स्मार्ट आई होताना...

अभय देशिंगकर
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

मुलांनी स्मार्ट व्हावं असा आईचा अट्टाहास असतो. आपली इच्छा ती मुलांवर लादते. त्यातून निर्माण होतो फक्त दोघांच्या मनातला ताण... 

मुलांनी स्मार्ट व्हावं असा आईचा अट्टाहास असतो. आपली इच्छा ती मुलांवर लादते. त्यातून निर्माण होतो फक्त दोघांच्या मनातला ताण... 

रोहन घरात शिरल्या-शिरल्या सरळ बेडरूममध्ये गेला आणि एकटाच कोपऱ्यात जाऊन बसला. स्मिताने काणाडोळा केला. येईल थोड्या वेळाने बाहेर, असा विचार करून ती कामाला लागली. तीही ऑफिसमधून नुकतीच आली होती. रोहन तिचा एकुलता मुलगा. बराच वेळ झाला रोहन बाहेर आला नाही म्हणून ती आत गेली. रोहन एकटाच कोपऱ्यात रडत बसला होता. विचारल्यावर समजलं, ग्राऊंडवर मुलांनी त्याला चिडवलं आणि खेळातून बाहेर काढलं होतं. रोहनला क्रिकेटपेक्षा बुद्धिबळ खेळायला जास्त आवडायचं; पण स्मिताच्या हट्टापायी त्याला ग्राऊंडवर क्रिकेट खेळायला जावं लागत होतं. रोहननं मैदानी खेळ (क्रिकेट) खेळलेच पाहिजेत, असा तिचा आग्रह होता. तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीचा मुलगा क्रिकेटमध्ये अव्वल होता. 
दुसऱ्या दिवशी ती रोहनला घेऊन ग्राऊंडवर गेली. मुलांनी तिला सांगितलं, ‘काकू, रोहनचं खेळात लक्षच नसतं. मग आमचाही खेळाचा विचका होतो. तो इथं खेळायला येतो; पण त्याला चेस खेळायचं असतं.’ स्मिता रोहनवर ओरडत रागातच घरी आली. मी तुझ्या क्रिकेटचे पैसे भरण्यासाठी काय-काय करते, याचा पाढाच वाचला. स्मिताच्या या ताणाचं काही दिवसांत स्ट्रेस डायबेटिसमध्ये रूपांतर झालं.

*****

अनिल-मानसी दोघांची वरचेवर भांडणं व्हायची. मानसीने मुलगा अथर्वला इंग्लिश मीडियममध्ये घातलं होतं. अथर्वने सर्व गोष्टीत पहिला क्रमांक पटकावलाच पाहिजे, असा तिचा हट्ट होता, जो अनिलला मान्य नव्हता. अनिलच्या पगारात अथर्वचे क्‍लासेस, घरखर्च भागत नव्हतं म्हणून तिनेही नोकरी पत्करली होती. अनिल तिला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न करायचा; पण तिला ती लुडबूड वाटायची. सकाळी उठून अनिलचा, अथर्वचा, तिचा डबा करायचा. अथर्वला स्कूलबसमध्ये बसवायला जायचं, यात तिची धावपळ व्हायची. अथर्व शांत स्वभावाचा होता. बसमध्ये तो सर्वात शेवटी जाऊन बसायचा; कारण पुढच्या सीटवर बाकीची मुले बसलेली असायची. अथर्वला पुढेच जागा मिळाली पाहिजे, नाहीतर तो कायम मागे राहील, असा तिचा समज होता. परिणामी, वरचेवर स्कूलबसच्या ड्रायव्हरबरोबर वाद ठरलेले असायचे. एखाद्या दिवशी अनिल काही बोलला की स्फोट व्हायचा, त्यामुळं संपूर्ण कुटुंबच तणावात होतं. एके दिवशी मानसी ऑफिसमध्ये चक्कर येऊन पडली, तेव्हा कळलं, तिला हाय ब्लडप्रेशरचा त्रास सुरू झाला होता.

*****

माया एक निष्णात समुपदेशक आणि वकील म्हणून फॅमिली कोर्टात प्रसिद्ध होती. तिचा मुलगा यशने ‘आई पाहिजे’ म्हणून सकाळीच धोशा लावलेला. तिला मात्र व्हॉट्‌स ॲपचे मेसेज, सकाळचा स्वयंपाक यातून वेळच मिळत नव्हता. तिच्या मते, हे सगळं आवश्‍यक होतं. यशला ज्या वेळी ती हवी असायची, त्या वेळी सोशियल मीडियाशी कनेक्‍ट राहिलं पाहिजे, म्हणून ती व्हॉट्‌स ॲपवर असायची. त्यात भर म्हणजे यशने काहीतरी बनलं पाहिजे म्हणून त्याला पोहायच्या क्‍लासला घातलं होतं. एखाद्या दिवशी त्याने पोहण्याचा क्‍लास चुकवला तर त्यानं मार खाणं ठरलेलं. नंतर ती स्वत:लाही त्रास करून घ्यायची. या सगळ्यांमुळं यश आपल्यापासून लांब तर जाणार नाही ना, अशी काळजी ही तिला पोखरायची. 

*****

या तिघींशी बोलताना जाणवलं, या तिघी ‘स्मार्ट आई’ बनण्याच्या नादात वेगवेगळ्या आजारांच्या शिकार होत होत्या. माझ्या मुलानं सर्वांपेक्षा वेगळं काही बनलं पाहिजे. तेही आपल्याला वाटतं तसंच, या अट्टाहासापायी स्वत:चं आणि मुलांचंही विश्‍व या आया स्वतःच्या मनाप्रमाणं घडवू पाहत आहेत. अपवाद वगळता आज बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती दिसते. परिणामी, या सर्वांचा ताण त्यांच्याच शरीरावर, मनावर आणि कुटुंबावर येत राहतो.  

आता काही सकारात्मक उदाहरणं बघू... सागर, अर्चना आणि कौशिकचा मुलगा. अर्चना भौतिकशास्त्राची प्रोफेसर होती आणि कौशिक बिझनेसमन. सागर अभ्यासात यथातथाच होता. त्यानं अभ्यासाकडे लक्ष द्यावे म्हणून अर्चना सतत प्रयत्नशील असायची. मी भौतिकशास्त्राची प्रोफेसर आहे म्हणून माझा मुलगाही तसाच असावा, असं तिला सतत वाटायचं. कौशिकनं मात्र घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवलं होतं. सागरला गिटार वाजवायला आवडायचं, हे लक्षात ठेवून त्यानं त्याला गिटारच्या क्‍लासला पाठवायला सुरुवात केली होती. दोन-तीन वर्षांतच त्यानं स्वत:चा क्‍लास सुरू केला. त्यात त्याचं नावही होऊ लागलं. 

*****

सुचेतानं दहावी होताच, मी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार नाही, असं जाहीरच केलं. तिला गणिताची आवड नव्हती. तिच्या इच्छांचा आदर राखत आईबाबांनी तिला चांगल्या महाविद्यालयात कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊन दिला. कॉलेज करताना सुचेताला जपानी भाषेची गोडी लागली आणि तिनं त्यात डिप्लोमा पूर्ण केला. बी.कॉम.च्या प्रथम वर्षात तिच्या लक्षात आलं आपण जपानी भाषा घेऊन बी.ए. करू. आई-बाबांशी बोलून तिनं बी.ए.ला प्रवेश घेतला. थोड्याच दिवसांत तिला दिल्ली विद्यापीठातून बी.ए. करण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत तिनं जपान सरकारकडून शिष्यवृत्ती मिळवली. एक वर्षाकरिता ती शिक्षणासाठी जपानला गेली. दरम्यान, तिनं दिल्ली विद्यापीठात एम.ए. पूर्ण केलं आणि एम.फिल.साठी प्रवेश घेतला. सध्या ती एम.फिल. करता-करता एक यशस्वी प्राध्यापक म्हणून वयाच्या २५व्या वर्षीच कार्यरत आहे.

*****

सागर आणि सुचेता या दोघांच्याही आईवडिलांना ताणतणावाला सामोरं जावं लागलं; परंतु मुलांचा कल लक्षात घेऊन त्यांनी मुलांना पुढं जाऊ दिलं. 
स्मार्ट आई होताना ताण येतोच. या ताणाला कसं सामोरं जावं?...

  •  सर्वप्रथम मुलांच्या निकोप वाढीसाठी त्यांच्यातील गुणदोष लक्षात घेऊन, त्यांना योग्य ती स्पेस देऊन त्यांच्या मनासारखं वाढू द्या.
  •  इतर मुलं व आपलं मूल यातला फरक ओळखून तो स्वीकारा.
  •  आपल्या मुलांचा कल, शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता यांचा अंदाज घेऊन त्याचा आणि पर्यायाने स्वत:चा ताण कमी करता येईल.

यासाठी आजकाल अनेक बुद्धिमापक किंवा कल चाचण्या उपलब्ध आहेत.
ताणतणाव हे प्रत्येकालाच असतात; नव्हे, ते प्रमाणात असणे चांगलेही असते. काहीच तणाव नसेल तर आयुष्य निष्क्रिय होण्याची शक्‍यता असू शकते. आपल्याला झेपतील एवढ्या प्रमाणात ताण असले पाहिजेत, नाही तर त्याचे नकारात्मक परिणाम सुरू होतात. ताणतणावाशी सामना करताना शरीरात अनेक घडामोडी होतात. अंतर्गत अवयव वेगवेगळ्या प्रकारे कार्य करू लागतात. स्नायू सतत सजग राहतात. याचा परिणाम डोक्‍यावर, शरीरावर होतो. झोपेवर, जेवणावर, पचनसंस्थेवरही तो जाणवतो. मन अस्थिर, अस्वस्थ, विचलित होतं. रोगप्रतिकारक शक्‍ती कमजोर होऊ लागते. शारीरिक, मानसिक थकवा जाणवू लागतो.

काय करता येईल?

  •  स्वत:चा आणि इतरांचा आहे तसा स्वीकार करणं. अर्थात, आवश्‍यक तिथे संवाद गरजेचे आहेत. ताणाचं मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करणं आवश्‍यक आहे.
  •  मला जे करता आलं, ते मुलांनी करावं, असा अट्टाहास नसावा. घरात खेळकर वातावरण, दीर्घ श्‍वसन, प्राणायाम, ध्यानधारणा, आनंददायी संगीत यांचा वापर करून ताणाला सामोरं जाता येतं.
  •  वेळप्रसंगी समुपदेशकाची मदत घेण्यास काहीच हरकत नाही. चला तर, मग नवीन वर्षात वेगळ्या अर्थाने ‘स्मार्ट आई’ बनण्याचा संकल्प करू या.

 

(लेखक समुपदेशक आहेत)

संबंधित बातम्या