नात्यांची ‘ताणा-ताणी’

आशिष तागडे
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

व्हॉट्‌स अॅपवर एक मेसेज फिरत होता. लग्न ठरलेली मुलगी आपल्या आईला विचारते, ‘‘आई, लग्न झाल्यावर मी सासरी कशी वागू, असं तुला वाटतं?’’ आई उत्तर देते, ‘‘तुझ्या वहिनीने आमच्याशी म्हणजे आपल्या घरात कसं वागावं, असं तुला वाटतं, त्याप्रमाणं तू सासरी वाग.’’ नवी माणसं, नवं ठिकाण या सगळ्यांशी जुळवून घेताना काही चुकेल का, वाद होईल का, असा ‘गिल्ट’ प्रत्येक मुलीच्या मनात राहतो. या गिल्टमुळं ताण निर्माण होतो.

व्हॉट्‌स अॅपवर एक मेसेज फिरत होता. लग्न ठरलेली मुलगी आपल्या आईला विचारते, ‘‘आई, लग्न झाल्यावर मी सासरी कशी वागू, असं तुला वाटतं?’’ आई उत्तर देते, ‘‘तुझ्या वहिनीने आमच्याशी म्हणजे आपल्या घरात कसं वागावं, असं तुला वाटतं, त्याप्रमाणं तू सासरी वाग.’’ नवी माणसं, नवं ठिकाण या सगळ्यांशी जुळवून घेताना काही चुकेल का, वाद होईल का, असा ‘गिल्ट’ प्रत्येक मुलीच्या मनात राहतो. या गिल्टमुळं ताण निर्माण होतो.

नव्या लोकांत कसं वागावं कळत नाही. मनातला गिल्ट काढला आणि समोरच्यांनी समजावून घेतलं, तिला वेळ दिला तर हा ताण नक्कीच कमी होऊ शकतो. लग्नानंतरची नाती सांभाळण्याच्या परिस्थितीचा ताण याविषयी तरुणींसमवेतची चर्चा....

लग्नानंतर अवघ्या वर्षभरात विभक्त झालेल्या मालिनीला नाते जपायचा खूप ताण यायचा. ती स्वत: ‘आयटी’मध्ये काम करणारी. सासुबाई शासकीय नोकरीत, सासरेही चांगल्या कंपनीत नोकरीला. नवरा खासगी कंपनीत.

मालिनीची शिफ्ट ड्युटी. कधी सकाळी सहाला बाहेर पडावं लागायचं किंवा शिफ्ट बदलली की रात्री घरी यायला उशीर व्हायचा. लग्नानंतर सुरवातीच्या काळात फार कुरबुरी नव्हत्या; परंतु कालांतरानं त्या वाढायला लागल्या.

अखेर नवऱ्यासह मालिनीला वेगळं राहणं भाग पडलं. घर, ड्युटी आणि घरी येणारे नातेवाइक यांची सांगड घालताना मालिनीची खूप दमछाक व्हायची. नात्यांचा ताण सहन होण्यापलीकडे गेल्यावर तिला वेगळं राहावं लागलं.  

आपल्याकडे मुलीला लहानपणापासून ‘तू दुसऱ्या घराची धन’ असं बिंबवलं जातं. मुलाला बरोबर याच्या उलट पद्धतीने समजूत करून दिली जाते.

शर्मिला म्हणते, ‘‘लग्नानंतर मी सून होणार तसा माझा नवराही कोणाचा तरी जावई होणार आहेच ना? सारे नियम केवळ सुनेसाठीच का? हेच माझे माहेर म्हणून मी सासरी चांगले वागणे अपेक्षित असेल तर नवरे मंडळींना (अर्थात मुलांना) सुद्धा हे तत्त्व लागू होते. अनेक ठिकाणी सासर आणि माहेर यातील रूढी, परंपरा, सण-उत्सव साजरे करण्याची पद्धत वेगवेगळी असते, यामुळेच सासरच्या घरी रुळण्याचा ताण फक्त मुलीच्या वाट्याला येतो. घरी आलेल्या नवीन मुलीला (सुनेला) किमान वर्षभर रुळण्यासाठी वेळ दिला पाहिजे. नवीन सुनेला अगदी नातेवाइकांच्या नावापासून काहीच माहिती नसते. ती माहिती करून देणं, हे नवऱ्याचं कर्तव्य आहे. अनेकवेळा पूर्वी काय झालं, याची माहिती नसते. मुलगी नव्यानं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करते, त्या वेळी विनाकारण घरच्यांची (सासरच्यांची) बोलणी खावी लागतात. किरकोळ वादही उद्‌भवतो. यात आमची काय चूक?’’ असा थेट प्रश्‍नही शर्मिला उपस्थित करते. ‘नाते जपणारा नातेवाइक’ अशी थेट व्याख्या करत अस्मिता म्हणाली, ‘‘खरं तर आम्ही मुली सासरी गेल्यावर खूप ‘ब्लाइंड’ असतो. सासू-सासरे, नवरा, हे कोणाशी कसे वागतात, याचा अंदाज घेऊन आम्हाला पुढे नाते निभवावे लागते. कधी तरी किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अबोला धरलेला असतो. मला ते नाही पटत. जे काही असेल ते तोंडावर बोलायचं, मन मोकळं करायचं आणि पुन्हा आपापल्या कामाला लागायचं, असं असायला हवं. आजच्या जगात कोणाला एवढा वेळ आहे की, तासन्‌तास कोणाकडं जाऊन बसायचं आणि गप्पा मारायच्या.’’ 

आपण चुकीचं वागतो का? वाद होतील का? अशा शंकांमुळं नाती जपण्याचा आम्हाला निश्‍चितच ताण असतो. गेल्या आठवड्यातील घटना. एक नातेवाइक आमच्याकडे आल्या. सासुबाई बाहेर गेल्या होत्या. मी रीतसर त्यांना चहा-पाणी, नाष्टा केला आणि घड्याळाकडे पाहत सांगितले, ‘मला ऑफिसला जायला उशीर होत आहे, मी निघू का? सासुबाई येईपर्यंत तुम्ही बसा.’ त्यावर त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. ही काल घरात आलेली मुलगी मला घराबाहेर काढते की काय, असा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. झाले, सासुबाईंना नंतर त्यांनी काय सांगितलं कोण जाणे, मी ऑफिसहून आल्यावर नवऱ्यासह सासुबाईंनी माझी फूल टू ‘हजेरी’ घेतली.

त्या बाई आल्या होत्या, त्या बाहेरच्या होत्या; पण सासुबाई, किमान नवऱ्याने तरी समजून घ्यायला पाहिजे होते ना. आम्ही नोकरी करतो, म्हणजे आम्हाला कोणतीही सूट नको. आम्हालाही नातेवाइक हवे असतात. आम्ही काही लग्न करून घर तोडायला आलेलो नसतो. किमान इतके तरी समजून घ्यायला पाहिजे. ही समजूत आली तरच ताण कमी होतील. ‘सुपर वुमन’ होण्याच्या नादात महिला स्वत:ला हरवून बसतात, अशी खंत व्यक्त करत अनुराधा म्हणते, ‘‘घर, ऑफिस आणि नातेवाइक सांभाळणं ही खूप तारेवरची कसरत असते. कोणा नातेवाइकांकडे बारसे, वाढदिवस असे काही कार्यक्रम असले की जावेच लागते. नाही गेलो तर टोमणे ऐकावे लागतात. यातून आमच्याच मनात एक प्रकारचा ‘गिल्ट’ तयार होतो. छोट्या कारणांसाठी ऑफिसमधून रजा मिळणेही कठीण होऊन जाते. अशा वेळी काय करायचे याचा खूप ताण येतो. बरं, ऑफिसमधून थेट जाणंही शक्‍य नसते. कारण मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही.’’

संबंधित बातम्या