ताण म्हणजे वेळेचं नियोजन. गृहिणी असो की नोकरदार स्त्री, त्यांचं म्हणणं असतं की, दिवसाचे चोवीस तासही कमी पडतात. दिवस संपायला येतो तरीही कामांची यादी काही संपत नाही. घरासाठी करता-करता स्वत:साठी काही करायलाच मिळत नाही, अशी तक्रार करणाऱ्या अनेकजणी आजूबाजूला दिसतील. असं का बरं होत असावं? उत्तर दोन शब्दांचं आहे, ‘वेळेचं नियोजन.’ 

नीताचा दिवस सकाळी पाच वाजता सुरू होतो. दोन मुलं आणि नवरा यांच्या डब्यांच्या, शाळा-ऑफिसच्या वेळांनी नीताचा दिवस बांधला गेला आहे. नीताची मोठी मुलगी शाळा आणि क्‍लासेस करूनच घरी येते, त्यामुळं तिला पाच डबे देणं भाग असतं. धाकटी मुलगी दुपारच्या शाळेत जाते; मात्र घरी येईपर्यंत तिला साडेसहा वाजून जातात, त्यामुळं तिलाही एक दुपारचा आणि एक संध्याकाळचा डबा देणं भाग असतं. नीताचा नवराही सकाळी लवकर घर सोडतो आणि संध्याकाळी उशिरा परततो, त्यामुळं त्याला दुपारच्या जेवणाशिवायही संध्याकाळचं खाणं द्यावं लागतं. साहजिकच नीताचा बहुतेक वेळ किचनमध्येच जातो, कारण या सगळ्यांच्या जाण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. उठायला पाच मिनिटंही उशीर झाला की, नीताला टेन्शन येतं आणि मग तिची घरातल्यांवर चिडचिड सुरू होते. एखादा दिवस साग्रसंगीत डबा देता आला नाही तर नीता स्वत:च दिवसभर गिल्टमध्ये असते. बरं, या सगळ्या व्यतिरिक्त नीता दुपारच्या वेळेत ट्युशन्सही घेते, त्यामुळे सगळ्या वेळा गाठता-गाठता तिची खूप तारांबळ उडते. शिवाय सतत चिडचिड करून डोकं दुखतं ते वेगळंच.

अनिताचा संसार त्रिकोणी आहे. चार वर्षांचा आदित्य आणि सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला असणारा नवरा इतकेचजण राहतात, तरीही अनिताला वेळ पुरत नाही. अनिता स्वत: एका मल्टिनॅशनल कंपनीत जबाबदारीच्या पदावर काम करते. सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाक आणि आदित्यचं आवरणं तिला एकाच वेळी करावं लागतं. कारण ऑफिसला जाता-जाता ती आदित्यला डे-केअरमध्ये सोडून जाते. अनिताचं आणि तिचा नवरा राजनचं ऑफिस दोन विरुद्ध दिशांना आहे. अनिताला सोयीचं पडावं म्हणून तिच्या ऑफिसच्या वाटेवरचं डे-केअर निवडल्यामुळे आदित्यला सोडण्याचं कामही तिच्यावरच आहे. आदित्यची बॅग भरून आपला आणि राजनचा डबा भरून अनिता गाडीत बसते तेव्हा खरं तर तिला ऑफिसमधला लेटमार्क दिसत असतो. मग त्या ताणातच ती गाडी चालवत कशीबशी धावतपळत ऑफिस गाठते. या गोष्टीवरून तिची आणि राजनची भांडणं तर रोजची गोष्ट बनली आहे.

नीता आणि अनिता ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. अशा अनेक नीता-अनिता आजूबाजूला दिसतात. दोघींची दिनचर्या, संसाराचा आकार आणि जबाबदाऱ्या भिन्न असल्या तरीही दोघींत एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे वेळेच्या नियोजनाअभावी येणारा तणाव. नीताला गरज आहे तिच्या डब्यांची शिस्त लावण्याची. प्रत्येकाला वेगवेगळा पदार्थ करण्याऐवजी किमान काही गोष्टी सर्वांसाठी म्हणून करता येतील. आठवड्याचा मेनू ठरवून त्यानुसार काही पूर्वतयारी करून ठेवली तर सकाळची गडबड कमी होईल. उदाहरणार्थ, कटलेटसारखी गोष्ट बनवून फ्रीजरमध्ये ठेवून ऐनवेळी केवळ भाजली/तळली तरीही अर्धं काम सोपं होणार असतं. शक्‍य असेल तर किमान पोळीसाठी बाई लावणंही अगदीच अशक्‍य नाही (आजच्या भाषेत सांगायचं तर आऊटसोर्स). किंवा दोनही वेळच्या पोळ्या एकदाच करून भाजी फक्त ताजी करण्यानंही एका वेळच्या स्वयंपाकातला वेळ वाचणार आहे.

कुटुंबातल्या प्रत्येकाला दरवेळेसचं खाणं ताजं आणि वेगळं देण्याच्या अट्टाहासापायी आपल्यावरील ताण वाढत चालल्याचं तिला समजतच नव्हतं. आपण घरात असतो, बाहेर जाऊन कमावत नाही म्हणजे हे सगळं करणं आपलं कर्तव्यच आहे, या समजुतीपायी ती या कामात रुतत चालली आहे.

बरेचदा आपण बोलतच नाही म्हणून केवळ समोरच्याला आपली समस्या समजत नसते. नीतानं मुलींशी आणि नवऱ्याशी बोलून मोकळेपणानं त्यांना सांगितलं की, डब्यांच्या कामामुळं तिला स्वयंपाकघरातून फुरसत मिळत नाही आणि त्यामुळे तिची सतत चिडचिड होते आहे. सर्वांनी आपापल्यापरीनं समजून घेत तिला सहकार्य केलं आणि नीताला स्वयंपाकघरातून थोडी उसंत मिळाली.

अनिताची समस्या म्हणजे नवऱ्याला आपल्या मुलाचं काही करायला जमणारच नाही, हा पक्‍का समज. आपल्या नोकरीमुळे आधीच मुलासाठी कमी वेळ दिला जातो. मग त्याची कामं आपण केली नाहीत तर लोक काय म्हणतील ही धास्ती. दुसरीकडे राजनला या कशाचीच कल्पना नसल्यानं तो आदित्यच्या गोष्टीत लक्षच घालत नसे. अनिताच्या सततच्या डोकेदुखीनं ती तणावात आहे हे समोर आणलं आणि राजनला धक्का बसला. त्यानं अनितासोबत बसून कामांचा प्राधान्यक्रम ठरवला. त्यापैकी कोणती कामं तो करू शकतो, हे पाहिलं आणि ती करण्याची जबाबदारी स्वीकारली. आदित्यला आंघोळ घालणं, त्याचं आवरणं अशा सोप्या सोप्या गोष्टी करताना सुरवातीला तो चुकायचा आणि अनिताला ते सहन व्हायचं नाही. सूचना करण्यापेक्षा आपणच आवरलेलं बरं असं तिला वाटायचं मात्र, राजननं तिला कटाक्षानं काही कामं करू दिली नाहीत. परिणाम असा झाला की, राजनला हळूहळू सगळं जमायला लागलं, 

आदित्यलाही बाबाचा सहवास मिळायला लागला आणि अनिताला थोडा मोकळा वेळ मिळाला. वेळेचं नियोजन करणं प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाच्याच दिवसात चोवीस तासच असतात; मात्र ते आपण कसे शिस्तीत बसवतो, यावर सगळं अवलंबून असतं, यासाठी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्राधान्यक्रम ठरवणं. कोणतं काम कधी आणि कसं करायचं, हे ठरविता आलं पाहिजे. सगळ्या कामांचा बोजा स्वत:वर न घेता कामाची विभागणी करता आली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या माणसांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे आणि हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्या घरातली बाई समाधानी असते, हसतखेळत राहते ते घरही आनंदी असतं. अर्थात, केवळ वेळेचं व्यवस्थापन केल्यामुळं तणाव दूर होतो असं नाही, त्यासाठी स्वतःला रिचार्ज करत राहणंही तितकंच गरजेचं असतं. कारण कितीही नियोजन केलं तरी रोजच्या जगण्यातल्या अनपेक्षित, अपरिहार्य गोष्टी ताण आणण्यास कारणीभूत ठरतात. हा ताण साचत गेला की, त्याचा परिणाम इतर कामांवर होऊ लागतो. चुका वाढतात, गोंधळ वाढतो. मानसिक अवस्था बिघडते. बहुतांश मानसोपचारतज्ज्ञांकडून हेही सांगितले जाते की, वाढत्या ताणतणावांमुळं नकारात्मकता वाढते. त्यातून पुन्हा ‘टाईम मॅनेजमेंट’ बिघडते म्हणूनच ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ची कलाही आत्मसात केली पाहिजे. ही असाध्य कला नाही. रोजच्या व्यस्ततेतून काही क्षणांची फुरसत घेऊन तणावांपासून दूर राहून नक्कीच रिचार्ज होता येतं. 

मनाला रिचार्ज करण्याचे खरं तर अनेक पर्याय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रूटीनमध्ये थोडासा बदल करा, त्यासाठी प्रत्येक वेळी सुट्टी घेऊन लांब कुठेतरी जाणं शक्‍य नसेल; पण काही छोटे बदलही नवा उत्साह आणू शकतात. 

अगदी साधा बदल. सकाळी लवकर उठून गार वाऱ्याचे झोत अंगावर घेत एक चक्कर मारून या, पाहा कसं प्रसन्न वाटतं ते.

खूप दिवसात रेडिओ ऐकला नाही? त्यावरची कॉलेजमध्ये वारंवार ऐकायचीे ती जुनी गाणी कुठेतरी हरवल्यासारखी वाटताहेत. घ्या एक छोटासा ट्रान्झिस्टर आणि ऐका किंवा तुमच्या मोबाईलमध्ये नवी गाणी लोड करा. काम करताना ऐका. पाहा जरा वेगळा फील येतो की नाही ते.

सध्या गृहिणींचं वेळेचं व्यवस्थापन बिघडण्यास मोबाईलही कारणीभूत ठरू लागला आहे. व्हॉट्‌स ॲपवरचे ‘संदेश रतीब’ वाचताना किती वेळ निघून जातो, हे कळत नाही. अचानक मग स्क्रीनवरील कोपऱ्यात असणाऱ्या घड्याळावर नजर जाते आणि अस्वस्थ व्हायला होतं. मग पुन्हा चिडचिड सुरू होते, त्यामुळं ‘रिचार्ज थेरपी’मध्ये एक गोष्ट आवर्जून करा.

ऑफिसमधून आल्यावर मोबाईल बंद करून टाका. एक कप छान ग्रीन टी किंवा कॉफीचा कप तयार करून घ्यायचा आणि मंद संगीताच्या तालावर तो हळूहळू आस्वाद घेत प्यायचा. तुम्हाला एरवीच्या कॉफीपेक्षा त्यातला बदल नक्की जाणवेल. 

मन रिफ्रेश करण्यासाठी आणखी एक सोपी टीप आहे. रिलॅक्‍स बसून १० वेळा दीर्घ श्‍वास घ्या. डोळे मिटून घ्या. श्‍वासाच्या लहरी मेंदूपासून पायापर्यंत गेल्याची जाणीव झाली की तुमची बॅटरी फुल्ल झालीच म्हणून समजा.

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळंही मरगळ्यासारखं वाटतं म्हणून भरपूर पाणी प्या. उन्हाळ्याच्या दिवसात ते गार करा किंवा सरबत करून प्या. 

कधी-कधी साखरेची कमतरताही मनाला थकवा देते, त्यामुळं लिंबू सरबत किंवा पन्ह्याचा ग्लास तुम्हाला लगेच ‘एनर्जाईज’ करू शकतो. कधी-कधी व्यायाम करूनही मनाला खूप फ्रेश वाटतं. अर्धा तास जीम केल्यावर किंवा पोहून आल्यावर खूप फ्रेश वाटतं. 

झोपण्याआधी ओंकार गुंजन ऐकल्यानं किंवा तळपायाला तेलाचा मसाज केल्यानंही मनावरील ताण हलका होतो आणि शांत झोपेचा अनुभव घेता येऊ शकतो. मनाला रिचार्ज करण्याचे पर्याय अनेक आहेत. तुम्हालाही काही सुचतील. महत्त्वाचं आहे की, ते अमलात आणा. वेळेचं नियोजन करताना या छोट्या गोष्टींसाठी वेळ राखून ठेवा. किंबहुना, इतर एक-दोन गोष्टी बाजूला ठेवून या ‘तणावमुक्‍त अभियाना’त सहभागी व्हा. रोजच्या रूटीनमधून आपण नेहमीच महागडे पर्याय शोधू शकत नाही, ते कायम परवडणारही नाहीत. नेहमी हॉटेलमध्ये खाण्यानं आणि मॉलमध्ये शॉपिंग केल्यानं जे समाधान मिळणार नाही, ते या अशा छोट्या गोष्टी तुम्हाला मिळवून देतील यात शंका नाही.

संबंधित बातम्या