जबाबदारी दोन मुलांची

श्रुती पानसे
बुधवार, 20 डिसेंबर 2017

मुलांना वाढवणं ही तशी आईचीच जबाबदारी असते. पालकत्व स्वीकारताना अनेकदा या आईला स्वतःकडं दुर्लक्ष करावं लागतं. मुलांना वाढवताना आईला येणाऱ्या समस्या आणि त्या दूर कशा कराव्यात हे अनुभवातून सांगणारी, मनापासून लिहिलेली ‘आईची डायरी’. 

परवाच मी कुठेतरी वाचलं की आपल्या मनात आलेले विचार कोणाला तरी सांगितले की खूप बरं वाटतं. मन हलकं होतं. पण या सगळ्या माझ्या घरातल्या गोष्टी सांगायच्या तर माझ्या बहिणीही माझ्याजवळ नाहीत आणि मैत्रिणीही नाहीत.

मुलांना वाढवणं ही तशी आईचीच जबाबदारी असते. पालकत्व स्वीकारताना अनेकदा या आईला स्वतःकडं दुर्लक्ष करावं लागतं. मुलांना वाढवताना आईला येणाऱ्या समस्या आणि त्या दूर कशा कराव्यात हे अनुभवातून सांगणारी, मनापासून लिहिलेली ‘आईची डायरी’. 

परवाच मी कुठेतरी वाचलं की आपल्या मनात आलेले विचार कोणाला तरी सांगितले की खूप बरं वाटतं. मन हलकं होतं. पण या सगळ्या माझ्या घरातल्या गोष्टी सांगायच्या तर माझ्या बहिणीही माझ्याजवळ नाहीत आणि मैत्रिणीही नाहीत.

कथकच्या परीक्षा देऊन निदान मी क्‍लासमध्ये असिस्टंट म्हणून काम तरी करायचे, पण सध्या नव-याच्या बदलीमुळे आम्ही पुण्याला राहायला आलो आहे. इथे कोणीच नाही जास्त ओळखीचं. बरं बहिणीशी किंवा मैत्रिणींशी फोनवर बोलायचं तर इतकं काही महत्त्वाचंही घडतही नाही आयुष्यात. नेहमीच्याच गप्पा. प्रत्येक दिवस थोड्याफार फरकाने सारखाच. मागे तर ताई म्हणालीही, माधुरी, तुला कंटाळा येत असेल तर काही तरी काम मागे लावून घे पण कंटाळू नकोस; मात्र इथे या परक्‍या गावात, कोणी ओळखीचं नसताना मी करू काय? साधं बोलायलाही नाही कोणी. म्हणूनच आता ठरवलं आहे, लिहून काढायचं. म्हणजे बरं वाटेल. शाळेत असताना बाई सांगायच्या की रोज आपली दैनंदिनी लिहावी. त्यात आपण आज काय केलं, नवीन काय पाहिलं, काय वाचलं, त्यातलं काय आवडलं, आपल्या मनात कोणते विचार आले हे लिहावेत. म्हणून मी आजपासून जे घडलं ते लिहिणार आहे. जानेवारी महिन्यापासून सुरुवात केली की बरं...असंही वाटतंय. 

१ जानेवारी २०१७  
आत्ताच दोघं शाळेत गेली. मी घरी एकटीच आहे. खरं तर ही नेहमीची वेळ आहे माझी सीरिअल बघण्याची. आवडतात मला सीरिअल्स बघायला. रोज काही ना काही घडत असतं त्यात. वेळही बरा जातो; पण आज डायरीलेखनाच्या पहिल्याच दिवशी सीरियलवर काट. आणि डायरीचं पहिलंवहिलं कोवळं कोवळं पान माझ्यासाठी खुलं केलंय. ते माझी वाट बघतंय.

डायरी लिहायचं ठरवलं आणि खूप छान-छान सुचायला लागलंय. खरं तर माझा मूड सकाळी अगदी वाईट होता. इतका वाईट की असं वाटलं हे डोकं नाहीये, बाजार भरलाय नुसता. हा बाजार नाहीसा करायचा तर अक्षरश: डोकं आपटून घ्यावं कुठेतरी; पण हे शक्‍यच झालं नाही. कारण डोकं आपटायला तरी वेळ पाहिजे ना थोडासा. 

माझी ही दोन मुलं. मुलं गोजिरवाणी असतात म्हणे!!! मला तर असं काही वाटतच नाही आजकाल. उलट असं वाटतं की कुठलेतरी वैरीच आहेत. मला त्रास देण्यासाठीच खास नेमणूक झाली आहे त्यांची. एकाला एक वस्तू हवी असली तर दुसऱ्याला नेमकी तीच हवी असते. त्यावरून भांडणं. मारामाऱ्या. एकमेकांचे कपडे ओढणं, ढकलणं. आज तर कहरच केला. मी भराभरा डबा भरत होते, तर तिनं पसरलं मोठ्ठं भोकाड. बघितलं तर, कारट्याने लेकीची वेणीच ओढली होती. इतकी कळवळून रडत होती बिचारी. हे बघूनही तो पुन्हा दुसरी वेणी खेचायला जाणार इतक्‍यात मी रागाने त्याला मागेच ओढलं, ओढलं कसलं? फरफटवलंच!!! तो खाली पडला (माझ्यामुळे) तर ही बया दाण्णकन त्याच्या पोटावरच बसली. त्याने केली जोरजोरात बोंबलायला सुरुवात, हे बघून तिला मागे दिलं ढकलून (मीच). सकाळी सकाळी सातच्या सुमाराला हे फेकणं आणि फरफटणं मी केलं. मी! मी हे केलं! 

काय करू मग? खरं तर मी खूप बारीक आहे. दमतेही खूप. शक्तीच नसते अंगात काही; पण आज हे सगळं करायला बक्कळ शक्ती होती अंगात. कुठून आली कुणास ठाऊक?
बरं ! ही भांडणं कशावरून तर एका खोडरबरावरून. हे खोडरबर माझं की तुझं, याच्यावरून! 

नववर्षाची ही माझी पहिली सकाळ. काय चाललंय हे? मी माझ्या असल्या जीवनाची कल्पना तरी केली होती का? आत्ता शांत बसले आहे मी. तेव्हा मात्र खूप चिडले, वैतागले होते. इतकी रागावले दोघांवर की बास रे बास ! काय काय बोलले कुणास ठाऊक? मूर्ख लेकाचे ! असं म्हटलं त्यांना. अजूनही काय काय म्हटलं, पण लिहीत नाही. मला खूपच कसंतरी वाटतंय आत्ता. नकोच तो विषय. जाऊ दे.
आपलीच मुलं पण आपण काय-काय बोलतो त्यांना.

वाईट वाटतंय खूपच. जाऊ दे. आज संध्याकाळी ते घरी आले की सॉरी म्हणेन त्यांना. मी रागाच्या भरात चुकीचे शब्द बोलले.  ते शब्द वाईट होते असंही सांगेन त्यांना.
सकाळची वेळ ही खरं तर किती छान वेळ असते. त्यातून सव्वा सहा ते साडे सहा ही तर माझी फारच आवडीची वेळ आहे. थोडासा अंधार... थोडासा उजेड! स्वच्छ हवा. मी इतकी खुशीत होते आज. मला आठवतंय कॉलेजमध्ये पहिलं लेक्‍चर सात वीसचं असायचं. मी याच वेळेत घरातून निघायचे. मैत्रिणीकडे जायचे. आम्ही दोघी सायकलवर कॉलेजला जायचो. अकरावी-बारावी अशी दोन वर्षं !  खूपच छान वाटायचं. मस्त. मोकळं आणि खूप ताजंतवानं. तेव्हापासून मला सकाळची ही वेळ आवडायला लागली. 

त्यातून ही नववर्षाची पहिली सकाळ. सगळे जण रात्री उशिरापर्यंत पार्टी करतात आणि दुसऱ्या दिवशी उशिरा उठतात. एका वर्षी मी माझ्या बहिणीने ठरवलं, की आपण नेहमीच्या वेळेला झोपायचं आणि पहाटे एन्जॉय करायचे. त्या १ जानेवारीला आम्ही दोघी सहा वाजता घरातून निघालो आणि पूर्व दिशा पकडून गाडीवर निघालो. जिथून उगवता सूर्य छान दिसेल अशा ठिकाणी थांबलो. एक बरं म्हणजे गावातल्या तळ्यापाशी आलो होतो आम्ही. तिथून स्वच्छ, नवा नवा सूर्योदय बघितला. मला उठल्यापासून हेच सगळं आठवत होतं. स्वयंपाक करतानाही मनातल्या मनात मी त्या तळ्याकाठीच होते.

...आणि डबे भरताना मात्र आमच्या घरात रणकंदन चालू झालं. डायरीच्या पहिल्याच पानावर हे असं...

अशावेळी असं वाटतं, मुलं व्हायच्या आधी कशा असतो आपण! आपल्यातच असतो फक्त. मी, माझ्या आवडीनिवडी, माझं शिक्षण, माझं कथक, मित्र-मैत्रिणी, आई बाबा, भावंडं. आता मात्र प्रत्येक वेळेला स्वत:च्या आधी मुलांचा विचार करावा लागतो. 
कधी कधी त्रास होतो...

२ जानेवारी २०१७ 
काल काय लिहिलं ते आज परत वाचलं. असं वाटलं की बरं झालं, हे सगळं मनात आलेलं लिहून काढलं ते. 

कालचा दिवस असा तर आजचा दिवस वेगळाच होता. आज बुधवार. शाळेत खाऊचा डबा द्यायचा होता. सकाळी माझ्या आवडत्या वेळेला उठले आणि सोप्पा शिरा करून डब्यात दिला. तरी बरं. दोघांचं एकमत झालं म्हणून. नाहीतर एकाने शिरा म्हटलं, की दुसऱ्याने पोहे म्हटलंच म्हणून समजा. म्हणून मी त्यांना काय विचारायलाच जात नाही. मला हवं ते करून मोकळी होते. त्यांना खायलाच लागतं मग!  

बाकी मी आज दिवसभरात काही केलं नाही. करण्यासारखं काही नव्हतंच. आजारी पडणार असं वाटत होतं. थकले होते खूप. स्वयंपाक तेवढा केला. मुलांचा अभ्यास...बस्स इतकंच.!

४ जानेवारी २०१७ 
काही घडलंच नाही तर काय लिहू?

तेच ते. स्वयंपाक. मुलं. भांडणं सोडवणं, अभ्यास घेणं. दुपारच्या सीरिअल्स. खूप थकते मी एवढं करूनच. मग झोपते दुपारी.

नाही म्हणायला पेपरमध्ये एक लेख वाचत होते. त्यातलं हे वाक्‍य खूप आवडलं. कॉलेजमधला मुलगा म्हणत असतो, जरी जग सांगत असलं की सोडून दे, तरी मन म्हणत असतं, नको सोडू. जरा थांब अजून. 

या वाक्‍यावर बराच विचार चाललाय मनात. उगाचच आपलं. 

आता हे घरातलं करता-करताच नाकीनऊ येतात माझ्या. फक्त दुपारीच तेवढी विश्रांती मिळते. शनिवारी रविवारी तेही नाही. मुलांचा अभ्यास आणि भांडणं, खाणं आणि मारामाऱ्या बस्स. हे करता-करताच वैताग येतो नुसता.

५ जानेवारी २०१७ 
आज शाळेत गेले होते. मुख्याध्यापक टीचरनी बोलावलं होतं. मागे आमच्या बोलण्यामधून त्यांना कळलं होतं की मी कथक शिकलेली आहे. म्हणून मला गॅदरिंगमध्ये मुलांचा नाच बसवायला बोलावलं आहे. मला फारच आनंद झाला. मी लगेच हो म्हटलं. सहावीचा एक  आणि आठवीच्या मुला मुलींचा एक असे दोन नाच बसवायचे आहेत. मी या आधी कधीच हे केलेलं नाही. पण जमेल का मला, असा काही प्रश्न त्या समोर असताना माझ्या मनात आलाच नाही. मी जबाबदारी घेतली आणि कोणती गाणी घ्यायची ते ठरवूनही आले. 

टीचरनी माझी सगळ्या मुलामुलींशी ओळख करून दिली. सांगितलं की, या तुमच्या डान्स टीचर आहेत. जरा टेन्शन आलं. मोठ्या मुलांची सवयच नाही ना मला. 
घरी आल्या आल्या लगेच डायरी लिहायला बसले. आत्ता लिहितांना वाटतंय, जमेल ना मला? मुलं ऐकतील ना माझं? क्‍लासमध्ये कसं ताई असायच्या सोबत. मी त्यांच्या हाताखाली शिकतही होते. इथे सगळं माझं मलाच ठरवायचं आहे. तेही दहा-वीस मुलांसाठी. त्यांच्या स्टेप्स, वेगळ्या फॉर्मेशन्स, ड्रेपरी सगळंच. वेळही तसा कमीच आहे हातात.

१५ जानेवारी २०१७
सकाळी सकाळीच वेळ काढून पटकन लिहिते आहे.
काल रात्री स्वप्नात मी नाचतच होते.

१८ जानेवारी २०१७ 
डायरी लिहायला वेळच मिळत नाहीये निवांत. गॅदरिंगचीच तयारी चालू आहे. मजा येते आहे. 

२० जानेवारी २०१७ 
मला या सगळ्या दिवसांत इतकं छान इतकं छान वाटतंय म्हणून सांगू. सध्या मी मुलांबरोबरच शाळेत जाते आहे डबा घेऊन आणि त्यांच्याबरोबर परत येते. दोन्ही नाच बसवून झाले. काही मुलांना स्टेप्स लवकर जमतात. काहींना थोडा वेळ लागतो. विसराविसरी पण व्हायची! ठरवलेली स्टेप कितीकदा बदलावी लागली; पण मजा येते आहे. आता नाच छान बसले आहेत. नाच बसवण्याशिवाय इतरही काही काही मदत केली. पहिलीतल्या एका मुलाची आईपण येते शाळेच्या मदतीला. तिच्याबरोबर आणि कलेच्या टीचरबरोबर मस्त काम केलं. सोनेरी कागदांचे मुकुट बनवले. गुलाबी- लाल  चंदेरी- हिरवे असे खूप सारे पंख बनवले. फुलपाखरांचे पंख, पोपटांचे पंख. ते रंगवले, टिकल्यांनी सजवले.

रविवारीही प्रॅक्‍टिसला गेलो आम्ही तिघं. बाबा घरात एकटाच. त्यालाही बरं वाटलं असेल जरा. संध्याकाळी घरी आलो तर बाबानी अर्धामुर्धा स्वयंपाकही करून ठेवला होता. 

२१ जानेवारी २०१७
आज झालं गॅदरिंग. मलाच इतकं टेन्शन आलं होतं, की ही मुलं करतील ना नीट नाच, पण सगळ्या मुलांचं काम छान झालं. ही दोघंही त्यांच्या वर्गात नाचतच होती. छान नाचले दोघंही. त्याला तर थोडी ॲक्‍टिंगही करायची होती. बेट्याने मस्त केलं काम. टाळ्या मिळवल्या. माझी सहावी आणि नववीतली मुलंही मस्त नाचली. माझं ओझं उतरलं. सगळ्या स्टेप्स ठरवल्या तशा पार पडल्या. नव्हे; स्टेजवर ड्रेपरीसकट असल्यामुळे जास्तच खुलल्या.  शिवाय शिक्षकांनी स्टेजवर बोलावून मला धन्यवाद वगैरे दिल्यामुळे एकदमच कॉलर ताठ झाली माझी. मुलांची आणि बहुतेक नवऱ्याचीही. मी नाचातल्या मुलांबरोबर सेल्फी काढत होते, तर त्याने आमच्या सगळ्यांचे बरेच छान-छान फोटो काढले. अजूनही मनातून नाच काही जात नाहीये. अजूनही नवी वेगळी गाणी सुचताहेत. त्यावर वेगवेगळ्या स्टेप्स सुचताहेत. 
वाह.. मस्त गेला आजचा दिवस माधुरी चल, आता इस बातपे एक कडक चाय हो जाय... 

ही खरं तर चहा प्यायची वेळ नाही. रात्र झाली आहे. झोप आली आहे; पण मी दमलेली नाही. मला खूप आनंद झाला आहे.

२२ जानेवारी २०१७ 
मस्त थंडी पडली आहे. आम्ही दुपारी खडकवासल्याला फिरायला गेलो. भर दुपारीही थंडी वाजत होती. मुलांना धरणाचे दरवाजे दाखवले. केवढं वेगात पाणी येत होतं. सगळे दरवाजे उघडल्यावर तर कसलं वाटत असेल. 

गंमत म्हणजे घरी आल्यावर लेकीने लगेच चित्र काढायला घेतलं. त्या चित्रात तिने त्या दरवाज्यांचंच चित्र काढलं तिला जमेल तसं.

२३ जानेवारी २०१७ 
आज सोमवार. सगळे आपापल्या कामात. मी घरी.  आता माझं काय काम शाळेत? 
काहीच नाही. कंटाळा आला आहे असं वाटतंय. काय करावं?

२८ जानेवारी २०१७ 
पुन्हा या दिवसात काही केलंच नाही विशेष.

मगाशी एका सीरिअलमधली एक सासू तिच्या सुनेला म्हणत होती, आई आनंदी तर मुलंही आनंदी. किती खरंय ना हे वाक्‍य? मी आता ताईलाही फोन करणार आहे. हे वाक्‍य ताईलाही सांगणार आहे. तिच्या आवडीचं काम करायला मिळतं त्यामुळे ती खूश असते कायम. ती कधी दमत नाही, कंटाळत नाही. दुपारी झोपत नाही माझ्यासारखी. उलट कामात असते म्हणून मजेत असते. ती पण आणि तिचं घरपण. 

मलाही काहीतरी करावंसं वाटतंय. आनंदी राहण्यासाठी काम करावंसं वाटतंय.

संबंधित बातम्या