संस्कृतीची जवळीक - पोर्तुगाल 

मृणाल तुळपुळे 
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा असला पाहिजे. आपल्याला आपल्या देशाचा अभिमान असला पाहिजे. मोठ्यांचा आदर केला पाहिजे. आपल्या संस्कृतीत आपण हे शिकलो. पोर्तुगालमधली संस्कृती पाहिली तर हे सगळं तिथंही बघायला मिळतं. जाणून घ्या, एकमेकांसह प्रेमानं राहणाऱ्या, कुटुंबव्यवस्थेवर गाढा विश्‍वास असणाऱ्या पोर्तुगालचं राहणीमान, तिथली खाद्यसंस्कृती आणि लोकांबद्दल... 

एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा असला पाहिजे. आपल्याला आपल्या देशाचा अभिमान असला पाहिजे. मोठ्यांचा आदर केला पाहिजे. आपल्या संस्कृतीत आपण हे शिकलो. पोर्तुगालमधली संस्कृती पाहिली तर हे सगळं तिथंही बघायला मिळतं. जाणून घ्या, एकमेकांसह प्रेमानं राहणाऱ्या, कुटुंबव्यवस्थेवर गाढा विश्‍वास असणाऱ्या पोर्तुगालचं राहणीमान, तिथली खाद्यसंस्कृती आणि लोकांबद्दल... 

साहसी समुद्रसफरींचा भूतकाळ, अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि सुंदर-सुंदर किनारे लाभलेला देश म्हणजे पोर्तुगाल. ऑलिव्हच्या बागा, वाईन यार्ड्‌स, उंचच उंच कॉर्कची झाडं आणि त्यात उभी असलेली लालचुटूक कौलांची घरं. पोर्तुगालची शान आहे, त्यांच्या कित्येक वर्षं जुन्या इतिहासात, मध्ययुगीन इमारतीत व दिमाखदार किल्ले आणि राजवाड्यात.

पोर्तुगाल देशांतील लोकांसाठी नातेवाईक आणि आपल्या घरातील लोक हेच विश्‍व असतं. त्यांचं कुटुंब म्हणजे आई-वडील व आपली भावंडं एवढंच मर्यादित नाही. त्यात आजी-आजोबा, काका, मामा, आत्या, त्यांची मुलं असे सगळे असतात. हे सगळे एकत्र राहतात असं नाही; पण वेगवेगळे राहूनही त्यांच्यात एकी आणि कुटुंबातील लोकांबद्दल जिव्हाळा, प्रेम व आपुलकी असते. हे लोक उत्सवप्रिय असल्यामुळं लग्न, वाढदिवस, सणवार अशा वेळी ते सगळे एकत्र जमून मजा करतात. 

आपल्याकडं आज सुशिक्षित आणि शहरात राहणाऱ्या लोकांनी नवीन विचारसरणी आणि आधुनिक राहणी आत्मसात केली आहे; तसंच या लोकांबाबतही म्हणता येईल; पण सर्वसाधारण पोर्तुगीज लोक पुराणमतवादी व आपल्या रूढी आणि परंपरा जपणारे आहेत. समाज आणि कुटुंब यात होणारे बदल त्यांना पटकन मान्य होत नाहीत. आजच्या एकविसाव्या शतकातही ‘आपण बरं आणि आपलं कुटुंब बरं’ अशा विचारसरणीचे आहेत.

पोर्तुगालमध्ये वाईन यार्ड्‌स, ऑलिव्हच्या बागा, कॉफीचे मळे, जहाजांची बांधणी, काच, कॉर्क व चामड्याच्या वस्तू बनवणं असे व्यवसाय पिढ्यान्‌पिढ्या चालू आहेत. मासेमारी व त्या अनुषंगाने येणारे इतर उद्योगधंदेही मोठ्या प्रमाणावर चालतात. आपल्या कुटुंबाच्या नावाचा, त्यांच्या उद्योगधंद्याचा व कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेचा घरातील सर्वांना अभिमान असतो व कुटुंबाचं नाव चांगलं राहावं, यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. अशा मोठ्या उद्योजकांच्या घरात आजही तीन पिढ्या एकत्र राहताना दिसतात. 

पोर्तुगीज लोक हाडाचे कलावंत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी केलेले कवडीकाम, आर्ट गॅलरीज, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप, हॉटेल्स अशा ठिकाणी भरलेली चित्रांची प्रदर्शने बघितली की, त्याची प्रचिती येते. पोर्तुगीज संस्कृतीचा वारसा जपणारी कला म्हणजे हाताने रंगवलेल्या सिरॅमिक टाइल्स. या पांढऱ्या रंगाच्या मोठमोठ्या टाइल्सवर निळ्या व पिवळ्या रंगाने पारंपरिक चित्रे काढली जातात. हा व्यवसाय करणारी अनेक कुटुंबे आहेत व घरातील प्रत्येक जण त्या कामी मदत करताना दिसतो.

अशा एकत्र कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष ज्याला ‘कर्ता’ असे म्हणणे योग्य ठरेल, हा कुटुंबप्रमुख असतो. कुटुंबातील सर्वांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी त्या कर्त्या पुरुषावर असते. घरातील पुरुषांनी काम करून पैसे मिळवायचे आणि बायकांनी एकत्रितपणे घर सांभाळायचे, असा खाक्‍या असतो. काही ठिकाणी कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा आणि त्याची बायको ही दोघे कुटुंबप्रमुख असतात. कुटुंबातील वयोवृद्ध लोकांची घरातील लोक काळजी घेतात. वृद्धाश्रम वगैरे गोष्टी यांच्या तत्त्वात बसत नाहीत. आपल्या कुटुंबातील लोकांची आपणच काळजी घेतली पाहिजे, अशा विचाराचे ते आहेत. 

कुटुंबातील सर्व मुलांना त्यांचे हक्क व शिक्षण याबाबत समान वागणूक मिळेल, याकडे घरातील मोठ्या लोकांचे बारकाईने लक्ष असते. अनेक सधन पोर्तुगीज कुटुंबातील मुलं उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जातात; पण शिक्षण पूर्ण झाल्यावर ती मायदेशी परततात. नवीन पिढीही शक्‍यतो दुसऱ्या देशात जाऊन स्थायिक होणे टाळते. मुलांनी लग्न होईपर्यंत एकत्र कुटुंबात राहावं, अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा असते. लग्न झाल्यावर मुलं घराबाहेर पडली तरी ती आपल्या आई-वडिलांच्या घराजवळ राहणं पसंत करतात. एकदा लग्न झालं की, ते कायमचं, अशा विचारांच्या पोर्तुगीज लोकांत घटस्फोटाचं प्रमाण अतिशय कमी आहे. तिथं प्रेमविवाहाचे प्रमाण जास्त असलं तरीही आजही काही ठिकाणी आई-वडील आपल्या मुलांची लग्ने ठरवताना दिसून येतात. या दोन्ही पद्धतींमध्ये प्रथम मुलाकडचे लोक मुलीच्या वडिलांकडे तिला मागणी घालण्यासाठी जातात. जर तिच्या वडिलांनी होकार दिला तरच मुलगा लग्नासाठी मुलीचा हात मागतो.

पोर्तुगालमधील लग्नं चर्चमध्ये धार्मिक पद्धतीने होतात. तरी त्यांचे असे काही खास रीतिरिवाज आहेत. त्यापैकी नवऱ्या मुलीच्या बुटात पैसे ठेवण्याची पद्धत मजेशीर वाटते. लग्नाच्या रिसेप्शनला आलेल्या पाहुण्यांमध्ये नवऱ्या मुलीचा बूट फिरवला जातो. ते त्यात आहेर म्हणून पैसे ठेवतात. असाच दुसरा कार्यक्रम म्हणजे ‘मनी डान्स.’ लग्नानंतरच्या नृत्याच्या वेळी नवऱ्या मुलीबरोबर नृत्य करावयाचे असेल तर बाजूला ठेवलेल्या तिच्या बुटात पैसे ठेवायचे व नंतर तिच्याबरोबर नृत्य करायचं. हे पैसे नवदाम्पत्य आपल्या मधुचंद्रासाठी वापरतात. पोर्तुगीज लग्नात आजही अशा अनेक पारंपरिक पद्धती पाळल्या जातात.

नृत्य, खाणं-पिणं आणि जल्लोष हे तर तिथल्या लग्नातले अविभाज्य भाग आहेत. हा देश वाईनसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे अशा समारंभात वाईन अक्षरश: वाहत असते. जेवणात प्रामुख्यानं माशांचे निरनिराळे पदार्थ असतात. लग्नात अगदी खास पद्धतीचा भला मोठा केक केला जातो. मुख्य जेवणानंतर नवदाम्पत्याच्या हस्ते तो कापून, शॅम्पेन उघडली जाते. लग्नाला आलेल्या प्रत्येक पाहुण्याला शॅम्पेन आणि वेडिंग केक मिळेल, याकडं घरच्या लोकांचं लक्ष असतं. त्या वेळी नवरा-नवरी व मुलीचे वडील सर्वांना उद्देशून छोटंसं भाषण करतात.

इथल्या लग्नातले वरात आणि रूखवत हे दोन समारंभ आपल्यासारखेच असतात. मुलीला लग्नाच्या वेळी तिचे आई-वडील कपडे, दागिने आणि तिच्या घरासाठी उपयुक्त वस्तू देतात. लग्नाआधी नातेवाइकांना बोलावून त्या दाखवण्याचा कार्यक्रम केला जातो. पूर्वापार पद्धतीनुसार त्या वेळी निरनिराळ्या प्रकारच्या पेस्ट्रीज व कॉफी असा बेत असतो.

लग्नात काय किंवा इतर वेळी काय, पोर्तुगीज लोक आपल्या कपड्यांबद्दल फार चोखंदळ व व्यवस्थित असतात. उच्च दर्जाची पादत्राणं आणि उंची कपडे वापरण्याकडं त्यांचा कल असतो. फुटबॉल खेळणं, त्याच्या मॅचेस बघणं, तसेच कॅफेमध्ये जाणं या पोर्तुगीज पुरुषांच्या जीवनातल्या अविभाज्य गोष्टी आहेत. सर्व वयाचे पुरुष कॅफेमध्ये कॉफीचा आस्वाद घेत मित्रमंडळींशी तासन्‌तास फुटबॉलवर गप्पा मारत बसलेले दिसतात. हे लोक आपले आयुष्य शांतपणे जगत आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेतात. त्यामानाने बायका फारशा कॅफेमध्ये जात नाहीत.

पोर्तुगालमधील लहान गावांतील घरात ‘बेड आणि ब्रेकफास्ट’ तत्त्वावर चालवण्यात येणारी गेस्ट हाउसेस असतात. ती शक्‍यतो बायका चालवतात. नाश्‍त्यासाठी तिथं रोज अप्रतिम चवीचे पोर्तुगीज पदार्थ असतात. अनेक गेस्ट हाउसच्या आवारातच बायका लहानशी बेकरी व दोन-चार टेबलं असलेलं कॉफी हाउस थाटतात. कित्येक बायका त्यांना वडिलोपार्जित मिळालेल्या जमिनीत शेती करताना दिसतात. एकूणच पोर्तुगीज बायका खूप कष्टाळू असतात. उत्कृष्ट स्वयंपाक व कॉफी करण्यात त्यांचा हातखंडा असतो. त्यांच्या घरांच्या आवारात अबोली व गुलबक्षीची झाडे लावलेली असतात. गोव्यातील कोळणीप्रमाणेच या बायका आपल्या काळ्याभोर केसांचा अंबाडा घालून त्यावर या फुलांच्या वेण्या माळतात.

पोर्तुगीज लोक जन्मत:च खवय्ये आहेत. उत्तमोत्तम पदार्थ बनवणं, ते खाणं व इतरांना खाऊ घालणं त्यांना मनापासून आवडतं. त्यांच्या जेवणातले मुख्य पदार्थ म्हणजे भात, मासे, सॉसेजेस, शेळीच्या दुधापासून बनवलेले चीज व बटाटे. निरनिराळ्या प्रकारचे ब्रेड, पेस्ट्रीज व केक्‍स ही तर पोर्तुगालची खासियत आहे. मराठी भाषेप्रमाणंच पोर्तुगीज भाषेत पाव, बटाटा, अननस या पदार्थांना तीच नावे आहेत, हे ऐकून मजा वाटली. 

पोर्तुगालमध्ये वाईनइतकीच कॉफीही खूप लोकप्रिय आहे. आलेल्या पाहुण्यांना घरी कॉफीपानास व जेवणासाठी बोलावणं, हा पोर्तुगीज आदरातिथ्याचा एक भाग समजला जातो. अशा प्रसंगी पाहुण्यांनी फुलं किंवा चॉकलेट्‌स घेऊन जाण्याची पद्धत आहे; पण त्या वेळी शेवंती व लिलीची फुलं नेणं टाळलं जातं, कारण ती फुलं अंत्यविधीच्या वेळी नेली जातात. पोर्तुगीज लोक आपले नातेवाईक किंवा जवळची मित्रमंडळी भेटल्यावर त्यांच्या दोन्ही गालांचं चुंबन घेऊन त्यांना अभिवादन करतात. कोणी भेटवस्तू दिली तर ती लगेच उघडायची व देणाऱ्याचे भरभरून कौतुक करण्याची तिथं पद्धत आहे.
इथले लोक अतिशय अगत्यशील आणि प्रेमळ. त्यांची वृत्ती ‘हॅपी गो लकी.’ त्यांचं आपल्या देशावर मनापासून प्रेम आहे. दुसरा कोणताच देश आपल्या देशाइतका सुंदर असणार नाही, अशी त्यांची ठाम समजूत असते. उत्तम कला व इतिहासाचा वारसा जपलेला पोर्तुगाल देश फारसा श्रीमंत नाही; पण लोक खाऊनपिऊन सुखी आहेत. हा देश जरी युरोपियन असला तरी तिथला निसर्ग, संस्कृती, कुटुंबसंस्था आणि लोकांचं आरामशीर राहणीमान बघून गोव्याची आठवण येते आणि म्हणूनच तो देश खूप जवळचा वाटतो.

संबंधित बातम्या