तणावमुक्त... व्यसनमुक्त

मंजिरी फडणीस
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

लोकांच्या मनात गैरसमज आहे, की ताण कमी व्हावा यासाठी दारू, सिगारेट, तंबाखू यांची गरज असते. ताण दूर करण्यासाठी या गोष्टींचं सेवन करता-करता ती व्यक्ती व्यसनी होते. एकदा व्यसन लागलं, की आयुष्याची, कुटुंबाची वाताहत होते. यातून ताण अधिकच वाढतो. या दुष्टचक्रातून माणसाला बाहेर काढून माणूस म्हणून जगवण्यासाठी ‘मुक्तांगण’ आणि ‘निशिगंध’ ही व्यसनमुक्ती केंद्रं काम करतात. या केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत....

लोकांच्या मनात गैरसमज आहे, की ताण कमी व्हावा यासाठी दारू, सिगारेट, तंबाखू यांची गरज असते. ताण दूर करण्यासाठी या गोष्टींचं सेवन करता-करता ती व्यक्ती व्यसनी होते. एकदा व्यसन लागलं, की आयुष्याची, कुटुंबाची वाताहत होते. यातून ताण अधिकच वाढतो. या दुष्टचक्रातून माणसाला बाहेर काढून माणूस म्हणून जगवण्यासाठी ‘मुक्तांगण’ आणि ‘निशिगंध’ ही व्यसनमुक्ती केंद्रं काम करतात. या केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत....

व्यसनाधीन होण्यामागे ताणतणाव हे कारण कितपत आहे?
ताणतणाव हे व्यसनाधीनतेचं मुख्य कारण दिसून येतं. ताणतणावाची तीव्रता जास्त असते किंवा लोकांना ताण हाताळायचा कसा, हे लक्षात येत नाही तेव्हा त्याची तीव्रता अधिक दिसते. चार-पाच वर्षांपूर्वी एखादी समस्या निर्माण झाली तर बायका कोणाशी तरी बोलायच्या. रडून मन मोकळं करायच्या. बोलल्यानंतर आपल्याला हलकं वाटतं. भले ती समस्या दुसऱ्याला सांगून सुटणार नसेल; पण मन हलकं होतं हे नक्की. मात्र, अलीकडे बायका रडणं हा अपमान समजतात. मी स्ट्राँग आहे. माझी दुःखं माझी मी सहन केली पाहिजेत, ती इतरांना सांगता कामा नये, ही प्रवृत्ती महिलांमध्ये वाढते आहे. सहन करणं म्हणजे काय तर मनातल्या मनात त्या समस्येचा ताण दाबणं. ताण मनातल्या मनात दाबला की, तो खूप वाढायला लागतो. मग सहनशक्ती संपते आणि तो ताण चुकीच्या मार्गानं बाहेर येतो. जसं आरडाओरड करणं, व्यसनाच्या आहारी जाणं.

पुरुषार्थ म्हणून आपल्या भावना दाबून ठेवण्याची प्रवृत्ती पुरुषांमध्ये खूप आधीपासून दिसते. पुरुषांनी रडायचं नाही, हे लहानपणापासून मनावर ठसवलं जातं. पुरुषासारखा पुरुष आणि रडतोस कसला? असं सहज म्हणतात, त्यामुळं पुरुषांनी मनात ताण दाबणं, हे होतंच आहे. ताण सहन करण्यासाठी दारू, सिगारेट पिणं आणि त्यातून व्यसनाधीन होणं, हे कारण नेहमीचंच आहे. अलीकडच्या काळात बायकांमध्येही हा प्रकार दिसतो.  
रडणं आणि बोलून मन मोकळं करणं, हे बायकांमध्ये अलीकडच्या काळात व्यसनाधीनता वाढण्याचं मुख्य कारण आहे, त्यामुळं व्यसनमुक्तीच्या उपचारात पहिल्यांदा बायकांना सांगावं लागतं, रडणं हे कमीपणाचं लक्षण नाही. तुम्ही रडा. तुमची समस्या व्यक्त करा. रडायला येणं हे कमकुवतपणाचं नाही तर चांगल्या मानसिकतेचं लक्षण आहे.

कोणत्या प्रकारचा ताण घेऊन लोक येतात असं दिसतं? विशेषतः महिलांना कशा प्रकारचे ताण आहेत?
ताण सर्व प्रकारचे असल्याचं दिसतं. आर्थिक ताण, घरातले ताण, नोकरीच्या ठिकाणचे ताण. लोकांच्या मनात एक गैरसमज असतो. दारू पिल्यानंतर, सिगारेट ओढल्यावर किंवा मादक गोष्टी सेवन करून ताण जातो. इथं ताण महत्त्वाचा नाही. गैरसमज महत्त्वाचा आहे. या गैरसमजामुळंच लोकं व्यसनाचा आधार घेतात; पण होतं कसं, लोकांना वाटतं व्यसनामुळं आपले प्रश्‍न सुटतील. प्रत्यक्षात तसं होत नसतं. व्यसनात प्रश्‍न तात्पुरते विसरले जातात. जेव्हा व्यसनाचा अंमल संपतो तेव्हा ताण, समस्या तसेच असतात.

ताण आहे म्हणून काहीजण व्यसन करतात, पण हे म्हणजे समस्येपासून दूर पळणं असतं आणि दूर पळून जाऊन कुठलीही समस्या सुटत नाही. त्याला सामोर जावं लागतं आणि त्यातून मार्ग काढावा लागतो. व्यसनाला सुरुवात होताना या गोष्टी लक्षात येत नाहीत. टेन्शन आहे म्हणून व्यसन केलं जातं. मग व्यसन वाढत जातं. त्या पुढच्या टप्प्यात व्यसन लागल्यानं निर्माण होणारे प्रश्‍न आणि आधीच्या समस्या एकत्र येतात.

अशी कितीतरी उदाहरण दिसतात. एक मध्यमवर्गीय मुलगा. बहिणीचं लग्न करायचं होतं. त्यासाठी कर्ज काढलं. व्याज खूप होतं. कर्ज फिटत नसल्याचा ताण त्याच्या मनावर होता. मित्रानं सांगितलं, दारू पी, तुझं टेन्शन जाईल. मग दारू प्यायला लागला. अतिरेक झाल्यावर व्यसनमुक्ती उपचारासाठी आला. मी त्याला विचारलं, `आता गेलं का कर्ज?’ तर म्हणाला, नाही आता खूप वाढलंय. 

दारूवरचा खर्च, दारूमुळं नोकरी गेली. आधीच्या कर्जाचा बोजा, उद्‌ध्वस्त झाला होता. सुरुवातीला दारू पिताना या कशाचाच विचार या लोकांना करावासा वाटत नाही.

‘स्टेटस’ म्हणून व्यसन करण्याचं प्रमाण किती आहे?
आपल्याकडं व्यसन करायला जणू समाजमान्यता असावी, अशी स्थिती झाली आहे. पूर्वीच्या चित्रपटात खलनायक दारू पिताना दाखवायचे. नंतर नायक दारू पिताना दिसू लागला. आता नायिकाही दारू पिताना दाखवतात. म्हणजे तो जणू ‘स्टेटस सिम्बॉल’ झाला आहे. चित्रपटांमधून जणू असा संदेशच देतात, की आनंद झाला तर एन्जॉय म्हणून व्यसन करा आणि दुःख झालं तर ते बुडवायला व्यसन करा.

आपल्या देशात चित्रपटात बघून करण्याच्या अशा अनेक गोष्टी दिसतात. त्याचा प्रभाव पडताना दिसतो. 

दीपिकाचा ‘जवानी दिवानी’ चित्रपट. त्यात ती मेडिकलची विद्यार्थिनी असते. चष्मा घालून वावरणारी. एकदम सभ्य. तेव्हा तिच्याकडं फारसं कोणाचं लक्ष जात नसतं. नंतर ती चष्मा फेकून देते. दारू प्यायला लागते. मग हिरो तिच्याकडे लक्ष देतो म्हणजे यातून कुठेतरी संदेश मिळतो की तुम्ही व्यसन केलंत, असे राहिलात तरच लोक तुमच्याकडं लक्ष देतील. तुम्ही अभ्यासू, साध्या राहू नका, हाच संदेश दिसतो.

अनेकांच्या घरात छोटे बार तयार केलेले असतात. लहानपणापासून मुलं ते बघतात. घरातल्या पार्टीत मुलं आपल्या आईवडिलांना दारू पिताना बघतात. बायकोला ‘स्टेटस’ म्हणून आग्रह केला जात असतो. यातून पुढची पिढीही व्यसनाकडं वळू शकते. 

एकटेपणाचा ताण हे बायकांमधल्या व्यसनाधीनतेचं मुख्य कारण आहे का?
साधारण ४५ ते ५० हा वयोगट बघितला तर या वयोगटात मेनोपॉज जवळ आलेला असतो. हॉर्मोनल बदल होत असतात. मुलं स्वतंत्र होतात. नवरा त्याच्या करिअरमध्ये खूपच व्यस्त असतो. वयानुसार तिच्यात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. अशातच ती करियर करत नसेल तर तिच्यात एक प्रकारची मानसिक पोकळी तयार होते. बायकांबाबतीत अलीकडं अशी अनेक उदाहरणं दिसतात. आधी सोशल ड्रिंकर असतात आणि नंतर जर जगण्यात पोकळी निर्माण झाली तर त्या खूपच निराश होत जातात. यातून त्या अधिक व्यसनी होतात. बायकांमध्ये वाहवत जाण्याची एक वृत्ती असते. मग ती चांगल्या गोष्टीत असेल किंवा वाईट. यामुळं पुरुषांचा सोशल ड्रिंक टू व्यसनाधीनता हा प्रवास कमी गतीनं होतो. तशा बायका सोशल ड्रिंक म्हणून सुरुवात झाली तर लगेच व्यसनी होतात. काहीजणी झोपेची औषधं घेणाऱ्या असतात. अतिनैराश्‍येत जाऊन त्या अशी औषधं घेतात. 

व्यसनमुक्तीसाठी बायका स्वतःहून प्रयत्न करतात का?
करतात..! कधी जबरदस्तीनं त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात आणलं जातं. कधी स्वतःहून येतात. त्यांना कळतं, हे चुकीचं सुरू आहे. त्यातून बाहेर पडायचं आहे. व्यसनातून बाहेर पडायला खूप त्रास होतो. मात्र एकदा ती वेळ निघून गेली, व्यसनातून बाहेर पडण्याच्या त्रासातून त्या पार पडल्या की, सुधारण्याचा त्यांचा वेग खूप जास्त असतो. पुरुषांमध्ये रिकव्हरी रेट ७० टक्के असला तर बाईच्या बाबतीत तो ८५ टक्के दिसतो.

खरं तर अनेकदा नवऱ्यामुळं त्या बाईला सवय लागलेली असते. ५-६ वर्षांपूर्वीच्या परिस्थितीचा विचार केला तर तो तिला व्यसनी म्हणून माहेरी नेऊन सोडायचा. आता परिस्थितीत सकारात्मक बदल होऊ लागला आहे. नवराच तिला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करतो. माझ्यात काय बदल अपेक्षित आहेत, हे समुपदेशकाला विचारतो. 

महिलांसाठी ‘निशिगंध’ या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात कशी झाली?
मुक्तांगणमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी अनेक मुलं येत असतात. तो विभाग मी सांभाळत होते. एक दिवस एका परदेशी विद्यार्थ्यांनं मला विचारलं, ‘इथं सगळे पुरुष दिसतात, मग बायका कशा नाहीत.’ मी त्याला उत्तर दिलं, ‘आमच्या देशात बायका दारू पित नाहीत.’ मला तेव्हा त्याच्या प्रश्‍नाचंच विशेष वाटलं; पण थोड्याच दिवसांत बायकांसाठी अशा केंद्राची जरुरी आहे, असं वाटू लागलं. सुरुवातीला कोणी बाई व्यसनमुक्तीसाठी आली तर आम्ही तिला फक्त समुपदेशन करायचो. नंतर काहीजणी आम्ही इथंच उपचारासाठी थांबतो, असं म्हणू लागल्या आणि त्यातून ‘निशिगंध’ या केंद्राची स्थापना झाली. सुरुवातीला एकजण आली होती. नॉर्थ इंडियन होती. नवरा आर्मीत होता. त्या कल्चरमध्ये पार्टीच्या निमित्तानं सुरू झालेलं दारू पिणं वाढत गेलं होतं. नवराच तिला घेऊन आला होता. तिला आम्ही समुपदेशन केलं.

दुसरीही परदेशी होती. तिचा मित्र तिला घेऊन आला होता. सुरुवातीला टिपिकल महाराष्ट्रीयन बायका नव्हत्या. आता टिपिकल महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय गृहिणीही इथं येतात. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातल्या बायका व्यनमुक्तीसाठी दाखल होतात. ग्रामीण भागातल्या बायका आजकाल किटी पार्टीच्या निमित्तानं दारू प्यायला शिकतात. शॉपिंगच्या निमित्तानं शहरात जातात, तिथं हॉटेलमध्ये जाऊनही दारू पितात. हळूहळू त्याचं व्यसन होतं. अशी उदाहरणं अलीकडे दिसतात. 

व्यसनमुक्तीसाठी या स्त्रिया भावनिक आधारावर किती प्रमाणात अवलंबून असतात?
‘निशिगंध’मध्ये स्त्रियाच समुपदेशक असतात. समुपदेशकासमोर या बायका मोकळेपणानं बोलतात, रडतात. समुपदेशक फक्त त्यांना बोलतं करतात. बोलून त्यांना बरं वाटतं. त्यांच्या मनावरचा ताण नाहीसा होतो. ग्रुप थेरपी असते. यातून हे कळतं की, मला एकटीलाच ही समस्या नाही. आणखीही काही अशा आहेत. बायकांबाबत भावनिक पातळीवर अधिक समुपदेशन करावं लागतं. भावनिक गरजा समजून न घेतल्यामुळं त्या दुखावल्या जाऊन व्यसनाकडं वळलेल्या असतात. अशा परिस्थितीत त्यांना भावनिक पातळीवर स्वावलंबी बनवावं लागतं. अनेकदा कोणी विचारत नाही, ही एक त्यांची समस्या असते. 

निशिगंधमध्ये १२ ते ८० अशा सर्व वयोगटांतल्या बायका आहेत. यामध्ये अल्कोहोलिक अधिक आहेत. त्याबरोबरीनं औषधं, पेनकिलर घेणं, अशी व्यसनंही आढळतात.  बाई जेव्हा आई होते, तेव्हा सगळ्यात जास्त प्राधान्य मुलाला असतं. व्यसनापुढं या बायकांमध्ये आईपणाची भावनाही फिकी पडते. निशिगंधमध्ये येणाऱ्यांमध्ये काहींना बाळ आहे, त्या ब्रेस्ट फिडिंग करतात. अशांना आईपणाचा भावनिक धागा पकडून समुपदेशन केलं जातं.  ‘निशिगंध’मधलंच उदाहरण, एकजण व्यसनमुक्त होऊन गेली. तिनं होणाऱ्या नवऱ्याला व्यसनाबद्दल सांगितलं. तिचं लग्न झालं. ती अधूनमधून इथं भेटायला येते. माझं हे माहेरच आहे, असं ती म्हणायची. ती गरोदर होती. घरी नीट जेवायची नाही. आई म्हणाली, तुझ्या त्या माहेरी राहा. ती इथं दोन-तीन महिने राहिली. आम्ही तिच्या आहाराकडे नीट लक्ष दिलं. तिचं डोहाळेजेवण केलं. दुसरी एक. आली तेव्हा जबरदस्तीनं इथं ठेवलं. नुकताच तिला इथून डिस्चार्ज मिळाला. परवा ती फॉलोअपला आली तेव्हा म्हणाली, मी दोन दिवस राहते ना इथं. फॉलोअपला येईल का शंका होती; पण ती इथं आली आणि राहिलीही.

निशिगंध सगळ्यांना माहेर वाटतं. याचा व्यसनातून बाहेर पडायला नक्कीच फायदा होतो. एक अमेरिकेतली बाई होती. मूळ भारतीय. तिचं नवऱ्याबरोबर पटत नव्हतं. या ताणातून व्यसनी झाली. अमेरिकेत समुपदेशकाकडे गेली तेव्हा त्यांनी सल्ला दिला. नाही पटत तर का राहतेस नवऱ्याबरोबर. आपण इथं मात्र सगळ्या गोष्टी जुळतील असं बघतो. इथल्या समुपदेशकांनी तिचं समुपदेशन केलं. ती बरी झाली. 

बदलत्या सामाजिक परिस्थितीत ताण वाढतो आहे, त्याबरोबर व्यसनाधीनता वाढते आहे का?
पूर्वी स्त्रीवर अन्याय होत होता; पण आता तिचं करिअर, नवऱ्याशी न पटणं, दोघांचेही विवाहबाह्य संबंध या गोष्टी आता खूप वाढल्या आहेत. व्यसनाचं एक्‍सपोजरही वाढत आहे, साहजिकच व्यसनाधीनतेत वाढ होत आहे. निशिगंधचा विकास होऊ नये, असंच आम्हाला वाटतं. वाढू नये, अशी इच्छा असूनही ते वाढवावं लागतं. हे वाढवणं हा आमचा अभिमान नाही तर ते केंद्र बंद पडण्यात आम्हाला अभिमान आहे.  **

- मुक्ता पुणतांबेकर (मुलाखत- मंजिरी फडणीस)

संबंधित बातम्या