नातं तुझं नि माझं...

डॉ. मेधा ताडपत्रीकर
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

आई-मूल, सासू-सून, नवरा-बायको, बहीण-भाऊ अशा प्रत्येक नात्यात काही ना काही कारणाने ताण निर्माण होतो. या ताणानं नात्यात अंतर तयार होतं. नात्यात अंतर निर्माण झालं की पुन्हा वेगळाच ताण. वेगवेगळे स्वभाव, जबाबदारी स्वीकारणं, वेळ देणं, पैसा, अपेक्षा अशी नात्यात ताण निर्माण होण्याची वेगवेगळी कारणं असतात. ताण कधी येईल हे सांगता येत नाही, मात्र ताणाला सामोरं कसं जायचं, हे आपण ठरवू शकतो...

आई-मूल, सासू-सून, नवरा-बायको, बहीण-भाऊ अशा प्रत्येक नात्यात काही ना काही कारणाने ताण निर्माण होतो. या ताणानं नात्यात अंतर तयार होतं. नात्यात अंतर निर्माण झालं की पुन्हा वेगळाच ताण. वेगवेगळे स्वभाव, जबाबदारी स्वीकारणं, वेळ देणं, पैसा, अपेक्षा अशी नात्यात ताण निर्माण होण्याची वेगवेगळी कारणं असतात. ताण कधी येईल हे सांगता येत नाही, मात्र ताणाला सामोरं कसं जायचं, हे आपण ठरवू शकतो...

अलिकडे जवळजवळ गेले दीड महिना कविताला बॅंकेत खूप काम होतं. तिथं कामाचा ताण होताच... बॅंकेतलं आवरून कविता घरी आली, सासुबाई टीव्ही बघत बसलेल्या होत्या. तिनं स्वयंपाकघरात पाऊल टाकलं आणि तिथली चहाची रिकामी भांडी आणि कप बघून तिला संताप आला. ती बाहेर येऊन काही बोलणार तेवढ्यात सासुबाईच म्हणाल्या, ‘संध्याकाळच्या स्वयंपाकाला लगेच सुरुवात कर गं.’ संध्याकाळचा स्वयंपाक ही तिची जबाबदारी होती.

रात्री नवऱ्याला तिनं हे सांगितल्यावर त्यानं तिचं ऐकून घेण्याऐवजी तिलाच समजून घेण्याचा उपदेश दिला. कविताला काम आणि घरातला ताण सहन होत नव्हतं. आपल्याला कोणी समजावून घेत नाही म्हणून ती निराश झाली. अलीकडे सतत असंच होतं. या सगळ्याचा परिमाण तिच्या कामावर होतो. तिची चिडचिडही होते. परवा तिनं बॅंकेत एकाला चुकून जास्त पैसे दिले, त्यामुळं मॅनेजरची बोलणी खावी लागली.

परस्परांमधली नाती ही तशी खूप जपावी लागतात; पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात या नात्यातले नाजूक बंध ताणले जाऊ लागले आहेत. नवरा-बायको, आई-मुले, सासू- सून, बहीण-भाऊ अशा सगळ्याच नात्यांत ताणामुळे अंतर पडत आहे. एकमेकांमधला संवाद कमी झाला आहे.

प्रत्येकाच्या जीवनातच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताण असतो. कधी तो नातं जपण्याचा असतो, कधी कामाचा, कधी पैशामुळे तर काही वेळा इतर कोणत्याही कारणांमुळे येणारा. प्रत्येकालाच कामाचं ओझं खूप आहे, त्यामुळं ऑफिसमधून घरी आल्यावर घरातल्यांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

घरातली कामं उरकत नाहीत. मुलांनी, नवऱ्यानं सांगितलेलं एखादं काम खरंच विसरलं जातं. मग घरच्यांची चिडचिड सुरू होते. लहानसहान गोष्टीवरून वाद होऊ लागतात आणि या सगळ्यामुळं मनावरचा ताण परत वाढतच जातो. 

मनावर आणि नात्यात ताण येण्याची बरीच कारणं आहेत. ती जर वेळेवर ओळखता आली तर ताण कमी करणं सोपं होतं. नात्यातला ताण हा ‘थेंबे थेंबे तळे साचे’ अशा प्रकारात मोडणारा आहे. ताण हा अंतर्गत वा बाहेरील कारणांमुळे असू शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या वागण्या-बोलण्यावर, विचारांवर होत असतो. 

कामावरचा ताण कमी करणं, हे कायम आपल्या हातात असतं असं नाही. मात्र, आपल्या मनावर ताण आहे याची जाणीव होणं आणि आलेल्या ताणाचं व्यवस्थापन करणं आपल्या हातात असतं. 

काम आणि कुटुंब यात समतोल गाठणं अवघड असलं तरीही अशक्‍य नाही. वीक एंडला कुटुंबासोबत वेळ घालवणं, कधी तरी केवळ नवरा-बायकोनेच फिरायला जाणं आवश्‍यक आहे. एकत्र वेळ घालवल्यामुळेही नात्यातले ताण कमी व्हायला मदत होते. 

कविताच्या उदाहरणाचाच पॉझिटिव्ह पर्याय पाहू. कवितानं एक दिवस सासुबाईंना बसवून तिच्या कामाबद्दल समजावून सांगितलं. त्या करत असलेल्या मदतीबद्दल तिनं आवर्जून सांगितलं. त्यांच्या मदतीची तिला कशी गरज आहे, हेही सांगितलं. सासुबाईही त्याच मन:स्थितीत होत्या. घरातले आणि प्रामुख्याने कविता आपल्या मदतीला गृहीत धरते, असं त्यांचं मत झालं होतं. आता महिन्यातून एका शनिवारी कविता आणि सासुबाई मज्जा करायला जातात. बाहेर सिनेमा, नाटक बघतात, जेवतात. घरात शांतता तर आहेच; पण सर्वांच्या मनावरचा ताणही कमी झाला आहे. 

आरतीचं तर आईशीच पटायचं नाही. लहानपणापासून एका शिस्तीत मुलांना वाढवलेल्या आईला आत्ताही आरतीनं आपलं सगळं ऐकावं असं वाटायचं. आपण ज्या शिस्तीत मुलांना वाढवलं, त्या शिस्तीत आरतीनंही मुलांना वाढवावं, असं वाटत होतं. बदलत्या परिस्थितीत ते शक्‍य होत नव्हतं. त्यातून दोघींमध्ये वाद व्हायचे. भाऊ तोंडदेखलं दोन-चार दिवस आईला घेऊन जायचा. म्हातारपणात आई एकटी राहू नये, तिला त्रास होऊ नये म्हणून आरतीला काळजी वाटायची. तो ताण आणि त्यात आईच्या वागण्याचा ताण. यात भर म्हणून नवऱ्याचं आईबद्दलचं मत वाईट होऊ नये म्हणून धडपड आणि त्याचा ताण. 

आईच्या वयानुसार काही गोष्टी आरतीनं समजावून घेतल्या. आई आणि भाऊ दोघांशीही ती या समस्येबद्दल बोलली. अगदी पूर्ण नसला तरी परिस्थितीत बराच फरक पडला. 

एका स्त्रीच्या शरीरात वयोमानाप्रमाणे वेगवेगळे बदल घडत असतात. वयात येताना, बाळंतपणात, पाळी जायच्या काळात शरीरात वादळं निर्माण होतातच; पण मनातही बदल घडत असतात. आपल्याला समजून घ्यावं, मनात चाललेल्या गोंधळाला कोणी तरी आधार देऊन आश्वस्त करावं एवढीच अपेक्षा असते. मात्र, प्रत्येक नात्यात असे प्रश्न येतच असतात.

रावीला तिचा जॉब आवडतो. तिला दोन लहान मुली आहेत, त्यामुळे संसार आणि काम याची दुहेरी जबाबदारी ती अनेकींप्रमाणे पार पाडते. परवा तिला अत्यंत महत्त्वाची मीटिंग होती. मुलीला जरासा ताप होता; पण नवऱ्याने ऑफिसमधून लवकर येण्याचं कबूल केलं असल्यानं ती थोडी टेन्शन फ्री होती. अचानक नवऱ्याचा फोन आला की, त्याला घरी लवकर जायला जमणार नव्हतं. मीटिंगमध्ये धड लक्ष लागेना. सारखा मुलीचा मनात विचार येत होता. आता तिलाच मुलीला डॉक्‍टरांकडं न्यावं लागणार होतं. मीटिंग संपताक्षणी ती घराकडे धावलीच. मनातून संताप झाला होता. गृहीत धरणं तिला नको झालं होतं. सुट्टीच्या दिवशी नवरा हवं तिथं जाणार, आपले कार्यक्रम ठरवणार; पण रावीला कुठं जायचं असेल तर तिला घरातल्या प्रत्येकाच्या वेळा सांभाळून मगच कार्यक्रम ठरवावा लागायचा. एखाद्या पिंजऱ्यात बंदी झालो आहोत, असं अलीकडं तिला वाटायला लागलं होतं. 

ताणाच्या काळात नात्यांमधला संवाद हरवत जातो आणि मग कालांतरानं संवाद कसा साधायचा, हा प्रश्न पडतो. नात्यातले गैरसमज, दुरावा दूर करण्यासाठी संवाद हाच एका उत्तम उपाय आहे. अबोल्यामुळं निराशा वाढते आणि रागही येतो. रावी नवऱ्याशी बोलली तेव्हा उलट त्याचं उत्तर होतं, ‘तू मला तुझा प्रॉब्लेम सांगत नाही, तेव्हा मला वाटतं ती गोष्ट तुला जमणार आहे.’ रावीला एकदा बोलून उपयोग नव्हता. नवऱ्याला सतत काही गोष्टी सांगाव्या लागणार होत्या.  

राधिकाची आणि सोनालीची वेगळीच व्यथा आहे. राधिका उत्तम शिकलेली आहे, हुशार आहे. दोन वर्षांपूर्वीच तिचं लग्न झालं. नवरा मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करतो. तिच्या माहेरपेक्षा सासर जास्त श्रीमंत आहे. तुला काय गरज आहे पैसे कमवायची म्हणून किंवा आमच्याकडे सुनांनी नोकरी केलेली चालत नाही, अशा तत्सम कारणामुळे ती नोकरी करत नाही. कामाला माणसं असल्यानं घरचंही फारसं काम नाही. या सुखी आयुष्याचा तिला ताण आला आहे. आई-वडिलांनी कष्ट करून आपल्याला जे शिक्षण दिलं ते वाया जातंय, अशी मनात अपराधी भावना आहे आणि सगळं असूनही ती सुखी नाही. तिला काय होतंय, हे नवऱ्याला कळत नाही. सगळी सुखं हातापायाशी असताना नोकरीसाठी ही भुणभुण करते, असा त्याचा समज आहे. संवादातून राधिकाला मार्ग मिळाला. सध्या ती एका अंधशाळेत मुलांना वाचून दाखवायला जाते, तिला पेंटिंग करायची आवड होती ते ती शिकते आहे.  

सोनालीच्या घरात दोघेही नोकरी करत असूनही कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे सतत पैशाची अडचण असते. घरात मोठ्यांच्या तब्येतीच्या तक्रारी, औषधोपचाराचा खर्च, मुलांचे शिक्षण, वाढती महागाई आणि मुलांचे लाड यांत दोघेही अडकले आहेत. पैशांवरून सतत कुरबुर होत असते. नवऱ्याने भावाला पैसे उसने दिले, हे तिला कळल्यावर दोघांत जोरदार भांडण झालं. आताशा कामावरून घरी जाणंही तिला नकोसं झालं आहे. 

काऊन्सेलशी बोलल्यावर तिला जाणवलं की, पैशाचा प्रश्न दोघांचा आहे. सतत नवऱ्याला बोलल्यामुळं तो आजकाल कोणतीही गोष्ट तिला सांगत नाही. तिनं नवऱ्याला पटवून दिलं की, त्याने भावाला पैसे दिल्याबद्दल तिचा आक्षेप नाही; पण तिला आधी विश्वासात घेऊन सांगितलं नाही. आता दोघांनी संवादात एकमेकांपासून काहीही लपवायचं नाही, असं ठरवलं आहे. पैशाचा तिढा हा एकट्याचा नसून कुटुंबाचा आहे आणि दोघांनी जबाबदारीसोबत एकमेकांचे ताण, भीती एकमेकांसोबत ‘शेअर’ करायचे, असं ठरवलं आहे.  

जेव्हा नात्यात कुरबुर होते तेव्हा त्याची जबाबदारी केवळ आपल्या जोडीदाराची आहे, असं समजणं सगळ्यात सोपं आहे; पण तिथंच नात्यात अंतर पडू लागतं.  

आपल्याला कशामुळे ताण आला आहे, हे ओळखणं ही ताण कमी करण्याची पहिली पायरी आहे. ताणामुळे मनाप्रमाणेच शरीरावरही परिणाम होत असतो. काही स्त्रिया ताण आला की, बिस्कीट, चॉकलेटचा सहारा घेतात आणि नंतर ते खाल्लं म्हणून स्वत:ला दोष दिला जातो. त्यातून ताण कमी होण्याऐवजी वाढतच जातो. चिडचिड होणे, निर्णयातली आतुरता, कमी एनर्जी आणि निद्रानाश या सगळ्यातून ताण आला आहे, हे शरीर आपल्याला सांगत असतं. फक्त ते ऐकण्याची गरज असते. 

दुसरी पायरी आहे संवाद साधण्याची. नात्यात ताण आला की त्याकडं दुर्लक्ष करण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती असते; पण त्यामुळं ताण आणि नात्यातलं अंतर वाढत जातं म्हणूनच ताण आहे, हे कबूल केलं तरच त्यावर उपाय करता येतो. जर संवाद साधणं अवघड वाटत असेल तर आपले विचार लिहूनही मदत होते. 

तिसरी पायरी आहे नात्यातील ताणतणावाला आपण स्वत: कारणीभूत आहोत हा ‘गिल्ट.’ समोरच्याला दोष लावणं, त्याच्या चुका काढणं सगळ्यात सोपं असतं; पण यात आपली काही चूक होती का, याकडे डोळसपणे पाहायला हवं. माझ्या नवऱ्याला मी आजकाल आवडत नाही किंवा तो मला वेळ देत नाही, असं म्हणताना त्याची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते, हे गृहीत धरलं जात नाही. नात्यातल्या अपेक्षा या स्वत: निर्माण केल्या जातात आणि त्या फूटपट्टीच्या मापावर जोडीदाराला मोजलं जातं. 

जेव्हा एखादी स्त्री मानसिकदृष्ट्या दुखावली जाते किंवा तिच्या पदरी निराशा येते तेव्हा जोडीदारापासून मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दूर जायचा प्रयत्न करते; पण यामुळे नात्यावर अधिकच ताण येतो. अबोल्यानं नातं एकत्र होत नाही तर केवळ संवाद साधला तरच नातं सुदृढ होत जातं.

एकमेकांसोबत राहायचं म्हणजे भांडण, मतभेद, तंटे होणारच. तो जीवनाचाच भाग आहे; पण आपल्याला कशाचा त्रास होतो, हे समोरच्याला सांगण्यानं मनावरचा भार हलका होण्याला मदत होते. काही व्यक्ती स्वत:च्या भावना व्यक्त करू शकत नाहीत; पण अशा वेळी आपल्या जोडीदाराला समजावून घेणं आणि त्याचा स्वीकार करण्यानंही  ताण कमी होतो. गोष्टीतल्या पुस्तकाप्रमाणे किंवा सिनेमाच्या हिरोसारखा नवरा असावा, हे वाटत असलं तरी वास्तवता तशी आहे का? हे पाहिलं की जोडीदाराला स्वीकारणं सोपं जातं.

नात्यातल्या ताणामुळे बाहेरील एखाद्या व्यक्तीकडे मन आकर्षित होऊ शकतं. जोडीदारापेक्षा ती व्यक्ती समजावून घेते, असं वाटू लागतं. रमेश आणि सीमा यांच्याबाबतीत हेच घडलं. रमेश मुळातच अबोल. सीमाला सारखं वाटायचं तो आपल्याला वेळ देत नाही. ऑफिसमधून लवकर येत नाही. आपल्याशी बोलत बसत नाही. दोघांनाही एकमेकांचे स्वभाव समजलेच नाहीत. रमेशनं सीमाबरोबरचा संवाद आणखीनच कमी केला. त्याच्यात ऑफिसमधली रश्‍मी आपलं सगळं ऐकून घेते, असं त्याला वाटू लागलं आणि तो बऱ्याच गोष्टी तिच्याशी बोलू लागला. रमेश आणि सीमाच्या नात्यातला ताण अधिकच वाढला.    

नात्यात एकत्र राहायचे म्हणजे सगळाच काळ केवळ सुखाचा, असं समजून चालणार नाही. यात अनेक चढ-उतार होत असतात. ताण हा जीवनातला एका अविभाज्य भाग आहे; पण प्रत्येकजण त्याला वेगवेगळ्या प्रकारे सामोरा जात असतो. एखादी घटना एखाद्यासाठी तणावपूर्ण असली तर ती दुसऱ्याकरिता असतेच असं नाही. प्रत्येक प्रकारच्या ताणाला उपाय आहेच असं नाही आणि कोणता ताण आयुष्यात येईल यावरही आपलं नियंत्रण नाही; पण आपण त्या ताणाला कसे सामोरे जातो, हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार विचार आणि वागण्यावर एकत्रित नियंत्रण ठेवू शकता. ताण कमी करण्यासाठी एकमेकांत संवाद सुरूच ठेवा. संवादामुळे एकाकीपण कमी होतं. नात्यातला विश्वास आणि एकमेकांप्रती बांधिलकी वाढते. ताणाबद्दल जागरूक राहा, त्याची चाहूल ओळखायला शिकलात तर कोणत्याही नात्यात ताण आला तरी अंतर येणार नाही.

संबंधित बातम्या