मसाल्यांची प्रयोगशाळा

डॉ. आरती व्यास
बुधवार, 20 डिसेंबर 2017

चटपटीत मसाल्यांमध्ये पदार्थ चवदार बनविण्याची ताकद आहे, तशी औषध म्हणून आरोग्य सुधारण्याची क्षमता आहे. रोजच्या वापरातल्या या मसल्यांचे काही औषधी उपयोग तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. 
 

चटपटीत मसाल्यांमध्ये पदार्थ चवदार बनविण्याची ताकद आहे, तशी औषध म्हणून आरोग्य सुधारण्याची क्षमता आहे. रोजच्या वापरातल्या या मसल्यांचे काही औषधी उपयोग तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. 
 

न चाहारसमं किंचिद्‌ भैषज्यमुपलभ्यते ......(का.सं.) 
आयुर्वेदातील या उक्तीनुसार आहाराच्या समान कोणतेही औषध नाही, केवळ योग्य आहारानेच अनेक रोग बरे होऊ शकतात तर औषधही आहारावाचून अनेक रोग बरे करू शकत नाही, म्हणूनच आहार ही सर्वश्रेष्ठ औषधी आहे. रोजच्या आहारातील पथ्याचा आयुर्वेदात अन्नविशिष्ट सेवन असा अर्थ अपेक्षित आहे. म्हणूनच रोजच्या खाण्यातील विविध पदार्थांचा(मसाल्यांचा) आपण यज्ञ कर्मातील आहुती म्हणून कसा उपयोग करू शकतो ते पाहूयात. 

आपल्या घरातील सुमारे 160ते 175 पदार्थांचा (औषधी) आहारामध्ये समावेश असतो ज्यातील मसाल्याच्या काही निवडक गोष्टींचा आपण औषधे म्हणून कसा वापर करू शकतो ते पाहू. आयुर्वेदिय पद्धतीप्रमाणे आहारामधील रोचक वर्गात मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश होतो. मसाल्यांचा समावेश आहारात होत असल्याने त्यानाही औषधीच समजावे. 

1)हळद- 
भारतीय कुटुंबात रोजच्या खाण्यात वापरला जाणारा सौम्य कडू पदार्थ हळद. सध्या हळदीचा परदेशातही गोल्डन ड्रिंक म्हणून रोज वापरात आहे. रोजच्या तुरीच्या वरणात वापरली जाणारी हळद पचायला हलकी करते, तुरीचे दुष्परिणाम कमी करते. पुरणपोळी बनवताना डाळीत किंचित हळद घातली जाते. जन्मलेल्या बाळापासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांनी ती युक्तीने खाणे आवश्‍यक आहे. महागड्या केशरऐवजी हळदीचा वापर उत्तम रंगही आणेल आणि पदार्थ बाधणारही नाही. 

बाळंतिणीला व तान्ह्या बाळाला तेल-हळद लावण्याची आपली प्रथा रोगप्रतिबंधक म्हणून हळदीचा वापर सांगते. आजीबाईच्या बटव्यात आणि बाळगुटीतही हळद असतेच, ज्याचा वळसा मधातून अगर मातृस्तन्यातून द्यायला सांगितला जातो. त्यामुळे दात येतानाच्या, आईचे व बाहेरील दुध पचण्याच्या तक्रारी कमी होऊ शकतात. सर्दी-खोकला-दमा याचा त्रास कमी होऊ शकतो. 

 • कॅन्सर या व्याधीमध्ये हळदीचा वापर औषधी म्हणून पोटातून, लेप, काढे, स्वेदन, पिचू यांच्या व आहार स्वरूपात केला जातो. त्याचसोबत गर्भनिरोधक म्हणून पण यावरील संशोधन अंतिम टप्प्यात आहे. 
 • हळदीच्या पानांचा तूप बनवताना वापर केल्याने तुपाचा उग्र वास कमी होऊन तुपाला पिवळसर रंग येतो. 
 • विविध आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी, अन्नपदार्थ बनवण्यासाठी, मासे शिजवण्यासाठी हळदीची पाने वापरतात. 
 • लांबच्या प्रवासाने आलेली सूज, मुंग्या येणे या तक्रारींसाठी हळदीच्या पानांचा पोटीस उत्तम काम करतो. 
 • त्वचा शिथिल असल्यास, रुक्षता, तीळ, वांग यावर उगाळलेल्या हळदीचा लेप लाभदायक ठरतो. 
 • हळदीचे चूर्ण + बेसन + कापूर या मिश्रणाचा साबणाऐवजी वापर केल्याने त्वचा घट्ट, सतेज होते. 
 • पायास भेगा पडणे, अंगावर पित्त उठणे, डोक्‍यात खाज येणे, कोंडा होणे, केस गळणे या तक्रारींवर हळद, शिकेकाई, रिठा यांचा काढा वापरावा. 
 • मुरगळणे, ठेच लागणे यामुळे येणारी सूज ही हळकुंडाच्या गरम लेपाने कमी होते. 
 • मधुमेह, वजनाच्या तक्रारी, झउजऊ, यामधील औषधांमध्ये हळदीचा वापर केला जातो. 
 • सततचा खोकला, आवाजाच्या तक्रारी, थकवा, पोटातली जळजळ, हिरड्या व दातांच्या या तक्रारींसाठी गरम दूध + हळद घ्यावी. 
 • बाळंतपणात स्त्रीने हळदीचा नियमित वापर केल्यास अंगावरील दूध शुद्ध होते, गर्भाशयाचे संकोचन होते. 
 • डोळ्याच्या सर्व तक्रारींमध्ये हळदीच्या पाण्याची पट्टी डोळ्यावर ठेवल्याने उत्तम लाभ होतो. 
 • आंबेहळदीमध्ये एक प्रकारचे तेल पण आढळते. ती हळदीपेक्षा उग्र असल्यामुळे हिचा पोटातून वापर केला जात नाही, परंतु ती लोणच्याच्या स्वरूपात वापरतात. आंबेहळदीचा वापर बाह्य उपचारात म्हणजे रंग उजळण्यासाठी, त्वचेवरील बारीक लव काढण्यासाठी केला जातो. 
 • बऱ्याच वेळेला जखमा भरून येत नाहीत, नंतर डाग / व्रण राहतात अशावेळेस पण आंबेहळदीचा उपयोग दिसतो. 

कोणी वापरू नये : ज्यांना शौचास खडा होण्याची तक्रार असेल, आहारात तेल,तूप, यांचे प्रमाण कमी असेल अशांनी हळद कमी वापरावी. 

2) हिंग- 
हिंग हा झाडाचा चीक आहे, जो स्वयंपाकात रुची वाढवण्यासाठी व औषधात पाचक म्हणून उपयोगी ठरतो. त्यामुळे यात लसून, बेसनाचे पीठ, यांची भेसळ मोठ्या प्रमाणात केली जाते. आयुर्वेदातील हिंग्वाष्टक चूर्ण हे प्रसिद्ध औषध आहे. सर्व हिंगांमध्ये हिरा हिंगऔषधी व आहारात उपयुक्त म्हणून सांगितला आहे. परंतु तो लोखंडी कढईत तुपावर भाजलेला असावा जेणेकरून हिंगाचा तीक्ष्णपणा या संस्काराने कमी होतो. 

 • हिंगाचा उपयोग पोटाच्या तक्रारीसाठी विशेषतः आतड्यांच्या विकृतींमध्ये उत्तम होतो. नाभीमध्ये तेल भरून त्यावर हिंगाचा खडा पोटातील वायू कमी करतो. 
 • हिंगाच्या वापराने जेवणानंतर झोप येणे, पोट जड होणे, तोंडास पाणी सुटणे, चव नाहीशी होणे, पचनाच्या व शौचाच्या तक्रारी कमी होतात. 
 • चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवण्यामुळे, लवकर अन्न खराब झाल्यामुळे विषद्रव्ये तयार होऊन पुढील दोष हिंगामुळे जाठराग्नी तीव्र होण्याने टाळला जातो. 
 • किडलेल्या दातांसाठी, व त्यामुळे उद्भवणाऱ्या वेदनेसाठी हिंगाची पूड, कापूर व लवंग चूर्ण उपयुक्त ठरते. 
 • शरीरातील कोणत्याही भागातील वेदनेसाठी हिंग चूर्ण व भाजलेला ओवा गरम पाण्यातून उपयुक्त ठरतो. 
 • दुपारच्या जेवणानंतरच्या ताकातील हिंग, जिरे, सैंधवाचे मिश्रण रुचिकर आहे, आतड्यास बल देते, पचनशक्ती वाढवते, जुलाबात, मुळव्याधीत उपयुक्त आहे. 
 • हिंग व जिऱ्याचे मिश्रण बाळंतीणीस सकाळ-संध्याकाळ दिल्याने गर्भाशय शुद्धी होते. पोट सुटत नाही, पोट दुखत नाही व नंतर येणारी पाळी सुधारते. (वैद्यांच्या सल्ल्याने घेणे) 
 • हिंगाचा औषधी म्हणून अपस्मार (फिट येणे), पक्षवध (पॅरालिसीस), पोटाच्या तक्रारी, वात वाढणे, जंत होणे, डोकेदुखी, वारंवार सर्दी होणे यात उपयोग केला जातो. 

कोणी वापरू नये : हिंग पाचनासाठी उपयुक्त असला तरी पित्तप्रकृती असलेल्या व्यक्तीने नियमित हिंग खाणे योग्य नाही. अपचनाचा त्रास असला तरी पित्तप्रकृतीच्या व्यक्तीने याचा वापर जास्त करू नये. कारण याचा अतिवापर विषासारखी लक्षणे निर्माण करतो. 

3) मिरे- 
त्रिकटू या आयुर्वेदातील सर्वात आवडत्या औषधामधील एक घटक काळी मिरी हा आहे. काळे व पांढरे मिरे असे दोन प्रकार असतात पण ते मुख्यत्वे एकच आहेत. 

 • पोटातील पाचक स्त्राव कमी पडल्यास, पोट जड वाटल्यास, पोट दुखणे-फुगणे अशावेळेस मिरे खावे. याने अन्नपचन व पाचक स्त्रावाच्या तक्रारी कमी होतात. 
 • दम्याच्या विकारात, डोकेदुखी, जुनाट सर्दी, जंतांच्या तक्रारींवर, जेवणानंतरची सुस्ती, मांसाहार, किडलेल्या दातांसाठी, मिऱ्यांचा वापर केला जातो 

कोणी वापरू नये : मिरे हे अत्यंत पित्तकर व रुक्षत्त्व निर्माण करणारे आहेत. लहान मुले, सुकुमार, गर्भिणी यांनी जास्त प्रमाणात व दीर्घकाळपर्यंत खाणे घातक ठरते. यामुळे हातापायांची जळजळ, पोटात आग होणे घडू शकते. यावर उपाय म्हणून कोमट तूप, गार दूध, दुर्वांचा रस पिणे. सध्या पिझ्झा-बर्गर (तिकडच्या हवामानास अनुकूल) अशा बऱ्याच जंकफुड मधील अतिप्रमाणात वापरली जाणारी मिरपूड आपल्यासाठी अतिउष्ण व पित्तवर्धक आहे. 

4) जिरे :
जिरे या नावातच त्याचा अर्थ आहे, ज्याच्या सेवनाने अन्न शरीरात जिरे तेच ते जिरे. जिऱ्यामध्ये जिरे, कडू जिरे, शहाजिरे, कलौन्जी असे प्रकार आहेत. ज्यांचे गुणधर्म समान आहेत. या सर्वांमध्ये काबुली जिरे श्रेष्ठ गुणांचे ठरतात. 

 • अति प्रमाणात जुलाब झाल्यामुळे आतड्यांची शक्ती क्षीण होते, त्यावर जेवणापूर्वी कोमट पाण्यातून जिरे घेतल्याने आराम पडतो. 
 • स्त्रियांमध्ये मासिक स्त्राव कमी होणे, बाळंतपण, गर्भिणीला होणाऱ्या उलट्या यांवर जिऱ्याचे चूर्ण, काढा उपयुक्त ठरतो. 
 • अजीर्ण, कृमी, मलबद्धता, यातून येणाऱ्या तापात जिरे व धने कोमट पाण्यातून घ्यावे. 
 • खोकल्यातील कफ सुटण्यासाठी, तोंडाची चव परत येण्यासाठी, पोट फुगणे, यावर जिरे चूर्ण स्वरूपात कोमट पाण्याच्या सोबत घेण्यास सांगितले आहे. 
 • हळकुंड उगाळून त्यात जिऱ्याचे चूर्ण घालून लेप चेहऱ्यावर लावल्यास अतिरिक्त तेलकटपणा कमी होतो, सुरकुत्या जातात. 
 • मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात खूप दुखण्याच्या तक्रारीवर यजिरकाद्यरिष्ट' हे जेवणापूर्वी कोमट पाण्यातून घेतल्यास फायद्याचे ठरते. 
 • शहाजिरे बाळंतीणीचे दूध वाढवण्यासाठीच्या, मसाल्याच्या पदार्थांमध्ये, हिंग्वाष्टकचूर्ण या पाचक औषधात वापरले जाते. 
 • कडूजिरे हे एक कडूरसाचे द्रव्य आहे, जे शुक्र धातूच्या, स्त्रीविकारांवर, बाळंतपणात, तापावरील बऱ्याच औषधांवर वापरले जातात.
 • शरीरातील उष्णता(कडकी) घालवण्यासाठी जिरे + धणे + खडीसाखर एकत्र पाण्यात 4-5 तास भिजवून नंतर गाळून पिण्याने खूप फायद्याची ठरते.

कोणी वापरू नये : जिऱ्याचा 2 चमच्यापेक्षा जास्त वापर करणे टाळावे, याने पित्त वाढते. 

5) धने ( कोथिंबीर) :
वजनात अतिशय हलके, पित्तशामक व मधुर रसाचे असते. कोथिंबीर व धने सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी फायदेशीर ठरतात. 
कोणत्याही तऱ्हेने आलेल्या बैचैनीस धने साखरेबरोबर द्यावेत. 

 • कोथिंबिरीचा रस हातापायास चोळून लावल्याने मधुमेहात होणारी आग कमी होते. 
 • याच्या रसाच्याघड्या डोळ्यावर ठेवण्याने डोळ्याची आग होणे, लाल होणे, दुखणे या तक्रारी कमी होतात. 
 • रसाचे थेंब नाकात सोडल्याने नाकातून रक्त येणे, कोरडे पडणे, या तक्रारी निश्‍चितच कमी होतात. 
 • उन्हाच्या झळा लागणे, स्कूटर व बॉईलर किंवा वेल्डिंग सारखे अति उष्णतेच्या कामामुळे त्वचा रूक्ष होणे, आग होणे, यावर कोथिंबिरीच्या रसाच्या घड्या चेहऱ्यावर ठेवाव्या. 
 • तोंडाचा वास येणे, हिरड्यांच्या तक्रारींसाठी ताजी कोथिंबीर जेवणापूर्वी चावून खावी. 
 • धणे - 
 • पोटात वायू धरणे, घशाशी जळजळ होणे, उन्हाळी लागणे, सतत तहान लागणे, हातापायांची आग होणे, पित्ताचे विकार, लघवी कमी होणे / आग होणे, उष्णतेचे विकार यात धन्या-जिऱ्याचे भिजवलेले पाणी / काढा खूप फायद्याचे ठरते. 
 • धन्यांमुळे कृमी / जंत होण्याची शक्‍यता कमी होते, म्हणून आपल्या आहारात याचा समावेश पूर्वीपासून चालू आहे. 
 • धने हृदयास बल्यकारक आहे म्हणून अशा रुग्णांनी धणे + खडीसाखर चावून खावी. 
 • आमपाचनासाठी धन्याचा काढा खूप महत्वपूर्णक आहे. 

6) आले / सुंठ - 
आले आपल्या रोजच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ आहे. आल्याला उन्हात वाळवून सुंठ तयार करतात. 
यसुंठीवाचून खोकला गेला' म्हणतात, मात्र सुंठ खोकल्यावरील एक वस्ताद औषध आहे. 
आल्याचा व लिंबाचा रस पादेलोण घालून किंवा नुसते आले-मीठ लावून खाणे पाचक म्हणून काम करते. 

 • जेवणापूर्वी / अनशापोटी अर्धा इंच आल्याचा तुकडा व सैंधव चावून खाल्ल्याने भूक चांगली लागते, कफ कमी होतो. 
 • घशाशी जळजळ होणे, तोंडास पाणी सुटणे, उलटीनंतर चघळण्यासाठी, आल्याचा तुकडा हिंग-सैंधव-लिंबासोबत खावा. 
 • अपचन, ढेकर, अतिगोड व अतीपौष्टीक आहारामुळे वजन वाढताना आल्याचा वापर नक्की करावा. 
 • पित्तामुळे, अन्नविषबाधेमुळे झालेल्या उलट्यांवर आल्याचा + लिंबाचा रस + साखर + मध लाभदायक आहे. ( काहीवेळा सल्ला गरजेचा ) 
 • उचकी, सुका खोकला, तहान लागणे, यांवर आल्याचा वापर फायद्याचा ठरतो. 
 • आल्याच्या वापराने कॅन्सर विरुद्ध संरक्षण मिळू शकते, असा उल्लेख आहे. 

कोणी वापरू नये : लघवीस जळजळ होत असताना आले कमी प्रमाणात वापरावे. 

सुंठ - 

 • तापाच्या सुरवातीच्या अवस्थेत सुंठ-धणे घालून उकळलेले पाणी थोडे-थोडे घ्यावे. 
 • वरचेवर जुलाब होत असल्यास सुंठ चूर्ण गरम पाण्यातून / पातळ ताकातून घ्यावी. 
 • ज्यांना अन्न न पचल्यामुळे जुलाब होतात, आतड्यांची कार्यशक्ती कमी होते, त्यांनी आहारात सुंठीचा वापर करावा. 
 • आमवात या व्याधीमधील सुंठी हे श्रेष्ठ औषध आहे,यात सुंठ चूर्ण + एरंडेल तेल खावून वरून कोमट पाणी पिण्याने ठणका, सूज कमी होऊ शकते. 
 • सुंठवडा हे प्रत्येक मंदिरातील देवांच्या जन्म सोहळ्यातील महत्वाचा पदार्थ आहे, जो इतरवेळी पण आव पडणे, सर्दी दाटून डोके दुखणे, यावरही फायद्याचा आहे. 
 • अशक्तपणा व प्रसुतीनंतर, कफाच्या तक्रारींवर, सर्दी, रक्तपित्त यामध्ये, भूक वाढण्यासाठी सुंठीचा आयुर्वेदातील वापर सर्वश्रुत आहे. 

कोणी घेवू नये : पित्तप्रकृतीच्या व्यक्तीने कमी प्रमाणात वापरावे, तसेच ग्रीष्म व शरद ऋतूत वापर शक्‍यतो टाळावा. 

7) ओवा 
अजीर्ण, पोटदुखी, कृमी, यामध्ये ओवा अतिशय उपयुक्त आहे. ओवा हे एक बारीक तिखट बी आहे व आजीबाईच्या बटव्यातील एक महत्त्वपूर्ण औषध आहे. 

 1. थंडी वाजून ताप येणे, वारंवार सर्दी होणे, सतत दुर्गंधी येणे, यावर जेवणानंतर 1-1 चमचा ओवा खाऊन काही पथ्य पाळल्यास फायदा होतो. 
 2. बाळंतीण स्त्रीच्या गर्भाशयात काही दोष राहिल्यास ताप येणे, ओटीपोटात दुखणे, या तक्रारींवर ओव्याचे उकळलेले पाणी / शेक फायद्याचा आहे. 
 3. वरचेवर खाणे, पचायला जड पदार्थ खाणे, अवेळी खाणे, भूक न लागणे यामुळे जळजळ, अजीर्ण, उलट्या झाल्यावर ओवा गरम पाण्यातून घ्यावा. 
 4. अन्न न पचल्यामुळे, मळाचा खडा होऊन पोट दुखत असल्यास तुपावर भाजलेले ओवा गरम पाण्यातून घ्यावे. 
 5. लहान मुलांच्या जंतांच्या तक्रारींवर ओवा व एरंड तेल उपयुक्त आहे. 
 6. खुरासनी ओवा गुंगी आणणारा, वेदना कमी करणारा आहे, याच गुणांमुळे झोपेच्या तक्रारींवर, मानसिक रुग्णांमध्ये, वेदनेमध्ये वापरले जाते. 
 7. ओव्याच्या फुलाचा पक्षाघातामध्ये, रक्तदाब कमी करण्यासाठी, वातविकार यांवर वापर केला जातो. 
 8. ओव्याचा अर्काचा तान्ह्या बाळांच्या पोटदुखीत, आईच्या दुधाच्या तक्रारींवर छान उपयोग होतो. तसेच आईस व बाळास धुरी देण्यासाठी ओवा वापरला जातो. 
 9. कोणी घेऊ नये- ओवा अत्यंत उष्ण असून पित्त वाढवतो. शरीरातील पाण्याचा अंश कमी करतो तसेच शरीरातील शुक्र कमी करण्याचे वैशिष्ट्य पूर्ण काम करतो त्यामुळे अतिशय विचार करून वापर करावा. खुरासनीओवा सल्ल्याशिवाय घेऊ नये. 

9) कांदा

 • कांदा बलकारक व पोट साफ होण्यासाठी उपयुक्त तर आहेच पण कॉलरा मधील रामबाण औषध आहे. 
 • झोप चांगली येण्यासाठी आहारात कांदा गरजेचा आहे. 
 • कोणत्याही कारणाने येणारी बेशुद्धी, आकडी (अपस्मार), घोळणा फुटणे, अतिउष्ण प्रदेश इथे कांदा एक चांगले औषध आहे. 
 • लहान मुलांच्या तापामध्ये कांदा वापरल्यास अति उष्णतेने येणारी आकडी व इतर दुष्परिणाम टाळता येतात . 
 • गार वारा लागून जर कान दुखत असेल तर कांद्याचा रस कोमट करून कानात घातल्याने फायदा होतो. 
 • डोळे येणे या तक्रारीवर कांद्याचा रस 1-1 थेंब डोळ्यात घालतात. 

कोणी वापरू नये : कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्यास लघवीचे विकार उत्पन्न होतात म्हणून प्रमाणात उपयोग करावा. 

10) लसूण 

 • भूक न लागणे हि तक्रार खूप जुनी झाली कि शरीरधातूंचा क्षय होऊन वजन कमी होणे, उत्साह कमी होणे, अंग दुखणे, या तक्रारींना सुरुवात होते. अशावेळी लसणाचा उपयोग दिसतो. 
 • जंत होण्याची सवय असल्यास रोजच्या आहारात लसूण ठेवावा. 
 • मज्जातंतूंची शक्ती कमी होणे, चिडचिड वाढणे, मनाची एकाग्रता कमी होणे, हृदय विकार यामध्ये लसूण वापरावा. 
 • थंडीमुळे, सर्दीमुळे कान दुखणे, दडा बसणे या तक्रारींवर लसूण पाकळी खोबरेल तेलात गरम करून ते तेल कानात घालावे. 
 • आव पडत असल्यास जेवणात लसूण चटणी खावी. 
 • पोटातील वायुमुळे हृदयाच्या जागी दुखत असेल तर लसणाचा रस + आल्याचा रस प्यावे. वरून कोमट पाणी प्यावे. 

कोणी घेऊ नये : खूपव्यायाम करणारे, उन्हात काम करणारे, जास्त तहान लागणारे, दूध भरपूर पिणारे लसूण खाण्यास अयोग्य ठरतात. लसूण अति मात्रेत खाल्ल्याने लघवीची जळजळ, छाती, पोट, डोळे यांची आग होते. पित्ताचे विकार असणाऱ्यांनी लसणाचा वासही घेऊ नये असे म्हटल्यास अतिशयोक्ती नाही. शरद ऋतूत लसूण बंद ठेवावा. 

11) लवंग
कफ कमी करणाऱ्या औषधांमध्ये लवंग हे अतिशय श्रेष्ठ औषध आहे, त्यामुळे खोकला, दमा, भूक लागण्यासाठी, उलट्या (विशेषतः गर्भिणीच्या), हा त्रास कमी होतो. 

 • सुगंधी व कफ कमी करणारी असल्यामुळे जेवणानंतर विड्यासोबत खातात. 
 • जंतांच्या तक्रारी, तोंडाची दुर्गंधी, किडलेल्या दातांची तक्रार यावर लवंग चूर्ण व तेल फायद्याचे ठरते. 
 • लवंग जाळून केलेली राख मधात मिसळून तोंडात धरल्यास उचकी कमी होते. 
 • सांधेदुखीच्या वेदनेमध्ये लवंग वापरतात. 

कोणी वापरू नये : रिकाम्या पोटी, दारू पिल्यावर, पित्तप्रधान प्रकृती असल्यास लवंग वापरू नये. 

11) दालचिनी

 • दालचिनीचे चूर्ण मधातून घ्यावे यामुळे कफ विकार कमी होतील. 
 • जेवणानंतर दालचिनीचा तुकडा चघळल्यास तोंड स्वच्छ राहते , दात किडत नाहीत, तोंडास दुर्गंध येत नाही, जेवणातील विषारी द्रव्यांचे पचन होते व दुष्परिणाम टळतात. 
 • दालचिनी + जायफळ + केशर यांचे मिश्रण कॉफीतून / नुसते रोज रात्री घेतल्याने मानसिक ताण कमी होतो. झोप व्यवस्थित लागते. आळस व कंटाळा निघून जातो. 
 • वारंवार पातळ संडास होणे, आव पडणे, आतड्यांची शक्ती कमी होणे, यासाठी जेवणाबरोबर दालचिनी व सुंठीचे चूर्ण भातात मिसळून घेतले जाते. 
 • मूळव्याधीच्या मोडावर दालचिनीचा गंध लावावा. 
 • थुंकीतून रक्त पडत असल्यास दालचिनीचे तेल बत्ताशावर घालून सकाळ-संध्याकाळ घ्यावे. 
 • दात दुखीमध्ये ह्याच्या तेलाचा बोळा वापरावा. 
 • वारंवार सर्दी होणाऱ्यांनी निलगिरी-दालचिनी तेल रुमालावर घेऊन त्याचा वास घेतल्याने नाक चोंदणे, डोके दुखणे या तक्रारी कमी होतात. 

कोणी वापरू नये : दालचिनी ही उष्ण व पित्तवर्धक आहे. त्यामुळे उपाशीपोटी, शरद ऋतूत टाळावे. दालचिनीचा अतिप्रमाणात वापर शुक्रधातूस क्षीण करतो. 

12) तीळ 
औषधी उपयोगांमध्ये काळे तीळ श्रेष्ठ सांगितले आहे. तीळ उत्कृष्ठ दर्जाचे शरीर पोषण करते. 

 • मेदाच्या तक्रारी, मूळव्याध, सूज, पोटातील अल्सर, पोटदुखी,मळाचे खडे, वातविकार, यांवर उपयुक्त असते. 
 • तान्ह्या बाळापासून वृद्ध व्यक्तींपर्यंत तीळतेलाचा उपयोग अभ्यंग, पोटातून घेणे, पंचकर्म अशा स्वरूपात केला जातो. याने रुक्षत्व, आजारपण लांब राहते. 
 • जुनाट खोकल्याच्या विकारात तिळाचा काढा पिल्याने कफ सुटतो. 
 • पाळीच्या वेळच्या स्त्रावाच्या, वेदनेच्या तक्रारींवर, दूध येण्याच्या तक्रारींवर तीळ औषधी स्वरूपात वापरला जातो. 
 • तीळतेल सेवनाने म्हातारपण येत नाही, वातविकार होत नाहीत, मनुष्य बलवान होतो. 

13) वेलची 
वेलची अत्यंत पाचक, कफघ्न आहे. अप्रतिम स्वादामुळे तिला मसाल्याची राणी म्हणतात. 
कोणत्याही कारणाने येणारी उलटी वेलदोड्याच्या काढ्याने / चघळण्याने थांबते, म्हणून प्रवासातील हा एक महत्त्वाचा सोबती आहे. 

 • मानसिक ताणामुळे झोप न येणे, चिडचिड वाढणे, एकटेपणा वाटणे या तक्रारींवर वेलचीपूड घेतल्याने पचन, शरीरपोषण होते. 
 • मांसाहार व जड अन्न खाल्ल्यानंतर वेलचीचा उपयोग पचन सुधरवतो. 
 • चक्कर येणे, पोटात मळमळणे, डोके दुखणे, जड होणे, सुका खोकला, उचकी लागणे, तोंडास दुर्गंधी, थुंकीतून रक्त पडणे, कफाची तक्रार यावर वेलची फायद्याची ठरते. 

कुणी खाऊ नये : मोठी वेलची रूक्ष व उष्ण गुणांची असल्याने आहारात कमी प्रमाणात वापरावी. क्वचित प्रसंगी ती सालासकट खाऊ नये. 

14) मेथ्या 
मेथीच्या येणाऱ्या शेंगांमधून जे बी निघते, त्यास मेथ्या म्हणतात. 

 • स्त्रियांच्या मासिक पाळीशी निगडीत पाळी पुढे जाणे, स्त्राव अव्यवस्थित असणे, वास येणे यांवर मेथी-गुळ-तुपाचा लाडू सकाळी खाण्यास सांगितला जातो. बाळंतपणातही मेथीचा लाडू औषधी मानतात. (हा काहीवेळा उष्ण पडू शकतो). 
 • मेथ्यांचे चूर्ण साजूक तुपावर परतून घेतल्यास शरीरधातूंचे पोषण होते. कंबरदुखी, अंगदुखी कमी होते. 
 • तुरीचे वरण पचावे म्हणून त्यात शिजताना मेथ्या घातल्या जातात. 
 • मधुमेहामध्ये अनेक जण मेथ्यांचा वापर करताना दिसतात कारण यामध्ये रेशातत्व किंवा तंतू (फायबर) चे प्रमाण अधिक आहे. 

कोणी वापरू नये: मेथी शक्तीदायक आहे म्हणून ती जास्त प्रमाणात खाऊ नये, पित्ताचे विकार असलेल्यांनी मेथी वापरू नये. मेथी उष्ण व तीक्ष्ण आहे. त्यामुळे त्याचे आहारातील प्रमाण कमीच असावे. 

14) केशर
मसाल्यांमधील अतिशय महाग व सर्वात जास्त भेसळ केला जाणारा हा पदार्थ. 

 • पाळीतील स्त्राव साफ होण्यासाठी केशराचा वापर कापरासोबत केला जातो. 
 • केशर, कपूर व चंदन हे डोकेदुखी वरील एक औषध आहे. 
 • दाह, लहान मुलांमधील सर्दी, पडसे, जंत, रक्तवाढ, दुध येण्याच्या तक्रारींमध्ये केशर नक्कीच वापरले जाते.

वरील सर्व मसाल्यांच्या पदार्थांचा विचार केल्यास असे लक्षात येते की, जर रोजच्या आहारात पण योग्य प्रमाणात व योग्य प्रकारे वापर केल्यास आपले आरोग्य, वेळ, पैसा वाया जाणार नाही. मसाले वापरण्याचा मुख्य उद्देश खाद्यपदार्थ रुचकर व स्वादिष्ट बनवणे, घरातील पदार्थांचा घरगुती औषधी उपचारांसाठी वापर करणे हा आहे जेणेकरून तात्पुरते व गुणकारी उपचार घरच्या घरी व्हावे. परंतु सध्या वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात मसाल्यापासून बनवलेले चटपटीत पदार्थ खाल्ले जातात व यातून आतड्यांचे आजार, वजनाच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. 
शेवटी उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म हेच सूत्र मह्त्त्वाचे !

संबंधित बातम्या